मुक्तपीठ टीम
महिला व बाल कल्याण विभागाने राज्यातील २०हजार कोरोना विधवा महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा म्हणून २७ ऑगस्ट २०२१ रोजी ‘वात्सल्य समिती’चा शासन निर्णय प्रसिद्ध केला. पण आज बरोबर एक महिना झाला तरीसुद्धा राज्यातील बहुतेक तालुक्यात अजूनही ही समितीच स्थापन झाली नाही..त्यामुळे वात्सल्यची माया विधवा भगिनींना मिळालीच नाही…
वात्सल्य समिती ही विधवा महिलांसाठी विविध योजना राबवाव्या यासाठी स्थापन करायची आहे. त्यामार्फत या महिलांना विविध कागदपत्रे व योजना तालुकास्तरावर राबवायच्या आहेत.
‘महाराष्ट्र कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती’ च्या वतीने ज्येष्ठ सामाजिक आणि शैक्षणिक अभ्यासक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी हे कोरोनाकाळात वैधव्याचा घाला पडलेल्या एकल महिलांसाठी कमालीचे प्रयत्न करत आहेत. या समितीच्या कार्यकर्त्यांनी १००पेक्षा जास्त तालुक्यात तहसीलदारांना जी आर प्रसिद्ध होताच निवेदने दिली. जीआरनुसार समिती स्थापन करण्याची विनंती केली. अनेकदा जाऊन तहसीलदारांकडे वारंवार पाठपुरावा केला पण खूप कमी ठिकाणी प्रतिसाद मिळाला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या बैठकीत ही या समिती स्थापन होत नाहीत अशी तक्रार करण्यात आली त्यावेळी महिला बालकल्याण समिती सचिव यांनी तातडीने कार्यवाही केली जाईल असे सांगितले तरीही काहीच प्रगती झाली नाही.
त्यामुळे आज जी आर ला एक महिना पूर्ण झाला म्हणून कोरोना एकल पुनर्वसन समिती च्या कार्यकर्त्या राज्यभरातुन मंत्री यशोमती ठाकूर व आयुक्त यांना आज मेल केले आहेत.
समिती स्थापन करण्याबाबत इतकी उदासीनता असेल तर या पुढील बैठका व कामकाज कसे चालेल? याबाबत चिंता वाटते अशी भावना या समितीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
प्रत्येक आठवड्याला बैठक घेण्याचा वार आणि वेळ नक्की करण्याचे आदेशही आपण द्यावेत व दर महिन्याला या बैठकांचा आपण आढावा घ्यावा अशी विनंती मंत्री व अधिकारी यांना केली आहे