– अजिंक्य घोंगडे नांदेड
आज शेतकरी तात्काळ पैसे मिळवून देणाऱ्या ऊसासारख्या नगदी पीकाच्यामागे धावत आहे, मात्र केवळ अडीच एकरच्या क्षेत्रात विविध भाजीपाल्याच्या उत्पादनातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळविण्याचं काम नांदेड जिल्ह्यातील मुगट गावाच्या अंकुश जाधव या तरुण शेतकऱ्याने करुन दाखवलं आहे.
नांदेड पासुन ८ कि.मी अंतर असलेल्या मुगट ह्या गावी राहणारे अंकुश जाधव केवळ अडीच एकर शेतात महिन्याकाठी एक लाखा पर्यंतचा फायदा मिळवत आहेत.
१० वी पर्यंत शिक्षण झालेले अंकुश जाधव यांनी आपल्या शेतात कांदा, कोबी, पालक, कोथिंबीर, मेथी, टोमॅटो, पुदीना, वांगे यांसह इतरही वेगवेगळी पीके घेतात. वर्षा काठी अंकुश यांना ६ ते ८ लाख पर्यंतचे उत्पादन मिळते.
अंकुशची शेतजमीन तशी फार चांगली नाही. त्याने आपल्या ओसाड खडकाळ जमिनीत भाजीपाला उत्पादन करायला सुरूवात केली. शेतजमिनीत कांदा, कोबी, कोथिंबीर, पुदिन्यासह अनेक प्रकारच्या भाजीपाल्याचे उत्पादन घेऊन लाखो रुपये कमवू लागला आहे.
विशेष म्हणजे त्यांनी त्यासाठी फार खर्च केला नाही. किंवा नगदी पिकांचा, झटपट नफ्याचा हव्यासही धरला नाही. फक्त योग्य नियोजनाचा मार्ग निवडला, ते ऋतूनुसार पीक घेत असतात. दर वेळी ते विविध पिकाचे प्रयोग करतात. ते आपल्या तीन भाऊ, पत्नी, मुलासह पूर्ण वेळ शेतीच करतात. संपुर्ण मुगट गावात ते एकमेव भाजीपाला शेती करणारे शेतकरी आहेत.
अंकुश जाधव कोबी, मिरची, वांगी, टोमॅटो नांदेड जिल्ह्यातील विविध तालुक्यात मार्केटमध्ये नियमित विक्रीसाठी पाठवितात. तसेच, नांदेड, लातूर या ठिकाणी ते मालाची विक्री करतात. पुढील काळात तर मराठवाड्यातील विविध बाजारापेठेतही आपला भाजीपाला काही प्रमाणात पाठविण्याचा त्यांचा प्रयत्न करत असेल.
या कामात त्यांच्यासोबत घरातील तीन भाऊ, पत्नी, भावाची पत्नी मुलगा अहोरात्र शेतात राबत आहेत. अपार कष्टातून काळया आईची सेवा करुन मोठया प्रमाणावर भाजीपाल्याचं उत्पादन घेत आहेत. जाधव कुटुंबियांनी अपार जिद्द आणि कष्टातून पिकविलेल्या भाजीपाल्यास बाजारपेठेत मोठी मागणी आहे. भाजीपाला हा नांदेड विभागात राहणाऱ्या लोकांचा महत्वाचा घटक असून हा तरुण शेतकरी दररोज ताजा आणि दर्जेदार भाजीपाला लोकांना पुरवित असल्याने त्यांच्या भाजीपाल्याला बाजारपेठेत मोठी मागणी आहे.
अंकुश जाधव सांगतात की, “ शेतकऱ्यांनी खचून न जाता त्या संकटाला समोर जावे. कोणत्याही संकटावर मात करण्याची क्षमता शेतकऱ्यांमध्ये आहे. कष्टाने आणि जिद्दीने शेतकऱ्यांनी समस्येतून मार्ग काढणं गरजेचं आहे.”
कोथिंबीरमधून दररोज हजाराची कमाई
ते लागवड केलेली कोथिंबीरही दररोज थोडी-थोडी काढून बाजारात ताजीच विकतात. त्यामुळे कोथिंबीरीतून दररोज एक हजार रूपये उत्पन्न मिळते.
भेंडी लागवड
अंकुश सांगतात की, “भेंडी कोणत्याही प्रकारच्या जमिनीत लावता येऊ शकते. मात्र त्या जमिनीत खत व कार्बनिक द्रव्यांची कमतरता असता कामा नये. भेंडीचे जास्त उत्पन्न येण्यासाठी जमीन भुसभुसीत असणे आवश्यक आहे. शेतात 3 वेळा नांगर फिरवावे म्हणजे मातीची ढेकळे फुटून माती भुसभुशीत होईल.” त्यातूनही त्यांना चांगले उत्पन्न मिळते.
पालक लागवड
पालक हे पीक खूप कमी दिवसात येणारे पीक आहे. पालकची लागवड एप्रिल व मे महिना सोडून बाकी सर्व ऋतूंमध्ये करतात. पालकही त्यांच्यासाठी दहा महिने उत्पन्नाचे महत्वाचे साधन आहे.