मुक्तपीठ टीम
दिल्ली आणि मुंबई दरम्यान १,३५० किमी लांबीचा ग्रीनफिल्ड एक्सप्रेस-वे बनवला जात आहे. १ लाख कोटी रुपये खर्च करून बांधल्या जाणाऱ्या या एक्सप्रेस-वेचे ३५० किमीचे काम पूर्ण झाले आहे. सध्या ८ लेन बांधल्या जात आहेत. याशिवाय २ जाण्यासाठी आणि २ येण्यासाठी अशा ४ लेन वाढवल्या जातील. या चार लेन फक्त इलेक्ट्रिक वाहनांसाठी असतील. हा देशातील पहिला एक्सप्रेस-वे असेल जिथे पहिल्यांदाच इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार लेन असतील.
हा ग्रीनफिल्ड एक्सप्रेस-वे पूर्ण झाल्यावर केवळ वेळच वाचणार नाही, तर प्रदूषणही कमी होईल. एक्स्प्रेस वेच्या बाजूने नवीन औद्योगिक टाऊनशिप आणि स्मार्ट शहरे बांधण्याचा प्रस्ताव आहे. त्याचे सर्वेक्षण चालू आहे. संपूर्ण मार्गावर ९२ ठिकाणी इंटरव्हल स्पॉट विकसित केले जातील. रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, “एक्सप्रेस वेचे काम जानेवारी २०२३ पर्यंत पूर्ण होईल. परंतु, सध्या कोरोनामुळे कामाला विलंब झाला. आता प्रवासासाठी २५ तास लागतात. परंतु, या प्रकल्पामुळे मुंबई ते दिल्लीचा प्रवास १३ तासात पूर्ण होईल.
एक्सप्रेस-वेच्या बांधकामामुळे दिल्ली-मुंबईमधील अंतर १५० किमी होईल. एनएच-८, जो दिल्लीला मुंबईशी जोडतो, तिथे सध्या प्रचंड वाहतुक रहदारी आहे. त्यावर दररोज १ लाख वाहने जातात. ही वाहने एक्सप्रेस-वेवर स्थलांतरित होतील.
ग्रीनफिल्ड एक्सप्रेस-वे ची प्रमुख वैशिष्ट्ये
- एक्स्प्रेस-वेमुळे दरवर्षी ३२ कोटी लीटर इंधनाची बचत होईल.
- सुरक्षेसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला १.५ मीटर उंच भिंत बांधली जाईल.
- महामार्गाऐवजी स्लिप लेनमध्ये टोल प्लाझा बांधले जातील, जेणेकरून तुम्ही ज्या शहरात जाल, तोच टोल आकारला जाईल.
- प्रत्येक २.५ किमी अंतरानंतर प्राण्यांसाठी ओव्हर पास बनवले जातील.
- प्रत्येक ५०० मीटरवर एक अंडर पास असेल.
- प्रत्येक ५० किलोमीटरवर दोन्ही बाजूला सुविधा केंद्रे असतील. तेथे रेस्टॉरंट्स, फूड कोर्ट, सुविधा स्टोअर्स, इंधन स्टेशन, ईव्ही चार्जिंग पॉईंट्स आणि शौचालये इत्यादी असतील.
- ग्रीनफिल्ड एक्सप्रेस-वेवरील लाइट सौर उर्जेवर चालतील.