Monday, May 19, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

शाहीर साबळे: चाळीमधून कलेच्या जोरावर यशाचे शिखर गाठणारे महान कलाकार!

चाळीतले टॉवर - भाग ७

October 5, 2021
in featured, प्रेरणा
0
chalitale tower

डॉ.जितेंद्र आव्हाड

स्थळ – अमळनेर,
काळ असेल १९३३-३४ दरम्यानचा,
गावात संतश्रेष्ठ गाडगे महाराज आले होते. मीराबाई मिठाईवाली यांनी त्यांच्या उतरण्याची व्यवस्था केलेली होती. एके दिवशी सकाळी त्या मीराबाईंनी बाबांसमोर एका मुलाला उभे केले. म्हणाली, ‘बाबा यह लडका बहुत अच्छा गाता है.’ बाबांनी त्याच्याकडे पाहिले, बोलले काही नाहीत. मीराबाईंनी त्या मुलाला भजन म्हणायला सांगितले. ‘संत तुकाराम’ चित्रपटातील भजने त्याने गाऊन दाखवली. त्यातले एक भजन होते – ‘आधी बीज एकले…. बीज अंकुरले, रोप वाढले…’
भजने संपली. बाबांनी त्या मुलाला जवळ येण्याची खूण केली. तो तत्परतेने पुढे सरकला. बाबांनी त्याच्या पाठीवरून मायेने हात फिरवला. ती दाद होती त्या मुलाच्या गाण्याला, त्याच्या आवाजाला.

 

हाच तो आवाज ज्याला संत गाडगे बाबा, साने गुरुजी, गानहिरा हिराबाई बडोदेकर, आचार्य अत्रे, बाळासाहेब ठाकरे यांच्यापर्यंत अनेक दिग्गजांनी वाखाणले, नावाजले. हाच तो मुलगा त्याच्याबद्दल पुढे पु. ल. देशपांडे यांच्यासारखे रसिकाग्रणी लेखक म्हणाले – “मराठी रंगभूमीवर गाणं कसं पाहिजे, असं जर मला कुणी विचारलं, तर मी त्यांना सांगेन की, शाहीर साबळ्यांसारखं…!!”

 

शाहीर कृष्णराव गणपत साबळे

आज उभा महाराष्ट्र त्यांना ओळखतो ते राजा बढे यांचे गीत, श्रीनिवास खळे यांची चाल व शाहीर साबळे यांचा आवाज या त्रिवेणी संगमातून निर्माण झालेल्या ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्याभिमान गीतासाठी. या गीतामधील एक ओळ आहे –
“दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला…!”
हे महाराष्ट्राचे वर्णन. पण शाहीर साबळे यांच्या अवघ्या जीवनप्रवासाला चपखल लागू पडणारे.

 

जन्मापासून शाहीर ‘शिजले’ ते गरिबीच्या आगीत. स्वतःबद्दल एका कटावात ते म्हणतात –

“वाई खोऱ्यातलं गाव पसरणी, तिथं घर पत्र्याचं अकरा खणी
नव्हती शेतीभाती आणि दवापाणी
सोडून गाव, माणसं धरती मुंबैची गिरणी..”

 

घरच्या दारिद्र्यामुळे लहानपणी त्यांना मामाकडे अमळनेरला राहावे लागले. तेथे साने गुरुजींसारख्या थोर स्वातंत्र्यसैनिकांना जवळून पाहण्याची संधी त्यांना मिळाली. फायनलपर्यंतचे शिक्षण त्यांनी तेथे घेतले. १९३७ साली तेथून पसरणीला काही काळ राहून ते नोकरीसाठी मुंबईला आले.

 

तेथे त्यांच्या मदतीला आला ‘गाववाल्यांचा गाळा’. पश्चिम महाराष्ट्रातील गावकऱ्यांनी मुंबईला येणाऱ्या नोकरी इच्छुक तरुणांसाठी तयार केलेली ही खास ‘सपोर्ट सिस्टीम’. गिरणगावातील चाळींत गावकऱ्यांनी मिळून एक खोली घ्यायची आणि तेथे अत्यल्प भाडे देऊन गावातील तरुणांनी राहायचे. पसरणीचा असाच एक गाळा होता डिलाईल रोडवरील प्रकाश टॉकीजसमोरच्या,हर हर वाला इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर. साबळेंनी गिरणीकाम शिकायचा पास मिळवला; पण मन कलावंताचे ते काही यात रमेना. एका तमाशात काम करण्याची संधी त्यांना मिळाली. पण, घरच्यांना ते समजले. आणि त्यांनी या कृष्णाला तुडवून काढले. कारण – लोककलांची समाजातील अप्रतिष्ठा. त्यांना पुन्हा गावी परतावे लागले. तेथून ते पळून पुण्याला गेले. सिनेमासृष्टीचे दरवाजे वाजवून पाहिले. त्यापायी तेथे घरगड्याची नोकरी सुद्धा केली. संधी मिळेना, तेव्हा ते परत मुंबईला आले. कुर्ल्याच्या ‘स्वदेशी मील’ मध्ये काम मिळाले. आता मुक्काम होता तेथिल तकिया वार्डमध्ये एक मजल्याच्या कौलारू चाळीतील गाववाल्यांच्या गाळ्यात. साल होते १९४२. या मिलमधूनच त्यांना पहिल्यांदा कामगार रंगभूमीवर उतरण्याची संधी मिळाली.

 

याच काळात देशात स्वातंत्र्याचे तप्त वारे वाहू लागले होते. कामगारवर्गही त्यात हिरीरीने पुढे होता. स्वातंत्र्यासाठी काहीतरी करण्याची ओढ साबळेंच्या संवेदनशील मनाला लागली होती. अशात १९४४ साली मुंबईत साने गुरुजी आले. साबळे त्यांना भेटले आणि साने गुरुजी व सेनापती बापट यांच्या नगर-पुणे दौऱ्यात ते सहभागी झाले. त्या दौऱ्यात ते व्यासपीठावरून राष्ट्रीय गाणी म्हणत असत. त्यापासून प्रेरणा घेऊन पुढच्याच वर्षी, कुर्ल्यातील एका राष्ट्रीय कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी स्वतःची शाहीर साबळे आणि पार्टी सुरू केली. तिला साने गुरुजींची प्रेरणा होती.
“बाई, माझ्या गांधीला लई नाद गं सौराज्याचा” किंवा
“माझ्या गांधीला तुरुंगाची लई गोडी, येते त्याला न्यायाला, न्यायाला सरकारची गाडी…!!” किंवा
“अरे ही स्वराज्याची सेना, आमुचा सुभाषबाबू राणा”,
अशा गीतांतून ते देशातील जनतेत चैतन्य चेतवत होते.

 

यापुढचा सारा प्रवास हा “सर कर एकेक गडगड” अशा पद्धतीचाच. त्यात अनेक अडथळे आले. आर्थिक अडचणी आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या कौटुंबिक समस्या हे तर पाचवीलाच पुजलेले. पण, शाहिरांच्या कलासक्त मनाने त्यावर सातत्याने मात केली. प्रसंगी दारुबंदी प्रचारक म्हणून नोकरी ही केली. गणेशोत्सवात प्रहसने सादर केली. अधूनमधून रेडिओवर गाणी गाण्याची संधी मिळत असे. ‘एचएमव्ही’ने ‘नवलाईचा हिंदुस्थान’ ही रेकॉर्ड काढली ती त्यांनी पहिल्यांदा नेऊन ऐकवली ती साने गुरुजींना. पुढे राजा मयेकर यांच्यासारख्या कलावंत-मित्राच्या साह्याने त्यांनी रंगमंचावर एक नवाच अविष्कार केला. तो होता आधुनिक नाट्य आणि तमाशा यांच्या संयोगाचा – मुक्तनाट्याचा. ‘यमराज्यात एक रात्र’, ‘आबुरावाचं लगीन’, ‘इंद्राच्या दरबारात तमासगीर’, ‘ग्यानबाची मेख’, ‘बापाचा बाप’, अशी त्यांची मुक्तनाट्ये प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली. शाहिरांचे नाव होत होते. रेडिओवर कार्यक्रम सादर होत होते. गाठीला थोडे पैसे जमले तसे त्यांनी आपले विंचवावरचे बिऱ्हाड स्थिर करण्याचे ठरवले. परळ टॅंक रोडवरच्या गोलंदाजी हिल येथील महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड कॉलनीत त्यांनी घर घेतले.

 

हा काळ होता संयुक्त महाराष्ट्राचा. या लढ्यातील तेव्हाच्या शाहिरांचे योगदान प्रचंड. शाहीर साबळेंनीही मराठी माणसाची अस्मिता तेवत ठेवण्यासाठी मोठे काम केले. अनेक गाणी, पोवाड्यांतून मराठी शक्तीचे प्रबोधन केले. संयुक्त महाराष्ट्र झाला आणि त्याच्या स्वागतासाठी एचएमव्ही’ने महाराष्ट्रगीतांची एक ध्वनिमुद्रिका काढली. ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीत त्यातलेच. आज महाराष्ट्र अभिमानगीताचा दर्जा त्यास प्राप्त झाला आहे. या गीताप्रमाणेच शाहीर साबळे यांचे नाव जोडले गेले आहे ते ‘महाराष्ट्राची लोकधारा’शी. गोविंदाग्रजांनी ज्यास ‘बकुलफुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा’ असे म्हटले आहे, त्या महाराष्ट्रातील विविध लोकपरंपरा लोकांसमोर आणतानाच पिढ्यानपिढ्या त्यांची स्मृती जपण्याचे अनोखे कार्य या लोकशाहीराने केले. केवळ तेवढ्यासाठी महाराष्ट्र त्यांचा कायमचा ऋणी राहील…!!

 

राज्य सरकारचा पहिला शाहीर अमर शेख पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार, पुणे पालिकेचा शाहीर पठ्ठे बापुराव पुरस्कार, असे अनेक सन्मान त्यांना लाभले. कष्टाचे पहाड तुडवत, चाळींमध्ये राहून केवळ आपल्या कलेच्या जोरावर यशाचे शिखर गाठणाऱ्या या कलावंताने २० मार्च २०१५ रोजी रसिकांचा अखेरचा निरोप घेतला..!!

 

jitendra awahd

(लेखक डॉ. जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री आहेत.)

 

लोकशाहीर विठ्ठल उमप: श्रमिकांच्या चाळीतून विचारांची श्रीमंती फुलवत समाज जागवला!


Tags: Chalitale TowerDr Jitendra AwhadShahir Sableचाळीतले टॉवरडॉ. जितेंद्र आव्हाडशाहीर साबळे
Previous Post

साउथ इस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडमध्ये ४५० जागांवर अॅप्रेंटिसशिप संधी

Next Post

इयत्ता १२वीच्या निकालाबाबत २५ सप्टेंबरपर्यंत आक्षेप नोंदविण्याचे आवाहन

Next Post
HSC

इयत्ता १२वीच्या निकालाबाबत २५ सप्टेंबरपर्यंत आक्षेप नोंदविण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!