मुक्तपीठ टीम
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची ३० जानेवारी १९४८ रोजी वयाच्या ७८ व्या वर्षी नथुराम गोडसेने हत्या केली होती. महात्माजींच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी ३० जानेवारीचा दिवस शहीद दिन म्हणून साजरा करण्यात येतो. देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठीही हा दिवस साजरा केला जातो. पण हत्येपूर्वीही पाचवेळा गांधीजींचा जीव घेण्याचे घातकी प्रयत्न झाले होते.
अहिंसेचा ध्वज फडकावणारे ‘राष्ट्रपिता’ महात्मा गांधी
- २ ऑक्टोबर १८६९ रोजी मोहनदास करमचंद गांधी पोरबंदर येथे जन्मले.
- त्यांचा महात्मा गांधी होण्याचा प्रवास हा सत्याग्रह, अहिंसा आणि नैतिकतेच्या मार्गानेच होता.
- महात्मा गांधींनी भारतात परत येण्यापूर्वी आणि ब्रिटिश राजवटीविरुद्ध स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व करण्यापूर्वी इंग्लंडमध्ये घेतले.
- त्यानंतर दक्षिण आफ्रिकेत श्वेतवर्णियांच्या भेदभावपूर्ण सत्तेविरोधातही त्यांनी संघर्ष केला.
- त्यांनी भारतात परतून ‘अहिंसेचा’ झेंडा फडकावला.
- बलाढ्य इंग्रजांशी अहिंसक आंदोलने करून लढा दिला.
- प्रेमाने ‘बापू’ म्हटलं जाणाऱ्या महात्मा गांधींचे सत्य, अहिंसा, साधेपणाचे विलक्षण व्यक्तिमत्त्व होते.
- खरंतर फाळणी झाली तर ती माझ्या देहाचे तुकडे होतील एवढी कडवट भूमिका घेणाऱ्या महात्मा गांधींनाच हिंदुत्ववाद्यांनी फाळणीसाठी जबाबदार ठरवत अपप्रचार केला.
- नथुराम गोडसे हा अशा प्रवृत्तींपैकीच एक होता.
नथुरामने प्रार्थना सभेनंतर केली गांधीजींची हत्या…
- नथुराम गोडसेने आधीचे कट फसल्यानंतर अखेर ३० जानेवारी १९४८ रोजी घात केला.
- दिल्लीतील बिर्ला हाऊसमध्ये संध्याकाळच्या प्रार्थना सभेतून उठत असताना महात्मा गांधींची हत्या झाली.
- नथुराम गोडसेने गांधींच्या छातीत तीन गोळ्या झाडून त्यांची हत्या केली.
- या घटनेने संपूर्ण जग हादरले. ५.गोडसेला अटक करून फाशीची शिक्षा झाली.
गांधीजींच्या हत्येचे पाच अयशस्वी घातकी प्रयत्न…
नथुरामकडून अंतिम जीवघेणा आघात सोसण्यापूर्वी, गांधींच्या हत्येचे पाच अयशस्वी प्रयत्न झाले होते
१. २५ जून १९३४ मध्ये झालेला पहिला हल्ला
पुण्यात गांधीजी भाषण देण्यासाठी आले होते, तेव्हा कटकर्त्यांनी कारमध्ये बापू असल्याचे समजून बॉम्बस्फोट केला होता.
२. जुलै १९४४ मध्ये झालेला दुसरा हल्ला
गांधींच्या विसाव्यासाठी पाचगणी येथे जाण्याचे ठरले होते आणि येथेच आंदोलकांच्या एका गटाने गांधीविरोधी घोषणा देण्यास सुरुवात केली. गांधींनी गटाचे नेते नथुरामला चर्चेसाठी आमंत्रित केले, जे नंतर नाकारण्यात आले. नंतर, प्रार्थना सभेच्या वेळी गोडसे गांधीजींकडे खंजीर घेऊन धावताना दिसला, पण सुदैवाने मणिशंकर पुरोहित आणि साताऱ्याच्या भिलारे गुरुजींनी त्याचा सामना केला.
३. सप्टेंबर १९४४ मध्ये झालेला तिसरा हल्ला
महात्मा गांधींनी सेवाग्राम ते बॉम्बे प्रवास केला. जिथे मुहम्मद अली जिना यांच्याशी चर्चा सुरू होणार होती, तेव्हा नथुराम गोडसेने त्यांच्या टोळीसह गांधींना मुंबई सोडू नये म्हणून आश्रमात गर्दी जमवली. त्यानंतरच्या तपासादरम्यान डॉ. सुशीला नायर यांनी उघड केले की आश्रमातील लोकांनी नथुराम गोडसेला गांधींपर्यंत पोहोचण्यापासून रोखले आणि त्याच्याजवळ एक खंजीर सापडला.
४. जून १९४६ मध्ये झालेला चौथा हल्ला
गांधी स्पेशल ट्रेनने पुण्याला जात असताना गांधींना मारण्याचा आणखी एक प्रयत्न झाला. रुळांवर ठेवलेल्या दगडांवर ट्रेन आदळली आणि चालकाने आपल्या कौशल्याने परिस्थिती हाताळली. मात्र, नेरुळ आणि कर्जत स्थानकादरम्यान या ट्रेनचा अपघात झाला ज्यामध्ये गांधीजी बचावले.
५. २० जानेवारी १९४८ मध्ये झालेला पाचवा हल्ला
बिर्ला भवन येथे झालेल्या सभेत बापूंवर पुन्हा हल्ला करण्याचा कट रचण्यात आला. मदनलाल पाहवा, नथुराम गोडसे, नारायण आपटे, विष्णू करकरे, दिगंबर बैज, गोपाळ गोडसे आणि शंकर किस्तैय्या यांनी बैठकीला उपस्थित राहण्याची योजना आखली होती. त्या व्यासपीठावर बॉम्ब फेकायचा होता आणि नंतर गोळी मारायची होती. पण सुदैवाने, मदनलाल पकडला गेला आणि सुलोचना देवींनी वेळेत ओळखले म्हणून तो कट फसला.