मुक्तपीठ टीम
पंतप्रधान मोदींनी देशात कोरोना पसरवल्याचा आरोप महाराष्ट्र काँग्रेसवर केला. मात्र गुजरातमधील वस्तुस्थितीचा आढावा देत काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. गुजरातमध्ये १० हजार मृत्यु दाखवले आणि सर्वोच्च न्यायालयातील आकडेवारीच्या आधारे ८२ हजार लोकांना मदत देण्यात आली याचा अर्थ आकडा मोठ्या प्रमाणात लपवले, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
- कोरोनामुळे गुजरातमध्ये १० हजारांच्या आसपास मृत्यू झाल्याची अधिकृत आकडेवारी राज्य सरकारने दिली होती.
- त्यामुळे मृतांचे प्रमाण कमी असल्याबद्दल भाजपा नेत्यांनी स्वत:ची पाठही थोपटून घेतली.
- परंतु, कोरोना मृतांच्या नातेवाईकांना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आल्यावर मदतीसाठी आतापर्यंत एक लाख दोन हजार २३० अर्ज दाखल झाले तसेच ८७ हजार ४५ जणांना मदत मंजूर करण्यात आली असून, ८२ हजार ६०५ जणांना मदत वाटप करण्यात आले आहे.
गुजरातमध्ये अचानक लाभार्थी वाढतायत…
- सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आलेल्या या आकडेवारीचा दाखला देत काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी भाजपावर टीका केली.
- देशात सर्वाधिक कोरोना मृत्यू महाराष्ट्रात झाले.
- मात्र, कोरोना मृत्यूचे आकडे लपविणाऱ्या गुजरातमध्ये अचानक लाभार्थी वाढत आहेत.
- महाराष्ट्रात आम्ही पूर्वीच जाहीर केल्याप्रमाणे एक लाख ४२ हजार ७०५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, दोन लाख २७ हजार मदतीचे अर्ज आले आहेत.
- त्यापैकी दोनदा दाखल झालेले ६१ हजार ८४८ अर्ज फेटाळण्यात आले असून, एक लाख ३२ हजार कुटुंबाना मदत वाटप करण्यात आले आहे.
- राज्याने कोणतेही आकडेवारी लपवली नाही.
गुराजमधील वस्तुस्थितीबद्दल मोदी मौन का?
- मोदी यांनी कोरोनाप्रसारासाठी काँग्रेसला जबाबदार धरले.
- हा आरोप निराधार आहेच पण, गुराजमधील वस्तुस्थितीबद्दल मोदी मौन का बाळगतात.
- राज्यात कोरोना वाढल्यानंतर भितीपोटी लोक मिळेल त्या मार्गाने आपापल्या राज्यात परतत होते.
- राज्य सरकारने या कामगारांना सरकारच्या खर्चाने त्यांच्या राज्यात पाठविले.
- मात्र, गुजरात आणि मध्यप्रदेशातील भाजपाशासित सरकारांनी कामगारांना राज्याच्या सीमेवर अडवून त्यांचा छळ केला होता.