मुक्तपीठ टीम
मराठी भाषा विभागांतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या ‘प्रबोधन मधील प्रबोधनकार’ या त्रिखंडात्मक ग्रंथाचे प्रकाशन शनिवारी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते झाले. प्रबोधनकारांनी १०० वर्षांपूर्वी प्रकाशित केलेल्या ‘प्रबोधन’ या नियतकालिकातील लेखांचा हा संग्रह आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या धर्माविषयी असलेल्या विचारांवर भाष्य केलं. “धर्म हा घराच्या आत ठेवायचा असतो. घराच्या बाहेर देश हाच आमचा धर्म आहे. पण कुणी त्याच्या धर्माची मस्ती घेऊन माझ्यासोबत उभा राहिला तर मग मला एक कडवट देशाभिमानी, राष्ट्रभिमानी हिंदू म्हणून त्याच्यासमोर उभं राहण्याशिवाय पर्याय नाही. मी कडवट हिंदू म्हणून उभा राहीन”, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
प्रबोधनकारांचा नातू हे माझे भाग्य
- मुख्यमंत्री असताना माझ्या हस्ते ग्रंथाचे प्रकाशन होत आहे. हा योगायोग आहे.
- माझ्या दृष्टीने मुख्यमंत्रीपद हा बहुमान आहे.
- पण प्रबोधनकारांचा नातू हे माझे भाग्य आहे.
प्रबोधनकारांच्या गोष्टींमधून आमची जडणघडण!
- जु्न्या मातोश्रीमधील हॉलमधील सोफ्यावर प्रबोधनकार मांडी घालून बसायचे आणि आम्हा नातवंडांना गोष्टी सांगायचे.
- प्रबोधकारांनी त्यांच्या आयुष्यातील गोष्टी सांगितल्या.
- त्यातून आमची जडणघडण झाली.
‘ते’ प्रबो’धन’ माझ्याही पेटाऱ्यात आहे
- आयुष्यातील अनुभवाच्या गोष्टी आम्हाला सांगितली.
- त्यातून आमची जडणघडण झाली.
- कालच दसरा झालेला आहे.
- मला काय बोलायचं ते मी बोललेलो आहे.
- ते बोलताना हेही मी सांगितलंय, हे जे शब्दांचे धन आहे, ‘ते’ प्रबो’धन’ माझ्याही पेटाऱ्यात आहे.
- पण काही वेळेला बोलण्याचं धाडस, कारण लोकशाहीत मत लागतं, त्यासोबत धाडसही लागतं.
- मत नाही मिळालं तरी चालेल, पण हिंमत पाहिजे.
…तर मी कडवट हिंदू म्हणून उभा राहीन!
- “प्रत्येकाला धर्म आहे.
- पण माणूस आधी माणूस म्हणून जन्माला येतो.
- त्यानंतर जात-पात धर्म त्याला चिपकवली जातात.
- मग काय करायचं?
- नास्तिकच व्हायचं का? नाही, अजिबात नाही.
- तुम्ही धर्म जरुर पाळा.
- धर्माचं पालन जरुर करा.
- पण तो सर्व अभिमान आपापल्या घरात ठेवा.
- घराबाहेर पडताना हा देश माझाच धर्म हीच धारणा असली पाहिजे.
- ही भावना घेऊन घराबाहेर पडल्यानंतर कुणी त्याच्या धर्माची मस्ती होऊन माझ्यासोबत उभा राहिला तर मग मला एक कडवट देशाभिमानी, राष्ट्रभिमानी हिंदू म्हणून त्याच्यासमोर उभं राहण्याशिवाय पर्याय नाही.
- मी कडवट हिंदू म्हणून उभा राहीन.
पितृपक्ष चांगला की वाईट?
- आता पितृपक्ष होऊन गेला.
- पितृपक्ष चांगला की वाईट?
- पितृपक्षात चांगलं काम करु नये, असं बोलतात.
- मला ज्यावेळी कुणी विचारतं अमूकतमूक काम करु नको का?
- मी विचारतो का?
- ते म्हणतात पितृपक्ष आहे.
- पण मी त्यावर म्हणतो अहो माझा पक्षच पितृ’पक्ष’ आहे.
- वडिलांनी स्थापन केलेला आहे.
- वडिलांनी स्थापन केलेला पक्ष तो पितृपक्ष नाही का? त्यामुळे हे सगळे भोंदुगिरी आहे.
रक्तात आहेत प्रबोधनकारांचे विचार…
- या पोथ्या वाचल्या नसल्या तरी त्या रक्तामध्ये आल्यात
- तुम्ही म्हणाल हे शंभर वर्षांपूर्वीचं जुनं आहे, आता काय करायचं?
- त्याचं महत्त्व काय? पण तसं नाहीय.
- महत्त्व असेल-नसेल.
- हे बघणाऱ्यावर आहे.
- शंभर वर्षापूर्वीचा काळ कसा होता हे त्यातून कळतं.
- पण त्या काळामध्ये सुद्धा ज्या काही वाईट रुढी-परंपरा होत्या, त्या मोडण्यासाठी तेव्हाच्या लोकांनी काय केलंय, मग आपण काय करायला पाहिजे हे कळण्यासाठी या साहित्याचं महत्त्व आहे.
- मी साहित्यिक वगैरे नाही.
- जे काही आपण संत तुकारामांच्या बाबतीत ऐकतो. त्यांच्या पोथ्या पाण्यात टाकल्या होत्या.
- पण त्या परत पाण्यावर तरंगल्या होत्या.
- मला तोच क्षण आता वाटतोय.
- कारण आमच्यासाठी याच पोथ्या आहेत.
- या पोथ्या वाचल्या नसल्या तरी त्या रक्तामध्ये आलेल्या आहेत.
जिथे ढोंग दिसलं तिथे त्यांनी लाथ मारली
- माझे आजोबा नास्तिक होते का? तर नाही.
- त्यांची देवीवर प्रचंड श्रद्धा होती.
- पण हे जे ढोंग आहे ना त्या ढोंगावर लात मार.
- ढोंग नकोय.
- ती लात मारणं बोलून फक्त सोडून दिलं नाही.
- त्याबाबतीत त्यांना खरंतर मोठा फुटबॉलपटूच बोलावं लागलं.
- कारण जिथे ढोंग दिसलं तिथे त्यांनी लाथ मारली.
- त्यांनी टीका केल्यानंतर घरावरती कचरा टाक सारखे अनेक त्रास ते भोगत-भोगत आले आहेत.
- तिथून ते मोठे झाले.
- एकाकी माणूस, संघटन वगैरे नाही.
- पण तेव्हा त्यांनी जी विचारांची बिजे पोहोचली ते एवढे फोफावली की, ते चित्र तुम्ही सगळीकडे बघत आहात.
मुख्यमंत्री पद हा एक बहुमान
- मुख्यमंत्री पद हा एक बहुमान आहे.
- ते नक्कीच आहे.
- पण माझ्या आजीची म्हणजे बाळासाहेबांच्या आजीची त्यावेळेची इच्छा होती की, बाळासाहेबांनी सरकारी नोकरी करावी.
- त्यावेळेचा काळ वेगळा होता.
- स्वातंत्र्याच्या आधीचा काळ.
- आजही परिस्थिती तशीच आहे म्हणा.
- नोकरीची शाश्वतीच नाहीय.
- शाश्वत नोकरी कोणती ?
- तर सरकारी नोकरी.
- मी माझ्या मनात विचार करतोय.
- माझ्या आजीच्या काय भावना असतील?
- कारण जिची इच्छा माझ्या वडिलांनी गव्हर्मेंट सर्व्हेंट व्हावे.
- त्यांनी काय केलं हे सारं जगाने बघितलं आहे.
- आणि नातू तर आज जो आहे तो तुमच्या समोर आहे.
- या सगळ्या घटना कोण घडवतो, कशा घडतात, या काही कळत नाही.
- कोणी कुठे जन्म घ्यायचा, कुणाच्या खांद्यावर कोणती जबाबदारी द्यायची हे घडवणारं कुणीतरी नक्कीच असतं.
प्रबोधनकार घराघरात पोहचावेत – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
‘प्रबोधन’ या नियतकालिकाने संपूर्ण महाराष्ट्रात समाजसुधारणेचे नवे वारे निर्माण केले व महाराष्ट्राला वैचारिक समृद्धी दिली. तसेच नव्या विचाराची पिढी घडवण्यात प्रबोधन या नियतकालिकाने मोलाचा वाटा उचलला होता, त्यांचे विचार घरा घरात पोहचावेत यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यत ग्रंथ पोहचवावेत अशी सूचना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.
श्री. थोरात म्हणाले, सर्व विद्यालयातील ग्रंथालयात ही ज्ञानसंपदा पोहचविणे आवश्यक आहे. प्रबोधनकारांच्या नावाने संमेलन व्हावे तसेच अभ्यासक्रमातूनही त्यांचे विचार शिकविले जावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या ग्रंथाचे स्वागत होईल – मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई
प्रबोधन या नियतकालिकाने बुद्धीप्रामाण्य व्यक्तिस्वातंत्र्य, सामाजिक समता, ऐहिक जीवनसमृद्धी आणि ज्ञाननिष्ठा या मूल्यांचा पुरस्कार केला. महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळ आणि त्यातील प्रबोधन परंपरा प्रबोधनाच्या उल्लेखाशिवाय अपूर्णच राहील. पुरोगामी महाराष्ट्राची जडणघडण करण्यात प्रबोधन या नियतकालिकेचा मोलाचा वाटा आहे. या ग्रंथांचे सर्वत्र स्वागत होईल असा विश्वास मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.
श्री. देसाई पुढे म्हणाले, प्रबोधनकार हे कृतीला विचारांची जोड देणारे समाज सुधारक होते. त्यांचे विचार नवीन पिढीपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी मराठी भाषा विभागाने साहित्य संस्कृती मंडळाच्या माध्यमातून पेलली आहे. ही ग्रंथसंपदा लोकांपर्यंत पोहचविण्याचे मोलाचे कार्य करणारे संपादक मंडळ यांचे त्यांनी विशेष आभार मानले.
या कार्यक्रमाच्या शेवटी मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव डॉ. भूषण गगराणी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
पार्श्वभूमी
महाराष्ट्राच्या वैचारिक चळवळीचा पुरोगामी परंपरेचा वारसा पुढे नेण्यासाठी प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी सुरु केलेल्या प्रबोधन या नियतकालिकाचे दिनांक १६ ऑक्टोबर, २०२० ते दिनांक १५ ऑक्टोबर, २०२१ हे शताब्दी वर्ष महाराष्ट्र शासनाच्यावतीने विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरे करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने प्रबोधन नियतकालिकातील केशव सीताराम ठाकरे यांचे लेख ‘प्रबोधन’ मधील प्रबोधनकार, हा त्रिखंडात्मक संपादित ग्रंथ प्रकाशित करण्यात आला आहे.
या ग्रंथाचे संपादन सचिन परब, डॉ. रणधीर शिंदे, ज्ञानेश महाराव, सुनिल कर्णिक व विश्वंभर चौधरी यांनी केले आहे. प्रबोधन’ मधील प्रबोधनकार या ग्रंथाच्या तीन खंडांत ऑक्टोबर १९२१ से मार्च १९३० या कालावधीमध्ये प्रकाशित झालेले ‘प्रबोधन’ या नियतकालिकाचे ९१ अंकांमधील संपादित २४८ लेख अंतर्भूत करण्यात आले आहेत.
या सोहळ्याच्या निमित्ताने ग्रंथाचे संपादक पत्रकार सचिन परब, साप्ताहिक चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव, सुनील कर्णिक आदिंचा सत्कार झाला.
यावेळी साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, विश्वकोष मंडळाचे अध्यक्ष श्रीधर तथा राजा दीक्षित, मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, महापौर किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत, खासदार राहुल शेवाळे आमदार मंगलप्रभात लोढा, विश्वंभर चौधरी आदी यावेळी उपस्थित होते.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या www.balasahebthackeray.in या संकेतस्थळाचे लोकार्पणही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले