मुक्तपीठ टीम
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या तीर्थस्थान आता खऱ्या अर्थाने तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाण्याचा मार्ग मोकळा झालाय. त्र्यंबकेश्वर शहरातील सांडपाणी गोदावरी नदीत सोडले जाऊ नये यासाठी प्रस्तावित असलेल्या नगर परिषदेच्या मल:निसारण प्रकल्पाला राज्याच्या नगरविकास विभागाने मंजुरी दिली आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यासाठी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ३४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
त्र्यंबकेश्वर शहरातील सांडपाण्यामुळे गोदावरी नदीचे पाणी प्रदूषित होत होती. राष्ट्रीय हरित लवादाने याची दखल घेऊन राज्य शासनाला शहरात मल:निसारण प्रकल्प सूरु करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाचा मान ठेवून त्रंबकेश्वर नगर परिषदेने ३९ कोटी रुपयांच्या मल:निसारण योजनेचा विकास आराखडा तयार करून तो शासनास सादर केला होता. राज्य शासनाच्या सनियंत्रण समितीने मंजुरी दिल्यानंतर नगरविकास विभागाने या कामासाठी निधी मंजूर केला आहे.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत हा निधी मंजूर करण्यात आला असून दोन टप्यात तो वितरीत केला जाणार आहे. यातील पहिल्या टप्प्यात ४.५ एमएलडी क्षमतेचा सांडपाणी मलशुद्धीकरण प्रकल्प म्हणजेच (एसटिपी) ची उभारणी करण्यात येणार असून दुसऱ्या टप्प्यात शहरात अंतर्गत मल:निसारण वाहिन्यांचे काम केले जाणार आहे. या निर्णयामुळे शहरातील सांडपाणी शुद्ध होऊन नदीत सोडले जाणार असल्याने गोदावरी नदीच्या प्रदूषण पातळीत घट होण्यासाठी त्यांची मदत होणार आहे. कार्यादेश मिळाल्यापासून दोन वर्षात या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण करण्याचे आदेश नगरपरिषदेला देण्यात आले आहेत.
कुंभमेळा आणि महाशिवरात्री निमित्त दरवर्षी लाखो भाविक त्र्यंबकेश्वर शहराला भेट देतात. मात्र सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही संख्या कमी असली तरी शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. दुसरीकडे नद्या प्रदूषित होऊ नयेत ही देखील आपली सामाजिक जबाबदारी आहे. त्यामुळे हा प्रकल्प लवकरात लवकर उभारल्यास गोदावरी नदीतील प्रदूषण पातळीत नक्कीच घट होऊ शकेल, याच भूमिकेतून या योजनेसाठी निधी दिल्याचं मत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय जाधव यांनी हा निधीचे पत्र स्वीकारले असून, त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, बांधकाम समितीचे सभापती कैलास चोथे, त्र्यंबकेश्वर मंदिर समितीचे विश्वस्त दिलीप तुंगार, सत्यप्रिय शुक्ल आणि अमित टोकेकर यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले.