मुक्तपीठ टीम
प्रदीर्घ काळ शारीरिक संबंध ठेवल्यानंतर जर कोणी लग्नास नकार देत असेल, तर ती फसवणूक मानता येणार नाही, असे मत पालघरमधील एका तरुणाला दोषी ठरवण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या निकालात बदल करताना मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. याआधीही उच्च न्यायालयाने सप्टेंबरमध्ये औरंगाबादच्या एका तरुणाच्या दीर्घकाळाच्या शारीरिक संबंधांनंतर विवाहाला नकार म्हणजे बलात्काराचा गुन्ह्याचे कारण ठरू शकत नाही, असा निकाल दिला होता.
पालघरमधील गुन्ह्यातील निकाल
- पालघर येथील एका तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिच्या प्रियकराविरोधात कलम ३७६ आणि ४१७ नुसार बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप प्रेयसीने केला होता.
- या प्रकरणात, अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी काशिनाथला बलात्काराच्या आरोपातून मुक्त केले होते, परंतु फसवणूक केल्याप्रकरणी दोषी ठरवले होते.
- लग्नाच्या आश्वासनावर तीन वर्षे संबंध ठेवल्याप्रकरणी आणि नंतर तो नाकारल्याप्रकरणी न्यायालयाने काशिनाथला एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती.
मुंबई उच्च न्यायालयाकडून फसवणुकीचा आरोपातूनही मुक्तता
- प्रियकराने या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले.
- न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या एकल खंडपीठासमोर सुनावणी झाली.
- त्यांनी फसवणुकीच्या आरोपातून त्या प्रियकराला निर्दोष मुक्त केले.
- न्यायमूर्ती प्रभुदेसाई म्हणाले की, वस्तुस्थिती दर्शवते की, महिला आणि आरोपीमध्ये तीन वर्षांपासून शारीरिक संबंध होते आणि दोघांचे प्रेमसंबंध होते. न्यायमूर्ती म्हणाले की, महिलेच्या जबाबावरून तिची कोणत्याही प्रकारे फसवणूक केल्याचे सिद्ध होत नाही.
या खटल्याच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने अशा प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचा संदर्भ दिला.
न्यायालयाने म्हटले की, दोन गोष्टी सिद्ध कराव्या लागतील, पहिली म्हणजे खोटी माहिती देऊन लग्नाची चर्चा झाली.
दुसरे म्हणजे, वचन चुकीचे होते आणि त्याच्या भ्रमात महिलेने शारीरिक संबंध ठेवण्यास सहमती दिली.
चुकीची माहिती देऊन शारीरिक संबंधांचा पुरावा नाही!
- उच्च न्यायालयाने सांगितले की, या प्रकरणात आरोपीला महिलेशी लग्न करायचे नव्हते हे दाखवणारा कोणताही पुरावा नाही.
- खोटी माहिती देऊन महिलेला आरोपीने शारीरिक संबंध ठेवण्यास प्रवृत्त केले होते, हे सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे नाहीत.
- त्यामुळे प्रदीर्घ नातेसंबंधानंतर लग्न करण्यास नकार दिल्याबद्दल तिला फसवणूक केल्याबद्दल दोषी ठरवता येणार नाही.