डॉ. नरेंद्र भिकाजी कदम
डॉ. तेजस वसंत लोखंडे
ज्ञानदेवे रचिला पाया | उभारिले देवालया |
नामा तयाचा किंकर | तेणे केला हा विस्तार |
जनार्दनी एकनाथ | खांब दिला भागवत |
तुका झालासे कळस | भजन करा सावकाश |
ज्ञानेश्वर माऊलीने आपल्या प्रतिभा सामर्थ्याने वारकरी संप्रदायाची पायाभरणी केली. संत नामदेवांनी त्यांच्या पश्चात वारकरी संप्रदायाचे विचार अगदी पंजाबापर्यंत पोहोचवले. एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध करून लिहिली तसेच भागवत धर्माला अधिष्ठान प्राप्त करून दिले. आणि आपल्या सहज सोप्या वाणीने अनेक अभंगाची रचना करून या परमार्थाच्या मार्गाची आवड जनसामान्यांच्या मनात निर्माण करून तुकाराम महाराजांनी या संतांच्या कामावर कळस चढवला. म्हणूनच वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत आणि तुकारामांची गाथा ही प्रस्थान त्रयी मानली गेली.
संत श्रेष्ठांच्या या वारीत अनेक आश्चर्ये घडत असतात. भक्तिरसाने न्हाऊन निघणारी ही मंडळी अनेक तत्वांचे पालन करून चालतात. अद्वैताच्या संकल्पनेला इथेच सुरुवात होते. समस्त चराचर समान पातळीवर दिसू लागतात. भेदाभेदाचे पाश गळून जातात आणि त्यातून घडतो एक वारकरी.
भजन आणि नामसंकीर्तन हे वारकरी संप्रदायाचे अविभाज्य भाग. भजने गाताना वारकऱ्यांचे चित्त हरपते, त्याला कसलेच भान रहात नाही, ज्याच्या दर्शनाची आस घेऊन तो निघाला आहे त्याच्याशी तो तादात्म्य पावतो. माणसाचे मन मोठे चंचल आहे. विषयाकडे धावणे हे मनाचे काम आहे. विषयलोलुपतेने अनेकदा अनेक प्रमाद घडून येतात. विषयाकडे धावणाऱ्या मनाला लगाम घालायचे काम नामसंकीर्तनाने साध्य केले जाते.
वारकऱ्यांच्या जीवनात काही गोष्टींना अनन्यसाधारण महत्व आहे. या गोष्टींशिवाय वारकऱ्यांची कल्पना करणे अशक्य आहे.
वारकऱ्यांच्या गळ्यात असलेल्या वीणेला फार महत्व. वीणेची निर्मिती खुद्द भगवान शंकराने केली. त्यातून निघणाऱ्या सुरांना भुलून नारदाने ती भोळ्या शंकराकडून मागून घेतली. हीच वीणा गळ्यात बांधून त्यांनी त्रैलोक्यात भ्रमण केले. साधूसंतांनी पुढे ती आपलीशी केली व त्या वीणेच्या साहाय्याने भजनाचा आविष्कार केला.
तुळशी माळ आणि तुळशी वृंदावन ही वारकऱ्यांची दोन प्रतीके आणि श्रद्धास्थाने आहेत. आधुनिक वैद्यक विश्वानेही तुळशीचे अनेक औषधी गुणधर्म मान्य केले आहेत. समुद्रमंथनात निघालेल्या अमृताचे काही थेंब जिथे सांडले तिथे तुळशीची उत्पत्ति झाली अशीही तुळशी जन्माची कथा सांगितली जाते. आपल्या आजूबाजूच्या वातावरणाला शुद्ध करणारी ही तुळशी विष्णूला अत्यंत प्रिय आहे. म्हणूनच विष्णूच्या वैष्णवांना तुळशीचे फार महत्व आहे. ही माळ जो धारण करतो तो आपल्या देहावर व ऐहिक प्रपंचावर तुळशीपत्र ठेवतो असेही एक रुपक मानले जाते.
कपाळी गोपीचंदनाचा टिळा किंवा गंध त्यावर अबीर आणि कुंकुमाचे दोन ठिपके वारकऱ्यांचे सौन्दर्य फार खुलवते. स्नानानंतर कपाळी गंध सर्वांगी चंदनाचे पट्टे अंगावर उमटवल्याशिवाय वारकऱ्याचा दिवस चालू होत नाही. या गोपीचंदनाच्या स्पर्शाने सर्वांगाला शीतलता प्राप्त होते असा या भाबड्या लोकांचा विश्वास आहे. शरीरातील सत्व गुणाच्या वर्धनासाठी शांत रहाणे आवश्यक आहे. ती मनाची शांती या गोपीचंदनाने मिळते. अबीर हे वैराग्याचे प्रतिक म्हणून त्याला महत्व आहे.
आकाश तत्वाच्या उत्पत्ति बरोबर शब्दाची उत्पत्ति झाली. जगाच्या अंतापर्यंत चिरकाल टिकणारी गोष्टही शब्दच आहे. टाळातून निर्माण होणारा ताल वारकऱ्याला ‘स्व’ विसरायला लावतो. टाळ आणि टाळी यामध्ये ब्रम्हानंद उभा रहातो. टाळाचा घोष आणि नामाचा गजर झाला की आपोआप ब्रम्हानंद नाचत नाचत येतो.
एकादशी व्रत हे वारकऱ्यांचे लक्षणसवरूप आहे, धर्म आहे. भगवान विष्णूची ही आवडती तिथी म्हणून एकादशीला महत्व आहे. शेकडो अश्वमेघ यज्ञाचे पुण्य प्राप्त करून देण्याची शक्ती या एका व्रतात आहे.
वारीच्या वाटचालीत फुगडी खेळला नाही असा वारकरी सापडणार नाही. वैष्णव जन वाळवंटी निरनिराळे खेळ खेळतात. हे खेळ खेळत असताना ते मनातला द्वैत भाव विसरून जातात, भेदाभेद विसरतात. क्रोध, अभिमान पायदळी टाकून ते एका वेगळ्याच ऊंचीवर पोहोचतात. या फुगडीचे अनेक प्रकार वारकरी खेळतात. बसफुगडी, दंडफुगडी, जातेफुगडी, नकुल्या, भुईफुगडी इत्यादी अनेक प्रकार आहेत. या फुगडीच्या जोडीने इतरही अनेक खेळ खेळले जातात. हे खेळ वारकऱ्यांच्या मनातला वृथा अभिमान नष्ट करतात. आणि याच आनंदात वारकरी विठूला आळवताना म्हणतो.
खेळ मांडियेला वाळवंटी घाई | नाचती वैष्णव भाई रे ||
क्रोध अभिमान केला पावटणी | एका एका लागतील पायी रे ||
(लेखक डॉ. नरेंद्र भिकाजी कदम, BAMS, PGDHHAM, MBA, LLb. लेखनाची रुची आहे. सिक्सटीन डेज ऑन व्हील्स हे लदाखचे प्रवासवर्णन प्रकाशित झाले आहे. चाळ-वा-चाळ-व ही चाळ संस्कृतीची ओळख करून देणारी लेखमाला पुण्याच्या प्रभातमध्ये रुपगंध पुरवणीत प्रकाशित होते आहे.
त्यांच्या लेखनाला सुलेखनाची जोड दिली आहे ती डॉ. तेजस वसंत लोखंडे, BAMS, आयुर्वेद चिकित्सक यांनी. हा माणूस म्हणजे सुलेखन, रांगोळी, गड संवर्धन या गोष्टींसाठी सतत प्रयत्नशील असलेला अवलिया असंच म्हणावं लागेल.)