मुक्तपीठ टीम
वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतक ठोकणारी भारतीय महिला संघातील फलंदाज शेफाली वर्मा दहावी परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. हरियाणा बोर्डाने घेतलेल्या परीक्षेचे निकाल जाहीर झाले असून यात शेफालीने ५२ टक्के मिळवले आहेत. इंग्लंडला गेलेल्या शेफालीला तिच्या वडिलांनी फोनवर निकाल कळवला. त्यानंतर शेफालीने आनंद व्यक्त केला. शेफालीच्या या यशामुळे तिच्या कुटुंबीयांना आनंद झाला आहे. नुकतीच आयसीसीच्या सर्वोत्तम खेळाडूंच्या यादीत समावेशासोबतच दहावी पासची ही दुसरी कामगिरी म्हणजे शेफालीचा डबल धमाकाच आहे.
हरियाणाच्या रोहतकमध्ये राहणारी १७ वर्षीय शेफाली वर्मा. शेफाली सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. आतापर्यंत या दौऱ्यात भारताने एक कसोटी आणि तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली आहे. शेफालीने या दौऱ्यात कसोटी आणि वन डेत पदार्पण केले असून तिची कामगिरी देखील चांगली झाली आहे. भारताकडून पदार्पणात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम यावेळी शेफालीने स्वत:च्या नावावर केला. या महिन्यात आयसीसीकडून दिल्या जाणाऱ्या सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराच्या यादीत शेफालीचा समावेश करण्यात आला आहे.
शेफालीचं शालेय शिक्षण मंडळाकडून अभिनंदन
- शेफालीने मार्च महिन्यात १०वीची परीक्षा दिली होती.
- शालेय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, प्रोफेसर डॉ. जगबीर सिंह यांनी शेफाली यांचे अभिनंदन केले आहे.
- ते म्हणाले, “भारतीय महिला क्रिकेट संघातील प्रथम क्रमांकाची शेफाली वर्मा ५२% गुणांसह दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा मंडळाला अभिमान आहे. मी शेफाली वर्मा यांना शुभेच्छा देतो.
शेफालीच्या कुटुंबात आनंदोत्सव
- शैक्षणिक यशानंतर स्वाभाविकच कुटुंबातही आनंदाचे वातावरण आहे.
- निकाल जाहीर झाल्यानंतर शेफालीचे वडील संजीव वर्मा यांनी स्वत: फोन करून इंग्लंडला गेलेल्या मुलीला माहिती दिली.
- इंग्लंडमध्ये शेफालीच्या उत्तम कामगिरीमुळे तिला महिन्याचा सर्वोत्कृष्ठ खेळाडू म्हणून निवडले जाण्याची शक्यता असल्याचे संजीव वर्मा यांचे म्हणणे आहे.