डॉ. गणेश गोळेकर / व्हा अभिव्यक्त!
ओबीसी नेते पक्षाचे जोडे काडून एकत्र येतात आणि प्रश्न सोडवतात. मराठा समाजाचे लोक रस्त्यावर येतात आणि नेते स्वतःचे प्रश्न सोडवतात असेच चित्र आहे. मराठा समाजातील सामान्य माणूस बिचारा यात भरडला जातोय. सारं अस्वस्थ करणारं चित्र आहे. फक्त दाखवण्यासाठीची उक्ती वेगळी आणि प्रत्यक्षातील कृती वेगळीच, असेच चित्र आहे.
ओबीसींसह इतर समाजाचे नेते पक्षाची जोडे बाजूला ठेवून समाजाच्या प्रश्नावर एकत्र येतात चर्चा करतात, विचारविनिमयाने प्रश्न मांडतात. प्रसंगी आंदोलने करतात, उपोषण करतात, रास्ता रोको करतात, जाहीरपणे समाजाचे प्रश्न मांडतात. त्यांना कोणतीच राजकीय अडचण, राजकीय पक्षाची धोरणे आडवे येत नाहीत. हीच बाब मराठा समाजाला का लागू होत नाही. स्वतःला नेते म्हणणारे मराठा समाजाचे पुढारी मराठा समाजाच्या प्रश्नासाठी एकत्र का येत नाहीत? कोणत्याही निवडणुकीच्या वेळे यांना मतदार म्हणून पहिले समाजच आठवतो. मराठा समाजाच्या मतदानावरच मराठा पुढारी- नेते हे सत्ता उपभोगतात. विविध अधिकार पदावर जातात. मात्र सत्ता मिळाल्यास त्याची परतफेड म्हणून समाजासाठी काहीच का करीत नाहीत? समाजाचे आपण देणे लागतो, याचा विसर त्यांना का पडावा? निवडणुकीच्या धामधुमीत गल्ली-बोळात फिरणारे, वाड्या-वस्त्यांवर फिरणारे मराठा नेते सत्तेत आल्यानंतर समाजासाठी काही विधायक करणे सोडाच मात्र जाहीरपणे समाजाच्या प्रश्नावर बोलायला धजावत नाहीत, ही मोठी शोकांतिका आहे.
गरीब मराठा समाजाचा विचार करा!
कोणताही समाज संपूर्ण श्रीमंत नसतो. समाजातील काही मुठभर लोक प्रगत, शिक्षित, आर्थिकदृष्ट्या संपन्न म्हणजे सर्व समाजच सुधारलेला हा भ्रम आहे. मराठा समाजातील काही श्रीमंत, कारखानदार, संस्थाचालक, लोकप्रतिनिधी प्रगत म्हणजे सर्व मराठा प्रगत म्हणणे अतिशयोक्ती ठरेल. अठराविश्वे दारिद्र्याने ग्रासलेला पारंपारीक शेतीत काहीच उरत नसलेल, अल्प भूधारक, भुमीहीन, शेतमजूर, सालगडी, डबेवाले, हमाल, मोलकरीण, ऊसतोड कामगार, विटभट्टी मजूर रोजंदारीवाल अशी ओळख मराठा समाजातही आहे. देशातील शेतकरी आत्महत्येत राज्याचा नंबर अव्वल आहे. त्यातही ९७% हे मराठा शेतकरी आहेत. गरीब मराठा समाजाचे प्रश्न ज्वलंत आहेत. त्यांच्या मुलास आरक्षणाची खरोखरच गरज आहे. दुर्दैवाने या सामान्य मराठा समाजाच्या प्रश्नास वाचा फोडायला कोणीच तयार नाही.
मराठा समाजाची नेतेमंडळी करतात काय?
कोपर्डीच्या दुर्दैवी घटनेने समाज रस्त्यावर आला. ५८ मराठा क्रांती मूक मोर्चे शांततामय व कोणालाही त्रास न होता काढले. मोठी गर्दी उस्फूर्तपणे जमा होऊ लागली तेव्हा विविध राजकीय पक्षातील नेतेमंडळी या मोर्चात सामील होऊ लागली. त्यांना जर खरंच मराठा समाजाच्या भल्यासाठी मोर्चात सामील व्हायचे असते, तर त्यांनी आधीपासून मराठा समाजाच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले असते. पण तसे झाले नाही. मराठा समाजाच्या प्रश्नावर बोलायला तयार नसणारी मंडळी इतर समाजाच्या प्रश्नांवर त्यांच्या व्यासपिठावर कशी दिसतात? मराठा समाजाच्या प्रश्नावर बोलायलच यांची का कुचंबना होते.
ओबीसी-दलित नेते त्यांच्या समाजासाठी, मराठा नेते कुणासाठी?
ओबीसी-दलितांचे अनेक नेते-मंत्री हे त्यांच्या समाजाच्या प्रश्नावर जाहीरपणे बोलतात, भांडतात. कुठे अन्याय झालाच तर तात्काळ भेट देतात. मात्र मराठा नेते असे करताना का दिसून येत नाहीत? मराठा समाजाच्या प्रश्नावर बोलायलाच का तयार नाहीत? मराठा समाजाचे मीठच अळणी वाटते. सभागृहातही त्यावर ते बोलत का नसावेत? हा एक संशोधनाचा विषय आहे.
मराठा समाजासाठी सामाजिक न्याय का नाही?
शहरी भागात मराठा टक्काच कमी आहे. एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांचे प्रश्न गहन आहेत. माथाडी कामगारांच्या मुलांच्या शिक्षणात अनेक अडचणी आहेत. शेतकरी- कष्टकरी-गरीब मराठा समाज्यातील मुलांच्या शिक्षणाच्या समस्या गहन आहेत. इच्छा असूनही पैशाअभावी ते शिकू शकत नाहीत. कुटुंबाच्या उत्पन्नावर घर चालवणेच कठीणे तर यांच्या शिक्षणाची डाळ कुठे शिजणार? दारीद्र्याने गांजलेला या कुटुंबात शिकाल्यास तर आरक्षणाअभावी नोकरी कठीणच. समाजाच्या दबावापोटी मुल-मुलांचे थाटात होणारी लग्नं. अनेक पारंपारिक प्रथांचे जोखड त्याला आणखी खर्चातच ढकलते. स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही मराठा समाजातील मुलींच्या लग्नासाठी, सामुहिक विवाह सोहळ्यासाठी अनुदान देण्याची कल्पना मराठा नेत्यांना सुचली नाही? राज्या च्या सामाजिक न्याय विभागाकडे मराठा नेत्यांनी यासाठी आग्रह धरला नाही? स्वतःच्या घरातील तिसरी-चौथी पीढी तुम्ही नेता म्हणून समाजावर लादता. समाजही आनंदाने नेतृत्व स्विकारतो. समाज म्हणून आपले कर्तत्व पार पाडणे यांनी केलेल्या ऋणातून उतराई होणे मराठा पुढाऱ्यांना कधी समजणार?
शिक्षण सम्राटांची गरजू मराठ्यांना का मदत नाही?
जे मराठा शैक्षणिक संस्थाचालक आहेत त्यांनी गरीब गरजू मराठा समाजातील मुलं-मुलींना ५% प्रवेश – मोफत किंवा माफक दरात द्यायला काय अडचण आहे? राज्य विधीमंडळात जवळपास १५० आमदार ही मराठा समाजाचे आहेत. किमान ३० हून अधिक खासदार समाजाचे आहेत. त्यांनी किमान ५ ते १० मराठा मुलींना शिक्षणात मदत केली तर त्यांनाही काय फरक पडणार आहे ही तुमचीच मतदार कुटुंबे कायम स्वरूपी असतील.
लोकप्रतिनिधींनी का जबाबदारी घेऊ नये?
हा पायंडाच व्हायल हवा की मराठा सरपंचाने आपल्या पाच वर्षाच्या कालखंडात दरवर्षी दोन अतिगरीब मुलांच्या शिक्षणाचा खर्च पेलायचा पंचायत समिती जिल्हा परिषर, नगरपालिका – महानगरपालिका मराठा सदस्याने आपल्या विभागातील किमान पक्षी २ ते ५ मुला/ मुलींच्या शिक्षणाचा राहण्या- खात्याचा खर्च उचलावा. साखर कारखानदारांनीही असेच योगदान द्यावे, निश्चितच मराठा समाजाच्या प्रगतीचा आलेख उंचवायला मदत होईल.
सर्वच राजकीय पक्षाच्या मराठा नेत्यांनी मराठा समाजाच्या विकासासाठी कंबर कसली पाहीजे. आम्हाला तुमच्यावर टिकाच करायची नाही तर आपल्या हातून समाज सुधारणेचे कार्य करून घ्यायचे आहे. समाजाचे तारणहार म्हणून समाज आपणाकडे आशेने पाहात आहे. शासन स्तरावरही नेता म्हणून आपणासच मराठा प्रश्न सोडवायचे आहेत. शासन पातळीवरील निर्णय होतील तेव्हा होतील मात्र तोपर्यंतच तुमच्याकडे ज्या शिक्षणसंस्था आहेत, अधिकार – पैसा आहे, त्यातून गावातील, शहराच्या वार्डातील दोन पाच गरीब मराठा मुला/ मुलींना आधार दिला तर तेच हात आपणास कायमस्वरूपी मदतीसाठी तयार राहतील.
पक्षभेद विसरून मराठा नेते कधी एकवटणार?
इतर समाजाचे नेते त्यांच्या समाजासाठी राजकीय पक्षाभिनिवेश सोडून एकत्र येतात. दबावगट तयार करतात. अगदी तशाच प्रकारचा दबाव मराठा नेता म्हणून कधी करणार? एक सामान्य मराठा युवक म्हणून आपणास आवाहन करण्यात येते की, जसा आमच्या गर्दीचा आपण फायदा उठवत आहात, अगदी त्याच बरोबर आमच्या मागण्यांसाठी तुम्ही प्रामाणिकपणे – तळमळीने आणि कोणतेही राजकारण न करता मदत करा. विविध राजकीय पक्षाची जोडे बाजूला ठेवून मराठा समाजाच्या उत्कर्षासाठी आपणास एकत्र येणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी आपण कधी प्रयत्न करणार? आपण हे केले तर समाज डोक्यावर घ्यायला कमी करणार नाही. मात्र तसे झाल नाही तर याचे परिणामही आपणासच भोगावे लागतील.
डॉ. गणेश नानासाहेब गोळेकर
संभाजीनगर
(लेखक हे मराठा आरक्षणासाठी आग्रही कार्यकर्ते मराठा सेवक आहेत.) मोबा. 8237115303.