मुक्तपीठ टीम
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणावर भीषण हानी झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या दृष्टिकोनात थोडा बदल झाला आहे, असं सांगितलं जातं. पुतिन यांनी युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित केली आहे, परंतु झेलेन्स्की सरकारसमोर कठोर अटीही ठेवल्या आहेत. युक्रेन सरकारने या अटी मान्य केल्या तरच पुतिन संपूर्ण शांततेसाठी तयार होतील. यामुळे सध्याची शांतता ही येणाऱ्या मोठ्या त्सुनामीच्या आधीची शांतता तर नाही ना, असा संशय व्यक्त होत आहे.
रशियाच्या शांततेसाठीच्या अटी
- सोमवारी, रशियन अध्यक्षीय कार्यालयाच्या प्रवक्त्याने पुतीन यांच्या अटींबददल माहिती दिली.
- युक्रेनला त्याचे सैन्य नष्ट करावे लागेल.
- कायमचा तटस्थ देश बनण्यासाठी संविधान बदलावे लागेल.
- क्रिमियाला रशियाचा भाग म्हणून मान्यता द्यावी लागेल.
- लुहान्स्क आणि डोनेस्टक हे सार्वभौम प्रांत म्हणून स्वीकारावे लागतील.
- प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह म्हणाले की, रशियाने युक्रेनला सांगितले आहे की कीव्ह सरकारने त्यांच्या अटी मान्य केल्यास ते तात्काळ लष्करी कारवाई थांबवण्यास तयार आहेत.
पंतप्रधान मोदींचे थेट झेलेन्स्कीशी चर्चा करण्याचे आवाहन
रशियाच्या या कठोर अटींनंतर युक्रेन त्यांना नाकारेल, असे मानले जात आहे. तेही जेव्हा युक्रेनचे सरकार आणि सैन्य रशियन सैन्याशी लढण्याच्या मानसिकतेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी ५० मिनिटांच्या संभाषणात युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी थेट संवाद साधण्याची विनंती केली.
रशियन सैन्याचा कीव काबीज करण्यासाठी प्रयत्नांची शक्यता
रशियाने राजधानी कीवजवळील गावे आणि शहरांमध्ये मोठ्या संख्येने सैन्य जमा केले आहे आणि मॉस्कोचे सैन्य येत्या काही दिवसांत राजधानी शहर ताब्यात घेईल. युक्रेनच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने हा दावा केला आहे. युक्रेनच्या अंतर्गत मंत्र्यांचे सल्लागार वदिम डेनिसेन्को यांनी रविवारी रात्री सरकारी युक्रेनियन टीव्हीला सांगितले की पुढील काही दिवसांत एक महत्त्वपूर्ण लढाई अपेक्षित आहे. “रशियन (लष्करी) उपकरणे आणि मोठ्या संख्येने रशियन सैन्य कीवमध्ये जमले आहे,” सल्लागार म्हणाले. आम्हाला समजते की कीवसाठीची लढाई ही एक महत्त्वाची लढाई आहे जी आगामी काळात लढली जाईल.