मुक्तपीठ टीम
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे महाविकास आघाडी सरकार संकटात आले आहे. तब्बल ४० हून अधिक आमदारांसह एकनाथ शिंदे आधी सुरत तर आता गुवाहाटीमध्ये आहे. या बंडखोर आमदारांना महाराष्ट्रात परतण्याचे आवाहन करण्यासाठी साताऱ्यातील बिजवडीचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय भोसले हे थेट गुवाहाटीत पोहचले यावेळी त्यांनी ‘एकनाथ शिंदे ‘मातोश्री’ वर परत चला’ चा फलक हातात घेऊन हॉटेल रेदिसन ब्लू बाहेर उभे होते. पण, यावेळी आसाम पोलिसांनी हा परिसर संवेदनशील असल्याचे सांगत भोसले यांना ताब्यात घेतलं. कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
हॉटेलबाहेर नेमकं काय घडलं?
- संजय भोसले गुवाहाटीला हॉटेलबाहेर पोहोचले असून पक्षाचे आमदार एकनाथ शिंदे यांना ‘मातोश्री’वर परतण्याचे आवाहन केल्याचे सांगितले.
- शिवसेनेने आपल्या आमदारांना खूप काही दिले आहे.
- संजय भोसल एक फलक घेऊन तिथे पोहोचले होते.
- “शिवसेना जिंदाबाद. एकनाथ शिंदे (भाई) मातोश्रीवर परत चला. उद्धवजींना, आदित्यजींना साथ द्या”, असं त्यांनी फलकवर लिहिलं होतं.
यावेळी आसाम पोलिसांनी हा परिसर संवेदनशील असल्याचे सांगत भोसले यांना ताब्यात घेतलं. - कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
आसाममधील गुवाहाटी येथे उपस्थित असलेले शिंदे गटाचे बंडखोर आमदार संजय शिरसाट म्हणाले की, यापूर्वी अनेकदा आमदारांनी उद्धवजींना काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस, दोघेही शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले होते. अनेकवेळा आमदारांनी उद्धवजींना भेटण्यासाठी वेळ मागितला पण ते त्यांना भेटले नाहीत. शिवसेनेच्या आमदाराचा मतदारसंघ पाहिला तर तहसीलदारापासून महसूल अधिकाऱ्यापर्यंत कोणताही अधिकारी आमदाराशी सल्लामसलत करून नियुक्त केला जात नाही. हे आम्ही उद्धवजींना अनेकदा सांगितले पण त्यांनी कधीच यावर उत्तर दिले नाही.