मुक्तपीठ टीम
या वर्षाचं पॅरालिम्पिक भारतासाठी नवे विक्रम घडवणारे ठरते आहे. आजवर जिंकली नाही तेवढी पदके मिळवण्यात भारतीय खेळाडू यशस्वी ठरत आहेत. जपानच्या टोकियोमध्ये खेळल्या जाणाऱ्या पॅरालिम्पिकमध्ये भारताचे खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. एअर रायफलमध्ये अवनी लेखारानं सुवर्ण पदक मिळवून भारताचे नाव सन्मानाने उंचावलं, तिनेच आता देशासाठी कांस्यपदकही मिळवले आहे. एकाच स्पर्धेत दोन पदके जिंकणारी ती देशातील पहिली महिला खेळाडू ठरली आहे. तर प्रवीण कुमारने हायजम्पमध्ये आजच रौप्य पदक मिळवले आहे.
विक्रमी अवनी!
- कृष्णजन्माष्टमीच्या दिवशी नेमबाज अवनी लेखारा हिने विक्रम प्रस्थापित करून सुवर्ण जिंकले होते.
- सुवर्ण जिंकणारी ती भारतीय इतिहासातील पहिली महिला पॅरालिम्पिक खेळाडू ठरली.
- आता अवनीने महिलांच्या ५० मीटर रायफल 3पी एसएच1 मध्ये ४४५.९ गुणांसह कांस्यपदक जिंकले आहे.
- या ऐतिहासिक कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवनीचे अभिनंदन केले आहे.
प्रवीण कुमारची रौप्य पदक मिळवणारी उंच उडी!
- भारतीय खेळाडू प्रवीण कुमारने पुरुषांच्या हाय जम्पमध्ये रौप्य पदक पटकावले. यासह भारताची एकूण पदकांची संख्या १२ झाली आहे.
- प्रवीण कुमारने २.०७ मीटर उडी घेऊन आशियाई विक्रम मोडला.
- ग्रेट ब्रिटनच्या जोनाथन ब्रूम-एडवर्ड्सने ऑलिम्पिक स्टेडियममध्ये प्रथम स्थान पटकावले.
- निषाद कुमार, मरिअप्पन थंगावेल्लू आणि शरद कुमार यांच्यानंतर टोकियो गेम्समध्ये पुरुषांच्या हाय जम्पमध्ये प्रवीण कुमार भारताचा चौथा पदक विजेता आहे.
या यशानंतर प्रवीणकुमार म्हणाला, “मी माझे सर्वोत्तम प्रयत्न केले. मी माझे प्रशिक्षक डॉ सत्यपाल सिंह यांचे आभार मानू इच्छितो ज्यांनी मला पाठिंबा दिला आणि प्रेरणा दिली. मी एसएआय, पीसीआय आणि माझ्या कुटुंबाचे आभार मानू इच्छितो.”
- भारतीय खेळाडूंनी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये देशासाठी आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली आहे.
- यापूर्वी भारताने २०१६ च्या रिओ गेम्समध्ये सर्वाधिक पदके जिंकली होती. नेमबाज अवनी लेखरा आणि भाला फेकणारा सुमित अंतिल यांनी सुवर्ण जिंकले आहे तर, प्रवीण भारताचे सहावे रौप्यपदक विजेते आहेत.
- याआधी पॅडलर भाविना पटेल, भाला फेकणारा देवेंद्र झाझरिया, डिस्कस थ्रोअर योगेश कठुनिया आणि हाय जम्प मारणारे थंगावेल्लू आणि निषाद यांनी हा पराक्रम दाखवला आहे.