मुक्तपीठ टीम
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या अयोध्या दौऱ्याच्या विरोधामागे महाराष्ट्रातूनच रसद पुरवली जात होती, असा आरोप पुण्यातील सभेत केला. आता मनसेकडून उत्तर प्रदेशातील भाजपा खासदार बृजभूषण शरण सिंह यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबतचे फोटो मनसेकडून ट्वीट करण्यात आले आहेत. मनसेचे सरचिटणीस सचिन मोरे यांनी फोटो ट्वीट केले असून राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या विरोधामागे पवारांचा हात असल्याचा आरोप मनसेकडून सुरु आहे. प्रत्यक्षात ते फोटो पुण्याच्या मावळमधील कुस्ती स्पर्धेतील असल्याने त्यावरून थेट सापळ्याचा आरोप टोकाचा असल्याचं मानलं जातं.
कुछ फोटो अच्छे…और सच्चे होते है!
मनसे नेते सचिन मोरे यांनी ट्वीट केलं आहे, या ट्वीटमध्ये त्यांनी बृजभूषण सिंह आणि शदर पवार यांचे फोटो शेअर केले आहेत. तसेच, ‘कुछ फोटो अच्छे भी होते है, और सच्चे भी होते है,’ असं कॅप्शन दिलं आहे.
कुछ फोटो अच्छे भी होते है.. और सच्चे भी होते है…@RajThackeray @BalaNandgaonkar @abpmajhatv @lokmat @mataonline @zee24taasnews @SandeepDadarMNS @ABPNews pic.twitter.com/Esic3lcn2Y
— Sachin Maruti More (@mnsmoresachin) May 23, 2022
राज ठाकरे यांनी नाव न घेता केला होता सापळ्याचा आरोप
- मी अयोध्या दौरा करणार म्हटल्यावर अनेकजण दुखावले.
- त्यासाठी विरोधाचा सापळा रचून त्याला राज्यातूनच रसद पुरविण्यात आली.
- त्यामुळे अयोध्येला न जाण्याचा निर्णय घेतला.
- अयोध्येला जाऊन रामजन्मभूमी आणि ज्या ठिकाणी कारसेवक मारले गेले त्या जागेला भेट देणार होतो.
- मात्र राजकारणात अनेकांना भावना समजत नाही.
- मी हट्टाने तिकडे जायचे ठरविले असते तर माझ्याबरोबर कार्यकर्ते, पदाधिकारी आणि अनेक हिंदू बांधव आले असते.
- तेथे जर काही झाले असते तर कार्यकर्ते भिडले असते.
- कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असते.
- त्यांना तुरुंगात टाकून त्रास दिला असता.
- ससेमिरा मागे लावण्यात आला असता.
- हा सर्व संभाव्य प्रकार लक्षात आल्याने मी दौरा रद्द केला.
मुक्तपीठ विश्लेषण – नेमकं काय असावं?
- बृजभूषण सिंह हे गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय कुस्ती महासंघांचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.
- शरद पवार हे राज्य कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आहेत.
- मनसे नेत्याने शेअर केलेले फोटो एका कुस्ती स्पर्धेतीलच असल्याचं दिसत आहे.
- सन्मान लाल मातीचा, बहुमान मावळवासियांचा, असे या फोटोतील फलकावर लिहिलेलं दिसत आहे.
- त्यामुळे पुणे जिल्ह्यातील मावळ भागातील कुस्ती स्पर्धेसाठी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष या नात्याने बृजभूषण आले असताना राज्याचे अध्यक्ष असणारे शरद पवार तेथे उपस्थित असावेत, असं दिसतं.
- त्यामुळे मनसेनं जरी कनेक्शन दाखवण्याचा प्रयत्न फोटोतून केला असला तरी त्यातून थेट राज ठाकरेंचा सापळ्याचा आरोप सिद्ध होतो असं नाही.
- त्यातही पु्न्हा अनेकदा शरद पवारांचे समर्थक काही घडलं तरी ते साहेबांनीच घडवलं असं मानून चालतात, तशा स्वरुपाचा हा आरोप वाटत आहे.
- मुळात उत्तरप्रदेशातील एक भाजपा खासदार तोही दाखलेबाज असणारा, राज्यातील योगी आदित्यनाथांसारख्या आक्रमक नेता मुख्यमंत्री असताना भाजपाच्याच एका राज्यातील रणनीतीला धक्का देण्याचा प्रयत्न दुसऱ्या पक्षाच्या नेत्याच्या सांगण्यावरून करेल, असं शक्य नाही.
तसंच खासदार बृजभूषण यांनी मला अमित शाह, जेपी नड्डा या प्रकरणी कॉल करणार नाहीत, असं ज्या आत्मविश्वासाने सांगितलेले तेही वेगळंच सुचवत असल्याचं दिसत आहे. - मुळात जर योगी आदित्यनाथांनी ठरवलं असतं तर बृजभूषणच काय आणखीही कोणी आडवं आलं असतं तरी राज ठाकरेंचा अयोध्या दौरा अशक्य नव्हता. त्यांचं या प्रकरणातील मौनही खुपणारंच होतं.