मुक्तपीठ टीम
विकास म्हटलं की विनाश ठरलेलाच, असाच अनेकदा समज होतो. हा गैरसमज होण्याचे कारण निसर्गाच्या हानीचा विचार करत, ती टाळण्याची व्यवस्था करतही विकास होऊ शकतो हेच अनेकांना पटत नाही. त्यातही सत्तेत बसलं की मनमानीचं प्रदूषण होतं आणि काहीच चुकीचं वाटत नाही. पण नागपूर ते सिवनी राष्ट्रीय महामार्ग ४४चा २९ किलोमीटरचा टप्पा अपवाद आहे. मोहगाव-ख्वासा दरम्यान हा महामार्ग तयार करण्यात आला आहे. हा देशातील पहिला साउंड अॅंड लाइट प्रूफ चौपदरी महामार्ग आहे. निसर्गाशी फारशी छेडछाड न करता विकासाचे उत्तम उदाहरण हा पर्यावरणस्नेही महामार्ग उदयास आलाय. हा महामार्ग ९५० कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आला आहे. या महामार्गाखालील अंडरपासमधून वाघांसह इतर वन्यप्राणी मोठ्या प्रमाणावर जा ये करतात.
महामार्गावर नॉइज बॅरियरचा पहिल्यांदाच वापर
- देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच महामार्ग आहे, ज्यावर २९ किमी रस्त्याच्या दोन्ही बाजूला नॉईज बॅरिअर्स वापरण्यात आले आहेत.
- दोन्ही बाजूंना ध्वनी प्रतिबंधक बसवल्यामुळे अवजड वाहनांचा हलका व मोठा आवाज वन्य प्राण्यांपर्यंत पोहोचत नाही. याच कारणामुळे या रस्त्याला देशातील पहिला ध्वनी आणि प्रकाशरोधक रस्ता म्हणूनही नाव मिळाले आहे.
साउंड अॅंड लाइट प्रूफ महामार्गामध्ये अॅनिमल अंडरपासचे बांधकाम
- पेंच राष्ट्रीय उद्यानातील घनदाट जंगल आणि बफर परिसरातून जाणाऱ्या या साउंड अॅंड लाइट प्रूफ महामार्गामध्ये १४ अॅनिमल अंडरपास बनवण्यात आले आहेत.
- हे अॅनिमल अंडरपास या रस्त्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. ३. मोहगाव-कुरई दरम्यान ११ अॅनिमल अंडरपास बांधण्यात आले आहेत.
- रुखडमध्ये बांधण्यात आलेला अॅनिमल अंडरपास १४०० मीटर लांब आहे.
- उड्डाणपुलावर बांधण्यात आलेल्या सर्व अॅनिमल अंडरपासमुळे वन्य प्राण्यांना कोणत्याही अडथळ्याशिवाय फिरता येईल.
- सर्व प्राण्यांच्या अंडरपासमध्ये विशेष पेंटिंग करण्यात आली आहे जेणेकरून ते खाली जात असताना त्यांना जंगलासारखे वाटावे.
पेंच-कान्हा कॉरिडॉरमुळे वर्षानुवर्षे केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयात मंजुरीसाठी रखडलेल्या या महत्त्वाकांक्षी रस्ते प्रकल्पाचे काम अखेर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १० ऑगस्ट २०१८ रोजी सुरू केले. हा रस्ता तयार करणाऱ्या दिलीप बिल्डिकॉन कंपनीला मार्च २०२१ पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते, आणि दीड महिन्यापूर्वीच प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे.
नितीन गडकरींनी कौतुक केले
- देशाचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनाही हा साउंड अॅंड लाइट प्रूफ महामार्ग खूपच आवडला आहे.
- या महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले होते, त्यानंतर त्यांनी कुरई घाट विभागाची पाहणी केली.
- रुखड येथे बांधलेल्या सर्वात लांब अॅनिमल अंडरपासच्या खालीही ते गेले. तेव्हाही त्यांनी या प्रकल्पाच्या कामाचे भरभरून कौतुक केले होते.