मुक्तपीठ टीम
आंध्र प्रदेश विशाखापट्टणममधील मीना ही तरुणी आपल्या ३ मित्रांसह हैदराबाद येथून राजमाची येथे भटकंतीकरीता आली होती. राजमाची येथील बालेकिल्ला श्रीवर्धनला भेट दिल्यानंतर, सकाळी तिने आपल्या मित्रांसह गडावरून खाली उतरण्यास सुरुवात केली. वाटेत एक लहान कातळ पॅच उतरत असतांना तोल जाऊन ती घसरली व त्यात तिच्या गुडघ्याला मोठा पीळ बसला. तिला फ्रॅक्चरसारखी इजा झाली. हाडं विस्कळीत झाल्याने होणाऱ्या प्रचंड वेदेनेमुळे तिला चालणे अशक्य झाले होते. श्रीवर्धन किल्ल्यावरून खाली उतरत असलेल्या एका ट्रेकरने ह्या जखमी मुलीची माहिती राजमाचीच्या गावकऱ्यांना दिली. त्यावेळी येथील ग्रामस्थांना दिली. त्या वेळी राहुल मेश्राम हे त्यांच्या कुटुंबा समवेत उधेवाडी येथेच होते.
वन विभाग व ग्राम पंचायत – राजमाची संयुक्त संवर्धन समितीचे प्रतिनिधी गणेश उंबरे यांनी मला ह्या घटनेची माहिती दिली. स्थानिक संघ बचाव कार्यासाठी तयारी करीत होते, त्यात ते देखील सामील झाले. उधेवाडी येथे स्ट्रेचर उपलब्ध नसल्याने काही चादरी हे दोर व बांबूसह घेण्यात आल्या. वरील साहित्य घेऊन ट्रेकर टीम जखमी मुलीकडे पोहोचली. त्यांनी त्वरित बचाव कार्य सुरू केले. प्रमाणित प्रथमोपचार सहाय्यक असल्यामुळे राहुल यांनी त्या जखमी मुलीची वैद्यकीय तपासणी केली. जखमी मुलीचे वजन अधिक असल्यामुळे, तिला किल्ल्यावरून खाली उतरवण्यासाठी, दोरीचा पर्यायी हार्नेस बनवून त्याचं बांबूसह उपयोग करण्याचे आम्ही ठरविले. अश्याप्रकारे त्या मुलीला या पर्यायी स्ट्रेचरच्या व्यवस्थेमध्ये सुखरुप पणे घेऊन ट्रेकर गड उतरू लागले. श्रीवर्धन बालेकिल्ल्याच्या कातळकड्यात खोदलेल्या अरुंद उभ्या पायऱ्या कठीण आहेत. त्या जखमी मुलीला घेऊन उतरताना ट्रेकर टीमला खूप काळजी घ्यावी लागली. दुपारी बचाव टीम त्या मुलीला घेऊन पायथ्याच्या उधेवाडी गावात पोहोचली.
उधेवाडीतून सुमो वाहनाने त्या जखमी मुलीला तातडीने जवळच्या लोणावळा शहरातील रुग्णालयात रवाना केले. अशा प्रकारे हे बचाव कार्य आमच्या टीमने यशस्वीपणे पूर्ण केले. हे जलद बचाव कार्य केवळ राजमाची येथील स्थानिक सहासप्रेमी युवकांमुळेच शक्य झाले. ह्या बचाव कार्यात सामील असलेल्या सदस्यांची नावे खालील प्रमाणे आहेत: प्रताप उंबरे, संगम वरे, गणेश उंबरे, अशोक उंबरे, सूरज वरे, विठ्ठल मेंगाळ, श्याम, खंडू वरे, ज्ञानेश्वर उंबरे, तुकाराम उंबरे.
पाहा व्हिडीओ: