मुक्तपीठ टीम
उत्तर प्रदेशातील लखीमपूर-खेरीमध्ये घडलेल्या घटनेमुळे देशभरात संताप व्यक्त होत आहे. निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांवर भरधाव गाडी घालून त्यांना चिरडणाऱ्या आरोपींपैकी एक आशिष मिश्रा स्थानिक खासदार आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा तेनी यांचा मुलगा आहे. त्यांच्या बनबीरपूर गावात उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांचा पूर्वनियोजित कार्यक्रम होता. त्यावेळी निदर्शने करणाऱ्यांना शेतकऱ्यांना जीपखाली चिरडण्याची अमानुष घटना घडली आहे. त्या घटनेनंतर मुलाला अटक झाली असली त्यासाठी केंद्रीय राज्यमंत्रीही जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. त्यांच्या हडेलहप्पी वृत्तीमुळेच शेतकरी संतापले. त्यांचा एक व्हिडीओ आता व्हायरल होत आहे, ज्यात त्यांनी “मी फक्त मंत्री-खासदार नाही…” तसेच “शेतकरी निदर्शकांना सुधरवेन” असे धमकावणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
त्यामुळे मी फक्त मंत्री – खासदार नाही…असं सांगत आपल्या भूतकाळाची आठवण करून देणारे अजय कुमार मिश्रा तेनी आहेत तरी कोण, हे तपासणे आवश्यक आहे.
अजय मिश्रा तेनी यांचा व्हिडीओ व्हायरल
- घटनेनंतर अजय मिश्रा तेनी यांचा २० दिवसांपूर्वीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
- व्हिडीओमध्ये ते एका मेळाव्याला संबोधित करत आहेत.
- “तुम्हीही शेतकरी आहात, तुम्ही चळवळीत का उतरला नाही? जर मी खाली उतरलो असतो, तर त्यांना पळून जाण्याचा मार्ग मिळाला नसता.”असे ते म्हणाले.
- “जर पाठीमागे काम करणाऱ्या १०-१५ लोकांनी येथे आवाज उठवला. ती चळवळ देशभर पसरायला हवी होती.”
- “आता तरी सुधरा, नाही तर सामना करा आम्ही तुम्हाला सुधरवू. त्यासाठी केवळ २ मिनिट लागतील.
- “मी फक्त मंत्री नाही किंवा फक्त खासदार किंवा आमदार नाही. जे आमदार किंवा मंत्री होण्यापूर्वीपासून मला ओळखतात त्यांना माहित असेल की मी कोणत्याही आव्हानापासून पळून जात नाही.” अशा शब्दात त्यांनी शेतकऱ्यांना आव्हान दिले.
या भाषणामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याविरोधात शेतकरी वर्गात संताप व्यक्त केला जात आहे. रविवारीही त्यांच्या भाषणावर निषेध करण्यात आला. खासदार अजय मिश्रा तेनी यांनी त्यांच्या व्हिडीओमध्ये ‘मी केवळ मंत्री नाही किंवा केवळ खासदार किंवा आमदार नाही’ असे का म्हटले? हा प्रश्न उद्भवतो.
राजकीय प्रवासाची सुरुवात
- अजय मिश्रा तेनी हे मुळचे शेतकरी आणि व्यवसायाने व्यापारी आहेत.
- २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत ते लखीमपूर-खेरीच्या निघासन मतदारसंघातून निवडून आले होते.
- २०१४ मध्ये भाजपाने त्यांना खेरी लोकसभा मतदारसंघातून तिकीट दिले.
- त्यांनी बसपाचे उमेदवार अरविंद गिरी यांचा सुमारे १ लाख १० हजार मतांनी पराभव केला.
- २०१९ च्या निवडणुकीतही ते निवडून आले.
- समाजवादी पक्षाच्या पूर्वी वर्मा यांचा विक्रमी २.५ लाख मतांनी पराभव केला.
- मोदी सरकारच्या नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि त्यांना केंद्रीय गृह राज्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली.
आमदार होण्याआधी कुस्तीचे खेळायचे!
- २०१२मध्ये आमदार होण्यापूर्वी अजय मिश्रा तेनी हे वकीलही होते.
- पण त्यांचा मुख्य व्यवसाय शेती आणि व्यापार होता.
- अजय मिश्रा तेनी यांची प्रतिमा या क्षेत्रातील दबंग आणि बाहुबली नेत्याची होती.
- त्यांच्या या प्रतिमेमागे एक मोठे कारण देखील होते की त्यांना नेहमी कुस्तीची आवड होती.
- सुरुवातीच्या काळात त्यांनी कुस्तीही खेळली आहे.
रविवारी केले होते कुस्तीचे आयोजन
- रविवारी त्यांच्या गावात कुस्तीचे आयोजन करण्यात आले होते.
- उपमुख्यमंत्री केशव मौर्य हे प्रमुख पाहुणे होते.
- उपमुख्यमंत्र्यांच्या आगमनाची बातमी ऐकल्यावर, लगतच्या तालुक्यातील आणि जिल्ह्यांतील शेतकरी टिकुनिया-बनबीरपूर वळणावर जमा झाले.
- त्यांचा उद्देश उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर निदर्शने करून काळे झेंडे दाखवण्याचा होता.
- त्याचवेळी भाजप नेत्यांच्या दोन एसयूव्ही तेथून पुढे गेल्या आणि विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर चालवण्यात आल्या.