मुक्तपीठ टीम
लखीमपूर येथे झालेल्या शेतकरी हत्याकांड प्रकरणी तिथं भेट देऊ पाहणाऱ्या विरोधी नेत्यांना अडवले जात आहे. योगी आदित्यनाथ सरकारने विरोधी नेत्यांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. मंगळवारी काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी आणि ११ काँग्रेस नेत्यांना शांतता भंग करणे आणि जमावबंदीच्या १४४ या कलमाचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली आहे. आपचे संजय सिंह, सपाचे अखिलेश यादव यांनाही अटकाव केला गेला. पंजाब, छत्तीसगड मुख्यमंत्र्यांनाही रोखण्यात आलं. मात्र असं असताना तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी लखीमपूरला जाऊन तिथल्या शेतकऱ्यांची भेट घेतली आहे. त्यांनी यूपी पोलिसांना कशी झुकांडी दिली, त्याची चर्चा आता रंगू लागली आहे.
तृणमूल काँग्रेसच्या खासदारंनी असा दावा केला आहे की, त्यांनी पोलिसांना आपण पर्यटक असल्याचे भासवले आणि शेतकऱ्यांची भेट घेतली. यामध्ये तृणमूल काँग्रेसच्या शिष्टमंडळातील खासदार काकोली घोष दस्तीदार, सुष्मिता देव, अबीरंजन बिस्वास, प्रतिमा मंडळ आणि डोला सेन यांचा समावेश होता.
- तृणमूलने एका निवेदनात सांगितले की, जेव्हा त्यांना पोलिसांनी अडवले तेव्हा त्यांनी आपण पर्यटक असल्याचे सांगितले.
- तृणमूलच्या नेत्या डोला सेन यांनी सांगितले की, ते रविवारपासून लखीमपूर खेरी गाठण्याचा प्रयत्न करत होते पण ते दोन दिवसांनी लखीमपूरला पोहोचले.
- पालिया तहसीलमधील मृत शेतकरी लव्हप्रीत सिंगच्या नातेवाईकांची त्यांनी भेट घेतली.
- तर दुसऱ्या मृत शेतकऱ्याच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी धौरहरा तहसीलमध्ये गेले.
- दोघांचेही त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
काँग्रेसमधून तृणमूल काँग्रेसमध्ये गेलेल्या आसाम मधील नेत्या सुष्मिता देव म्हणाल्या, “लखीमपूर खेरीमध्ये मारल्या गेलेल्या तरुण शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटून दुख: झाले. पक्षाध्यक्ष ममता बॅनर्जी काळे कायदे रद्द करण्यासाठी आणि भाजपा सरकारचे अन्याय थांबवण्यासाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभ्या आहेत. त्यांनी सिंगूरमध्ये लढा दिला आणि भारतातील शेतकऱ्यांसाठी लढा सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले.”
भाजपा एका निरंकुश सरकारप्रमाणे सत्ता गाजवतेय
- लोकसभा खासदार काकोली घोष दस्तीदार म्हणाल्या, “आरोपी हा बड्या राजकीय नेत्याचा मुलगा आहे, त्याने शेतकऱ्यांची हत्या केली आहे आणि त्याला शिक्षा झाली पाहिजे.
- भारत लोकशाही देश आहे पण गेल्या काही वर्षांपासून देशातून लोकशाही गायब आहे.”
- “भाजपा एका निरंकुश सरकारप्रमाणे सत्ता गाजवत आहे.
- ते आरोपी वगळता निरपराध्यांना अटक करत आहेत.
- त्यांनी पंतप्रधान मोदींनाही लक्ष्य केले, पंतप्रधान मोदी लखनऊमध्ये आहेत, पण ते लखीमपूर खेरीला आले नाहीत.
- यातून सरकारचा हेतू समजतो.