तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना अखेर ईडीनं अटक केली. ही अटक करताना त्यांनी केलेली जमीन खरेदी, तिचे बॉम्बस्फोट आरोपींच्या माध्यमातून माफिया डॉन दाऊद इब्राहिमपर्यंत लिंक दाखवली गेली आहे. पहाटे साडेचार वाजता मलिकांच्या घरी पोहचण्याची घाई केली. दुपारी पावणेतीन वाजता त्यांना अटक करण्यात आली.
पाच मिनिटात पाच मुद्दे समजून घेवूया.
वेळ
नवाब मलिकांच्याविरोधात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केले ते दिवाळीनंतर त्याला आता काही महिने झाले. खरंतर जर जसा आरोप आहे तसं असेल तर माफिया डॉन दाऊद इब्राहिमसारख्या देशद्रोह्याशी संबधित प्रकरण असल्याने तातडीनं कारवाई होणे अपेक्षित होते. पण तसं झालं नाही. अर्थात राजकारणात वेळेचं वेगळं महत्व असतं. त्यामुळे राजकारणी योग्य आपल्या सोयीचं टायमिंग साधतात. मलिकांविरोधात ईडी पिडेचा टायमिंगही असाच सत्ताधारी भाजपाच्या सोयीचा आहे.
उत्तर प्रदेश निवडणूक
उत्तर प्रदेशातील विधान सभेच्या निवडणुकीचे तीन टप्पे बाकी आहेत. त्याआधी दाऊदसारख्या देशद्रोह्याशी संबधित कुणीही असलं तरी आम्ही कारवाई करतो, अशी प्रतिमा तयार करतानाच भाजपाविरोधातील पक्ष कसे देशद्रोह्यांशी संबंध राखून आहेत, असं चित्र रंगवण्याचाही प्रयत्न असू शकतो. असे अनेकांचे मत आहे.
समीर वानखेडे
समीर वानखेडे एनसीबीत असताना त्यांनी केलेल्या अनेक कारवाया या भाजपासाठी राजकीय मुद्दे पुरवणाऱ्या तर राज्यातील सत्ताधाऱ्यांसाठी अडचणीच्या होत्या. त्यामुळे समीर वानखेडेंविरोधात पुराव्यांचा दारुगोळा जमवत आघाडी सरकारने त्यांच्या अटकेपर्यंतची तयारी केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणेच्या एका अधिकाऱ्याला ज्या दिवशी महाराष्ट्र पोलिसांसमोर हजर व्हावं लागलं त्याच दिवशी केंद्रीय यंत्रणेनं राज्य सरकारच्या मंत्र्याला अटक करावं, हा नक्कीच योगायोग नसावा.
दाऊद इब्राहिम
नवाब मलिकांना जमीन खरेदी प्रकरणात अटक झाली असती तरी तेवढा मोठा राजकीय फायदा नसता झाला. त्यात गेले आठवडाभर माफिया डॉन दाऊद इब्राहिमच्या मनी लाँडरिंगचं प्रकरण चर्चेत आणत त्याच्याशी लिंक जोडत मलिकांना अटक झाल्यानं वेगळं महत्व आलं आहे. मुंबईच नाही तर महाराष्ट्रासाठी १९९३चे बॉम्बस्फोट आजही मनाला वेदना देणारा विषय. त्यातही दाऊद म्हटलं की भळभळती जखम. त्याच्याशी संबंधित जमीन खरेदीत मलिकांचा संबंध दाखवल्यानं मलिकांच्या पक्षाबद्दल दाऊदसारख्यांच्या देशद्रोह्याशी संबंध दाखवत जोरदार प्रचार करता येतो.
मलिकांवर नजर, लक्ष्य शरद पवार आणि ठाकरे सरकार!
दाखवण्यासाठी यावेळी नवाब मलिकांवर भाजपाची ईडीची वक्रदृष्टी असली तरी खरं लक्ष्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि ठाकरे सरकारच असावं, अशी शक्यता आहे. एक लक्षात घ्या, १९९०नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याविरोधात अशीच दाऊदशी संबंध असल्याचा आरोप करणारी मोहीम राबवली गेली. ती बदनामी पवार यांचं मोठं राजकीय नुकसान करणारी ठरली. आता शरद पवार कारकीर्दीच्या या टप्प्यात राष्ट्रवादीला सर्वात प्रभावी बनवण्याचा प्रयत्न करत असताना हा घाव मोठं नुकसान करणारा ठरेल, अशी रणनीती असावी. तसंच तुम्ही सत्तेसाठी अशा पक्षासोबत राहणार का, असा मुद्दा मांडत शिवसेनेलाही अस्वस्थ करत ठाकरे सरकार पाडण्याचाही प्रयत्न असू शकतो. कारण महाराष्ट्राच्या राजकारणात आता आघाडीतील एक पक्ष सोबत असल्याशिवाय सत्ता मिळवणं भाजपाला शक्य नाही.
अर्थात हे पाच मुद्दे असे असले तरी राजकारणाचा चित्रपट जशी पटकथा लिहिली जाते तशीच जाते असं नसतं. अनेकदा अखेर वेगळाच होतो. आताही भाजपाविरोधकांचा गेम करणारा सिलेक्टिव्हनेस आणि टायमिंग यामुळे केंद्रीय यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे सरकारबद्दल सहानुभुती निर्माण होवून ही कारवाई भाजपासाठीच अडचणी ठरली तरी आश्चर्य वाटायला नको.
राजकारणाचा पिक्चर नेहमीच बाकी असतो…अंत कधीच नसतो.
मुक्तपीठ पाच मिनिटं सरळस्पष्टमध्ये इथंच थांबूया.
तुम्ही मुक्तपीठचं यूट्युब चॅनल नक्की सबस्क्राइब करा, फेसबूक पेज लाईक करा आणि ट्विटर, कू, इंस्टा, व्हॉट्सअॅप, टेलीग्रामवरही मुक्तपीठसोबत राहा.
मुक्तपीठ
बजावा हक्क, व्हा अभिव्यक्त!