मुक्तपीठ टीम
पाच वर्षांपूर्वी केलेल्या रासायनिक संवर्धनाचे कोणतेही दुष्परिणाम कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मूर्तीवर झालेले नाहीत. या पुरातन मूर्तीची स्थिती चांगली आहे, असा अहवाल औरंगाबाद विभागाच्या पुरातत्व सर्वेक्षण संस्थेच्या तज्ज्ञांच्या पथकाने दिला आहे. या पथकाने मंदिराला भेट दिली तेव्हा मूर्तीच्या पाहणीनंतर सांगितले. २०१५ मध्ये या मूर्तीचे रासायनिक संवर्धन करण्यात आले होते. त्यानंतर या पथकाने २०१७ मध्येही एकदा या मंदिराला भेट दिली होती.
एएसआयचे उपअधीक्षक श्रीकांत मिश्रा म्हणाले, “अंबाबाईची मूर्ती चांगल्या स्थितीत आहे. या मुर्तीला रासायनिक संवर्धनामुळे कोणताही धोका नाही. त्याने मूर्तीची झीजही होणार नाही.”
पूर्वी या मूर्तीच्या संवर्धनासाठी अनेक प्रयत्न केले गेले. कित्येक वर्षांच्या संशोधनानंतर, मूर्तीत आलेल्या भेगा भरण्यासाठी रासायनिक संवर्धन ही पद्धत निवडली गेली.
मूर्तीची झीज होण्याचा मुद्दा हा वादग्रस्त ठरला होता आणि याचे संवर्धन पारदर्शक मार्गाने व्हावे अशी मागणी अनेक भाविक करीत होते. फ्लोरोसेंट दिव्यांच्या उष्णतेमुळे झीज होते, असा काही स्थानिक तज्ञांनी दावा केल्यानंतर मंदिर विश्वस्त अधिकाऱ्यांनी फ्लोरोसेंटचे दिवे बदलले आणि एलईडी दिवे लावले. मंदिर ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी मंदिरातून महाकाली आणि महासरस्वती यांच्या मूर्तीही तपासाव्यात असा आग्रह धरला होता. “दोन्ही मूर्तींची झीज होत असल्याचे दिसू लागले आणि म्हणून लवकरात लवकर संवर्धनाच्या प्रयत्नांची गरज आहे,” असे मिश्रा म्हणाले.
मंदिरातील ट्रस्ट अधिकाऱ्यांनी कॉन्क्रीट स्लॅब काढून टाकण्याच्या योजनेसंदर्भात मार्गदर्शन करावे असा आग्रह धरला. मुंबईतील एका कंपनीने केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये असे म्हटले होते की, स्लॅबमुळे धतू आणि स्पायर यांना धोका आहे.
उपअधीक्षकांचे सहायक संचालक विलास वहाणे म्हणाले, “आम्ही स्लॅब कसा काढायचा यासंबंधीचा अहवाल मागवला आहे. अहवालाचा अभ्यास केल्यानंतरच आम्ही स्लॅब काढण्यास सुरवात करु, मंदिराची साफसफाई करणे यासारख्या इतर बाबी देखील आहेत, मंदिरावर कार्बनचा थर बसला आहे, जो टप्प्याटप्प्याने काढण्यात येईल. ”
पाहा व्हिडीओ: