मुक्तपीठ टीम
अखिल भारतीय युवक काँग्रेस कमिटीने घेतलेल्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी प्रथमेश विकास आबनावे यांची ६३७७ एवढ्या मोठ्या मताधिक्क्याने निवड झाली आहे. आबनावे महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळाचे खजिनदार आणि संचालक असून, या निवडीबद्दल महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ संस्थेच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळाचे मानद अध्यक्ष आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी यांच्या हस्ते फुले पगडी, शाल, श्रीफळ, पुस्तक देऊन प्रथमेश आबनावे यांचा सत्कार झाला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, पीएमटीचे माजी चेअरमन चंद्रशेखर कपोते, पत्रकार राजेंद्र पंढरपुरे, महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळाचे सहसचिव पुष्कर प्रसाद आबनावे, प्रज्योत आबनावे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र प्रदेश युवक कार्यकारिणीसाठी महाराष्ट्रातून निवडलेल्या ४५ जणांच्या कार्यकारिणीत प्रथमेश आबनावे यांनी स्थान मिळवले आहे. चार पिढ्या काँग्रेसशी एकनिष्ठ असलेल्या आबनावे कुटुंबातील प्रथमेश आबनावे यांनी प्रथमच निवडणूक लढवली आणि जिंकली आहे. प्रथमेश यांचे वडील डॉ. विकास आबनावे पुणे शहर काँग्रेसमध्ये सरचिटणीस म्हणून कार्यरत होते.
प्रथमेश विकास आबनावे यांनी आपली ही निवड वडील दिवंगत डॉ. विकास मारुतराव आबनावे यांना समर्पित करत श्रद्धांजली वाहिली. मोहन जोशी यांनी या निवडणुकीची प्रक्रिया व या कार्यकारिणीत पद मिळण्याचे महत्व सांगितले. तसेच भविष्यातील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले.
“गांधी विचारांवर आधारित काँग्रेस पक्षाची ध्येय-धोरणे, पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांचे विचार, दृष्टीकोन समाजातील सर्वच स्तरांत पोहचवण्यासाठी, पक्ष संघठन मजबूत करण्यासाठी आणि तरुणांना काँग्रेस पक्षाशी जोडण्यासाठी काम करणार आहे.”
(-प्रथमेश विकास आबनावे, सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस)