मुक्तपीठ टीम
हृदय विकाराचा झटका आल्यावर रुग्णांवर पहिल्या तासातच उपचार होण्याची आवश्यकता असते. स्टेमी महाराष्ट्र प्रकल्पामुळे पहिल्या तासात उपचार करणे शक्य होईल, असे आरोग्य मंत्री सार्वजनिक राजेश टोपे यांनी सांगितले. ‘जागतिक हृदय दिनी ‘स्टेमी महाराष्ट्र’ प्रकल्पाचे राजेश टोपे यांनी उपजिल्हा रुग्णालय, कामठी, नागपूर येथून व्हर्चुअल पद्धतीने उद्घाटन केले. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमास आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, आरोग्य सोसायटीचे आयुक्त डॉ. एन. रामास्वामी, संचालक डॉ. साधना तायडे आणि सह संचालक डॉ. पद्मजा जोगेवार यांच्या उपस्थितीत झाले. राज्यातील उपसंचालक, जिल्हा शल्य चिकित्सक, अधीक्षक व विविध जिल्ह्यांतील अधिकारी, संबंधित आरोग्य विभाग कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते.
‘प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यावर भर आवश्यक’
टोपे म्हणाले, हृदयविकाराच्या झटक्यामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील तीन ते चार टक्के लोकसंख्या आणि आठ ते दहा टक्के शहरी लोकसंख्या बैठी जीवनशैली, खाण्याच्या सवयींमुळे हृदयरोगींची संख्या वाढत आहे. यासाठी सामान्य लोकांमध्ये जनजागृती संबंधीचे कार्यक्रम वाढविण्यावर भर द्यावा. हृदयविकाराचा झटका आल्यानंतरचा पहिला तास “सुवर्ण तास” म्हणून ओळखला जातो. या पहिल्या तासात योग्य आणि त्वरित उपचार स्टेम प्रकल्पाच्या साहाय्याने घ्यावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
राज्यातील बारा जिल्ह्यात अंमलबजावणीस सुरूवात
स्टेमी महाराष्ट्र प्रकल्प राज्यात 12 जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आला आहे. आतापर्यंत 30 हजार रूग्णांना ईसीजी सेवा मिळाली आहे. त्यापैकी 317 स्टेमीची प्रकरणे प्रकल्पात आढळली. त्यांना पुढील उपचारासाठी उच्च केंद्राकडे पाठवण्यात आले. येत्या काळात हा प्रकल्प आधिक गतिमान करण्यात येईल. येत्या काही वर्षांत संपूर्ण महाराष्ट्रात या प्रकल्पाचा विस्तार केला जाईल, असे टोपे यांनी सांगितले.
क्लाऊड कनेक्टिव्हिटीद्वारे तज्ज्ञांकडून निदान
स्टेमी महाराष्ट्र प्रकल्पाअंतर्गत हृदय विकारामुळे मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे, त्याच बरोबर लवकर निदान, उपचारांद्वारे हृदयाच्या मांसपेशींना कमीत कमी इजा व्हावी त्याकरिता हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. हृदयविकाराचा झटक्याचे लक्षण असणाऱ्या सर्व संशयित रुग्णांचे मोफत ईसीजी घेण्यात येईल. क्लाऊड कनेक्टिव्हिटीद्वारे तज्ज्ञांकडून त्वरित निदान होईल, प्राथमिक उपचार रुग्णालयात दिले जातील. त्याचबरोबर रुग्ण महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभार्थी असल्यास त्याची शस्त्रक्रिया मोफत होईल व इतर रुग्णांना या योजनेच्या दरात उपचार मिळतील. जनतेमध्ये हृदयाच्या स्वास्थासंबंधित जागृती केली जाईल.
डॉ.चरित भोजराज यांनी स्टेमी महाराष्ट्र प्रकल्पांची माहिती दिली. सहाय्यक संचालक डॉ कांचन वानारे यांनी संस्कृत श्लोकासह निरोगी शरीराची गरज स्पष्ट केली आणि आभार मानले.