मुक्तपीठ टीम
चीन आणि पाकिस्तानी नौदलांचे सहकार्य आणि पाकिस्तानी नौदलाचे आधुनिकीकरण हा भारतीय नौदलाचा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे भारतीय नौदलाचे अरबी समुद्र आणि हिंदी महासागरात येणा-या चिनी युद्धनौकांवर लक्ष आहे, अशी माहिती भारतीय नौदलाच्या पश्चिम विभागाचे ध्वजाधिकारी व्हाईस अॅडमिरल अजेंद्र बहादूर सिंह यांनी ‘आयएनएस कोलकाता ’या अत्याधुनिक नौकेवर झालेल्या वार्तालापात दिली. पाकिस्तानी व चिनी नौदलाचे सध्याचे वाढते सहकार्य हे आपल्यासाठी चिंतेचा विषय आहे. त्यामुळे आपल्यासमोर वेगळी आव्हानेही उभे राहू शकतात, असेही ते म्हणाले.
बांग्लादेश युद्धात मिळालेल्या विजयाच्या स्मृतीप्रीत्यर्थ गेल्या काही वर्षांपासून दरवर्षी डिसेंबरमध्ये नौदल दिन साजरा केला जात आहे. यानिमित्ताने नौदल नौकांवर वार्ताहर परिषद आयोजिली जाते. मात्र कोरोनामुळे गेली दोन वर्षे हा वातार्लाप झाला नव्हता. अनेक वरिष्ठ अधिका-यांच्या उपस्थितीत शुक्रवारी हा वार्तालाप झाला. योगायोगाने अजेंद्र बहादूर सिंह यांनी पदभार स्विकारल्यानंतर त्यांची ही पहिलीच पत्रकार परिषद झाली.
“महिलांचे सक्षमीकरण करण्याचे भारत सरकारचे उद्दिष्ट आहे. त्या अनुषंगाने नौदलातील महिला अधिका-यांनाही देशाची सेवा करण्यासाठी नौकांवर अतिरिक्त संधी उपलब्ध करुन दिली व त्या दिशेने विविध उपाययोजना केल्या आहेत. जवळपास सर्व प्रमुख युद्धनौकांवर विविध विभागांतील ४० महिला अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे,” अशी माहिती व्हाईस अॅडमिरल सिंह यांनी दिली.