मुक्तपीठ टीम
मध्यप्रदेशातील मंदसौर येथील राजमाता विजयाराजे सिंधिया कृषी विद्यापीठातील कृषि संशोधकांनी द्राक्षांची नवे वाण शोधले आहे. त्यांनी विकसित केलेल्या वाणाची द्राक्षे नेहमीच्या हंगामात नाही तर नंतरही येतील. त्यामुळे आता मे-जूनमध्येही द्राक्षे बाजारात येऊ शकतील. याचा फायदा शेतकरी आणि ग्राहक या दोघांनाही होणार आहे.
साधारणत: ऑक्टोबरमध्ये द्राक्ष वेली तयार होऊन डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान पीक हाती येते. दरवर्षी हंगामात देखभाल व रोपांची छाटणी करण्याची आवश्यकता असते. त्यामुळे मार्चपासून मागणी शक्य असूनही द्राक्षे मात्र तेवढी नसतात. त्याचा फायदा उचलत गेली काही वर्षे भारतातील महानगरांमध्ये चिनी द्राक्षे मिळत आहेत. आकाराने मोठी असली तरी भारतीय द्राक्षांशी तुलना करता त्यांची चव तेवढी चांगली नसते. तरीही केवळ दुसरी द्राक्षे नसल्याने ती महागडी विकली जातात. बाजारातील ही संधी आणि जेथे द्राक्षांचे उत्पादन शक्य नसते तेथेही ते घेता यावे याउद्देशाने कृषि संशोधक द्राक्षांच्या नव्या वाणावर संशोधन करत होते.
मे-जूनमध्ये द्राक्षे तयार करण्याचे तंत्र विकसित करण्यासाठी संशोधकांनी चार वर्षे कठोर परिश्रम केले आहेत. द्राक्षवेली एकदा लावल्यानंतर दरवर्षी १० ते १२ पिके घेतली जातात. मुख्यत: आपल्या महाराष्ट्रातील नाशिक येथील द्राक्षे जास्त लोकप्रिय आहेत. तेथेच सर्वात जास्त उत्पादनही होते.
कृषि संशोधन केंद्रातील कृषिशास्त्रज्ञांनी नवीन हंगामासाठी द्राक्षांच्या विविध वाणांच्या वेलाची कापणी केली. वर्षाच्या प्रत्येक महिन्यात त्यांची चाचणी घेतली. गुणवत्ता आणि उत्पादनाचा अभ्यास केला. यातून असे समोर आले की, उन्हाळ्याच्या हंगामात फ्लेमसीड लॅस द्राक्ष वाणांचे उत्पादन ९० ते ११० दिवसांमध्ये घेतले जाऊ शकते. १३० ते १४० दिवसात किसिमिस वाणापासून दर्जेदार उत्पादन मिळू शकते. मंजरी आणि श्यामा या वाणांचे उत्पादन १२० ते १२५ दिवसांत करता येते.
मंदसौरमधील द्राक्षे संशोधन केंद्राचे संशोधक डॉ. नितीन सोनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकरी फेब्रुवारी महिन्यात द्राक्ष पिके घेतात, पण या तंत्राच्या माध्यमातून आता शेतकरी मे-जूनमध्ये द्राक्ष पीक घेऊ शकतील. मे-जूनमध्ये येणारी द्राक्षे अधिक गोड असतील. पारंपारिक हंगामापेक्षा उत्पन्न अधिक असेल. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होईल आणि उत्पन्न वाढेल.
पाहा व्हिडीओ: