मुक्तपीठ टीम
टोकियो ऑलिम्पिकसाठी भारतासाठी धावणारी एक स्पर्धक रेवती वीरमणी म्हणजे एक धावतं आश्चर्य आहे. रेवतीला तिचे प्रशिक्षक के. कनन यांनी अनवाणी धावताना पाहिलं. तिचा वाऱ्याचा वेग त्यांना भावला. त्यांनी तिला जोखलं. तिला निवडलं. त्यांच्या तालमीत तयार झालेली रेवती आता टोकियो ऑलिम्पिकसाठी निवडली गेली आहे. रेवती भारताच्या ४x४०० मिक्स्ड रिले संघात आहे. तिला आणि प्रशिक्षकांना ती देशासाठी पदक जिंकणारच, असा आत्मविश्वास आहे.
अवघ्या २३ वर्षांच्या रेवतीचे आयुष्य सुरुवातीच्या टप्प्यात खूप आव्हानात्मक होते. आई वडिलांचे निधन झाले तेव्हा तिचे वय सात वर्षही नव्हते. तिला तिची आजी अर्णमल यांनी वाढवले. त्या रोजंदारी मजूर होत्या. रेवतीला धावणे खूप आवडायचं. पण धावण्यासाठी बुटांची जोडी खरेदी करणे देखील तिला शक्य नव्हते.
रेवती तिच्या किशोरवयातपर्यंत अनवाणी चालत असे. तामिळनाडूच्या क्रीडा विकास प्राधिकरण मदुराई सेंटरचे प्रशिक्षक के. कनन यांनी तिला पाहिले. २०१४-१५ मध्ये रेवती एमजीआर रेसकोर्स स्टेडियमवर धावताना दिसली. ती जिंकू शकली नाही. पण प्रशिक्षकांनी वयाच्या १७ व्या वर्षी रेवती मधील अनवाणी चालण्याचे कौशल्य ओळखले. त्यांचे प्रयत्न, रेवतीची प्रतिभा आणि परिश्रम यामुले ती ऑलिम्पिकमध्ये पोहचली. तिला पदक जिंकण्यासाठी मुक्तपीठच्या खूप खूप शुभेच्छा.
रेवती अनवाणी धावली आणि प्रशिक्षकांना भावली…
कनन आजही रेवतीची आठवण सांगतात, “मी एक तरुण मुलगी अनवाणी चालताना पाहिले. मी तिच्यामुळे खूप प्रभावित झालो. ती कोठे राहते हे शोधून भेटायला गेलो. सुरुवातीला रेवतीच्या आजीने प्रशिक्षण देण्यास नकार दिला. त्यांना वाटले की, हे खूप महाग असेल. ते एका गरीब कुटुंबातून येतात त्यामुळे फूल टाइम खेळण्यास ते घाबरतात.”
रेवती म्हणाली, “माझ्या घरातून प्रशिक्षण केंद्राकडे जाण्यासाठी रोजचे ४० रुपये भाडे मला परवडत नाही. पण कनन सर ठाम राहिले.”
कनन सरांचे प्रयत्न फळास आले…
- कनन यांच्या बर्याच प्रयत्नांमुळे शेवटी चांगला परिणाम झाला.
- शेवटी रेवतीची आजी तयार झाली.
- त्यांनी रेवतीला धावण्याचे मोफत प्रशिक्षण दिले.
- एवढेच नाही तर तिला मदुराईच्या लेडी डॉक महाविद्यालयातही विनामूल्य प्रवेश मिळवून दिला.
बूट घालून धावणे हेच रेवतीपुढचे पहिले आव्हान!
- बूट घालून धावणे हे रेवतीसाठी सर्वात मोठे आव्हान होते.
- कनन सर रेवतीसाठी बूट घेऊन आले असले तरी तिला अनवाणी चालण्यास सोपे वाटत होते.
- ती खूप प्रयत्नपूर्वक बूट घालून धावण्यास शिकली.
रेवती धावू लागली…जिंकूही लागली!
- सन २०१६ मध्ये रेवतीच्या आयुष्यात मोठा बदल झाला.
- यावर्षी कोयंबटूरमध्ये तिने १०० मीटर, २०० मीटर आणि ४x१०० मीटर रिलेमध्ये जुनिअर नॅशनलमध्ये सुवर्णपदक जिंकले.
- कनन यांनी रेवतीला वर्ष २०१९ पर्यंत प्रशिक्षण दिले. ४. त्यानंतर ती पटियाला येथे शिफ्ट झाली. येथे ती राष्ट्रीय शिबिराचा एक भाग होती.
- तिच्या कारकीर्दीच्या सुरुवातीला १०० मी आणि २०० मीटर स्पर्धांमध्ये भाग घेत असली तरी, ४०० मीटर कार्यक्रमात तिने भाग घ्यायला सुरुवात केली.
- सन २०१९ मध्ये रेवतीने ४०० मीटर स्पर्धेत इंडियन ग्रँड प्रिक्स ५ आणि ६ जिंकले.
- आता रेवती दक्षिण रेल्वेच्या सेवेत मदुराई येथे तिकीट तपासणीस आहे.