मुक्तपीठ टीम
महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची ऑफिशियल सिक्रेट अॅक्टखाली मुंबई पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. महाराष्ट्रात पोलीस बदल्यांमध्ये झालेल्या घोटाळ्याचा आरोप करत त्या समर्थनार्थ कॉल रेकॉर्डिंग सादर केल्यामुळे तसा आरोप करण्यात आला आहे. राज्यभर भाजपाने फडणवीसांच्या चौकशीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपाने राजकीय सूडबुद्धीतून राज्यातील आघाडी सरकार तसे करत असल्याचा आरोप केला आहे. तर आघाडीच्या नेत्यांनी भाजपाच्या नेत्यांना आरोप करण्याची सवय असून त्यांना उत्तर देणार नसल्याची भूमिका घेतली आहे. या निमित्तानं फडणवीसांची चौकशी होत असलेले प्रकरण नेमकं काय आहे, ते जाणून घेणं महत्वाचं आहे.
देवेंद्र फडणवीसांवर नेमके आरोप काय?
- फोन टॅपिंग प्रकरणी फडणवीस यांची चौकशी केली जात आहे.
- फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्याच्या माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांना महत्व मिळाले होते.
- त्यांनी बेकायदेशीररीत्या राज्यातील राजकीय नेत्यांचे फोन टॅप केले, असा आरोप आहे.
- त्या टॅपिंगचे रेकॉर्डिंग त्यांनी फडणवीस सत्तेतून बाहेर गेल्यावरही त्यांना पुरवले, असा आरोप आहे.
- फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर बदल्यांसाठी वसुलीचा आरोप केला.
- मुळात योग्य परवानगी न घेता फोन टॅपिंग हा गुन्हा आहे. तो रश्मी शुक्ला यांनी केल्याचा आरोप आहे. तसा गुन्हाही नोंदवण्यात आला आहे.
- सरकारी कामकाजाचा भाग असलेले असे रेकॉर्डिंग सरकारी यंत्रणेबाहेर पुरवणे हा ऑफिशियल सिक्रेट अॅक्टखाली गुन्हा मानला जातो.
- फडणवीस यांना शुक्ला यांनी पुरवले आणि फडणवीस यांनी ते उघड केले यामुळे ऑफिशियल सिक्रेट अॅक्टखाली गुन्हा असल्याचा पोलिसांचा दावा आहे.
- त्यासाठीच फडणवीसांची चौकशी होत आहे.