डॉ.जितेंद्र आव्हाड
“एके रात्री सह्यगिरी हसला,
हसताना दिसला,
आनंद त्याला कसला,
झाला उमगेना मानवाला,
रात्रीच्या गर्द अंधाराला,
चिरून सुर्योदय कसा झाला…!!”
अशा शब्दांत शिवजन्माचे वर्णन करून शिवछत्रपतींचा पोवाडा गाणारे राष्ट्रशाहीर म्हणजे अमर शेख. बेचाळीसच्या स्वातंत्र्य आंदोलनात ‘सुटला वादळी वारा….. वल्हव जोमानं जरा’ म्हणत समाजमनी जोश भरणारे अमर शेख. गोवा मुक्तिसंग्रामात, संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात मराठी अस्मितेचा ध्वज फडफडत ठेवणारे अमर शेख. मुळ नाव मेहबूब हुसेन पटेल. बार्शीतील एका गरीब मुस्लिम कुटुंबातला २० ऑक्टोबर १९१६ चा त्यांचा जन्म. आईच्या तोंडच्या ओव्या ऐकत ते मोठे झाले.
बार्शीत असतानाच कामगार चळवळीत त्यांनी प्रवेश केला होता. संपात पुढाकार घेतल्याने त्यांना विसापूरच्या तुरुंगातही जावे लागले होते. तेथे त्यांची आणि कॉ. रघुनाथ कऱ्हाडकर यांची भेट झाली आणि ‘मेहबूब पटेल’ यांच्या विचारांना साम्यवादी शिस्त लागली. पोलिसांचा ससेमिरा चुकवत आल्यानंतर ते मा. विनायकांच्या स्टुडिओत काम करू लागले. तेथेच त्यांचे बारसे झाले – अमर शेख.
पहाडी सूर, पल्लेदार आवाज, विचारांचा पक्केपणा, व काव्यप्रतिभा या गुणांवर अमर शेख तळपू लागले. स्वातंत्र्याची धामधूम देशात सुरू असतानाच, १९४७ साली त्यांचा विवाह झाला कुसुम जयकर यांच्याशी. मुंबईत सुरूवातीला ते राणीबागेसमोरच्या महापालिकेच्या क्वार्टर्समध्ये राहायचे. नंतर पार्टीने त्यांना सातरस्त्यावरील एका चाळीतील घर मिळवून दिले. ही हाजी कासम चाळ. महालक्ष्मी रेल्वेस्थानकापासून अगदी जवळ. आता तो मार्ग शाहीर अमर शेख यांच्याच नावाने ओळखला जातो. मुंबईत सुरूवातीची त्यांची काही वर्षे हलाखीची गेली; पण शाहीरांचे राष्ट्रकार्य सुरूच होते. हळूहळू त्यांच्या कलापथकाचा जम बसत चालला होता. गावोगावी दौरे होत होते. अमर शेख स्वतः श्रमिक होते. या श्रमिक, सर्वसामान्यांच्या उत्थानाचे स्वप्न त्यांच्या नजरेत होते. तेच स्वप्न आपल्या काव्यातून लोकांपर्यंत ते नेत होते. शिवरायांचे सुराज्य या देशात यावे ही त्यांची आस त्यांनी शिवरायांचा जो पोवाडा लिहिला, त्यातही दिसते. महाराष्ट्रावर, मराठी माणसावर नव्हे, तर देशावरही जेव्हा जेव्हा संकटे आली, तेव्हा तेव्हा त्यांची शाहिरी बोली कडाडली होती. गोवा मुक्ती आंदोलनातही त्यांचे मोठे योगदान होते. चिनी व पाकिस्तानी आक्रमणांच्या वेळी आपल्या शाहिरीच्या माध्यमातून लाखो रुपयांचा निधी त्यांनी देशासाठी गोळा केला होता.
‘अमरगीत’ हा त्यांचा पहिला गीतसंग्रह. त्यानंतर ‘कलश’ व ‘धरतीमाता’ हे काव्यसंग्रह आले. ‘पहिला बळी’ हे नाटक, छ. शिवाजी महाराज, मल्हारराव होळकर व उधमसिंग यांचा पोवाडा हे त्यांचे साहित्य आपल्याला उपलब्ध आहे. त्यांनी ‘युगदीप’ व ‘वक्त की आवाज’ या मासिकांचे संपादन ही केले होते. ‘प्रपंच’ व ‘महात्मा ज्योतिबा फुले’ या चित्रपटांतून आणि ‘झगडा’ या नाटकातून त्यांनी भूमिका सुद्धा केल्या. काय सामना करू तुझ्याशी, डोंगरी शेत माझं गं, बर्फ पेटला हिमालयाला, सुटला वादळी वारा ही त्यांची निवडक गाजलेली गाणी.
कवयित्री मलिका अमर शेख या त्यांच्या कन्या; तर कवी नामदेव ढसाळ हे त्यांचे जावई होते. २९ ऑगस्ट १९६९ रोजी त्यांचा अपघाती मृत्यू झाला आणि महाराष्ट्र आपल्या चाळ संस्कृतीतून निखरलेल्या आणि आपल्या शाहिरीने सबंध देशाला मंत्रमुग्ध करून सोडणाऱ्या या हिऱ्याला मुकला.
(लेखक डॉ. जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री आहेत.)
कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे: कामगारांचा शक्तिशाली पण संयमी, अष्टपैलू नेता!