मुक्तपीठ टीम
बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि आपल्या आक्रमक वक्तव्याने नेहमीच वाद उफाळवणारी कंगना रणौत आता एकामागोमाग एक अडचणीत अडकू लागली आहे. सतत वाट्टेल ते बोलल्यामुळे कंगना चर्चेत येत असली तरीही तिच्याकडे चित्रपट मात्र तेवढे उरलेले नाहीत. तसेच तिच्या वादग्रस्त प्रतिमेमुळे तिच्याकडील मोठ्या ब्रँड्सच्या एंडोर्समेंटची कामेही कमी झाली आहेत. त्यातच आता तिच्याविरोधात दाखल असलेल्या देशद्रोहाच्या गुन्ह्याचा दाखला देत पासपोर्ट विभागाने तिचा पासपोर्टची मुदतवाढ रोखून धरलेली आहे. त्यामुळे तिला शुटिंगसाठी परदेशी जाणे अशक्य झाले आहे. त्याचाही करिअरला फटका बसू शकतो.
कंगनाकडे कमी चित्रपट
• कंगना नेहमीच बॉलिवूडमधील निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री यांच्याविषयी वाट्टेल ते बोलते.
• त्यामुळे तिच्याविषयीही फारसं कुणी चांगलं बोलत नाही.
• तिच्यासोबत काम करायलाही मोठे अभिनेते, दिग्दर्शक तयार नसतात.
• त्यामुळेच तिच्याकडे सध्या म्हणावे तेवढे चित्रपट नाहीत.
एन्डोर्समेंट कमाईही घटली
• सेलिब्रिटींना केवळ अभिनयातून नाही तर मोठ्या ब्रँड्सच्या एंडोर्समेंटमेंटमधून मोठे उत्पन्न मिळते.
• पण जर सेलिब्रिटी कोणत्याही वादात सापडले तर ब्रँडव्हॅल्यू जपण्यासाठी त्यांची साथ सोडली जाते.
• कंगनाने अनेक मुद्द्यांवर समाज, राज्य, राजकीय पक्ष यांना दुखावणाऱ्या भूमिका सातत्याने घेतल्या.
• त्यामुळे ती सतत चर्चेत राहिली, पण त्यामुळे तिला नकारात्मक वलय तयार झाले. त्यामुळे काही ब्रँडनी फारकरत घेतल्याचे दिसते. आयकर भरण्यासाठी मुदत मागून तिने कमाई कमी झाल्याचे सांगितले होते.
आता पासपोर्ट अडचणीत!
• आता कंगनाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यावेळी कंगनांने पासपोर्ट नुतनीकरणासाठी उच्च न्यायालयाची पायरी चढली आहे.
• कंगनाच्या नावे वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिच्या द्वेषपूर्ण ट्विटमुळे देशद्रोहाच्या आरोपाखाली हा गुन्हा दाखल झाला आहे.
• कंगना राणौतला एका चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी बुडापेस्ट जायचे आहे. मात्र, पासपोर्ट विभागाने देशद्रोहाच्या गुन्ह्यामुळे पासपोर्ट नुतनीकरणावर आक्षेप घेतला आहे.
• त्यामुळे तिच्या चित्रपटाचे परदेशातील चित्रिकरण धोक्यात आले आहे.
कंगनाने न्यायालयीन याचिकेत काय?
• कंगनाने न्यायालयात सादर केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, पेशाने अभिनेत्री असल्याने देश-विदेशातील प्रवास करावा लागतो.
• एका चित्रपटात प्रमुख भूमिका साकारत असल्याने १५ जून ते ऑगस्टपर्यंत बुडापेस्टमध्ये प्रवास करायचा आहे.
• पासपोर्टची मुदत सप्टेंबर २०२१मध्ये संपणार आहे.
• त्यामुळे पासपोर्ट विभागाकडे नुतनीकरणासाठी अर्ज केला होता.
• पण एफआयआर दाखल करण्यात आल्यामुळे पासपोर्ट रिन्यूअलसाठी नकार देण्यात आला.
• चित्रपटाच्या प्रॉडक्शन हाऊसने लोकेशन बुक करण्यासाठी बराच खर्च केला आहे.
• त्यामुळे पासपोर्ट नुतनीकरण आवश्यक आहे, असे कंगनांने म्हटले आहे.
• मात्र, न्यायालयाने तातडीने सुनावणी न घेता पुढची तारीख दिली आहे.