मुक्तपीठ टीम
शेवटी मोदी सरकारला झुकवण्याचे काम देशातील शेतकऱ्यांनी केले आहे. हा विजय शेतकऱ्यांचा लोकशाही व्यवस्थेचा विजय आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली. त्यावर बोलताना नवाब मलिक यांनी शेतकऱ्यांच्या विजयाचे कौतुक केलेच शिवाय प्राण गमावलेल्या शेतकऱ्यांना अभिवादन केले आणि मोदी सरकारला लढ्याच्या रुपाने मनमानी कारभार चालणार नाही हे शेतकऱ्यांनी दाखवून दिल्याचे माध्यमांसमोर बोलताना सांगितले.
आज तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. हा देशातल्या शेतकऱ्यांचा मोठा विजय आहे. इतिहासाच्या पानावर लिहिला जाईल असा हा ऐतिहासिक निर्णय झाला आहे असेही नवाब मलिक म्हणाले.
‘झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए’
तीनों कृषि कायदे वापस लिए गए,
हमारे देश के किसानों को मेरा सलाम और शहीद किसानो को अभिवादन— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 19, 2021
जे शेतकरी तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत यासाठी लढा देत होते त्यांना भाजपच्या लोकांनी खलिस्तान्यांचे आंदोलन असे संबोधले. राष्ट्रविरोधी आंदोलन असल्याचा आरोप झाला. अन्याय अत्याचार सहन करत शेतकरी आंदोलन करत राहिले. शेतकऱ्यांची चिरडून हत्या करण्यात आली. यात शेकडो शेतकऱ्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. सात वर्षात आम्ही करु तोच कायदा या भूमिकेतून मोदी सरकार काम करत होते मात्र देशभरात शेतकऱ्यांनी केलेले तीव्र आंदोलन लक्षात घेता त्याचा फटका आगामी उत्तरप्रदेशमध्ये आणि पंजाब निवडणुकीत बसेल या कारणाने हे तिन्ही कृषी कायदे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रद्द केल्याची टीकाही नवाब मलिक यांनी केली.
ताकदीने इमानदारीने लढा उभारला तर त्यात यश हे नक्की मिळते. वर्षभर हा लढा चालला त्याचे हे यश आहे. या देशात यापुढे मनमानी कारभार चालणार नाही हे या लढयाने दाखवून दिले आहे असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला आहे.