मुक्तपीठ टीम
सामान्य जनतेमध्ये प्राणी क्लेश प्रतिबंधक कायदा तसेच प्राण्यांविषयीच्या विविध समस्या या विषयी प्रभावी जनजागृती करणे आवश्यक असल्याचे मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा प्राणी क्लेश समितीचे अध्यक्ष राजीव निवतकर यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात मुंबई शहर जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीच्या सभेत ते बोलत होते. यावेळी मुंबई शहर जिल्हा प्राणी क्लेश समितीचे सदस्य उपस्थित होते. यावेळी त्यांनी भटके व पाळीव प्राणी यांना माफक दरात वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी मुंबईत शासकीय वैद्यकीय केंद्रांच्या स्थापनेसाठी प्रयत्न करणार असल्याचे जाहीर केले.
जिल्हाधिकारी श्री.निवतकर म्हणाले, मुंबई शहरातील भटके व पाळीव प्राणी यांना माफक दरात उच्च प्रतिच्या वैद्यकीय सेवा मिळण्याकरिता मुंबई शहरातील विविध भागात शासकीय वैद्यकीय केंद्र स्थापन करण्याकरिता जागा उपलब्ध करण्यासाठी पत्रव्यवहार करुन जागा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. मुंबई शहरातील प्राण्यांचे होणारे अपघात, पाळीव प्राणी किंवा भटक्या प्राण्यांची संख्या याविषयी माहिती घेण्याचे तसेच दवाखाना स्थापन करण्यासाठी मुंबई महानगरपालिका, राज्य शासन समन्वयाने काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्राण्यांविषयी येणाऱ्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱी आणि पोलीस विभागासह भरारी पथक स्थापन करुन तक्रारींचे निवारण करण्यात यावे. प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीच्या सर्व शासकीय आणि अशासकीय सदस्यांचा एक व्हॉट्स्अप ग्रुप तयार करुन प्राण्यांविषयी विविध माहिती, सूचना यांचे आदान-प्रदान करण्यात यावे. तसेच यासंदर्भात वेबसाईटही तयार करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. निवतकर यांनी दिल्या.
पाळीव, भटके प्राणी आणि मानव यांच्यातील संघर्ष टाळण्याकरिता वातावरण तयार करण्यात यावे, याकरिता जनजागृतीपर साहित्य तयार करताना प्राणी कल्याणाविषयी असलेले कायदे तसेच प्राणी क्लेशाविरुद्ध कायदेशीर तरतुदी यांची व्यापक प्रसिद्धी करावी. तसेच जनजागृतीपर साहित्य तयार करताना प्राणी क्लेश टाळण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे जिल्हाधिकारी यांनी निर्देश दिले.