मुक्तपीठ टीम
भारतात प्रथमच ड्रोनने वैद्यकीय साहित्य डिलिव्हरीची चाचणी १८ जूनपासून बंगळुरूमध्ये अधिकृतपणे सुरू होणार आहे. याला बियॉन्ड व्हिज्युअल लाईन ऑफ साइट मेडिकल ड्रोन असेही म्हणतात. थ्रोटल एरोस्पेस सिस्टम्स म्हणजेच टीएएस नावाची कंपनी बंगळुरुजवळ चाचणी घेणार आहे. तेथे ३० ते ४५ दिवस ही चाचणी घेतली जाईल.
डिलिव्हरीसाठी दोन प्रकारचे ड्रोन वापरले जातील. लहान मेडकॉप्टर १५ किलोमीटरपर्यंत एक किलो वजन नेऊ शकतो. तर, दुसरा १२ किलोमीटरपर्यंत २ किलो वजन नेऊ शकतो. ३० ते ४५ दिवसांमध्ये रेंज आणि सुरक्षा दोन्हीसाठी चाचण्या आयोजित करण्यात येणार आहेत. डीजीसीएच्या नियमांनुसार किमान १०० तास उड्डाण करावी लागणार आहे. त्यामुळे त्यांचे लक्ष १२५ तास उड्डाण करणे ठरवण्यात आले आहे.
थ्रोटल एरोस्पेस सिस्टम्सने दिलेल्या माहितीनुसार, २० मार्च २०२० रोजीच नागरी विमानन संचालनालयातून चाचणीसाठी परवानगी मिळाली होती. परंतु, कोरोना साथीमुळे काही इतर प्रक्रिया राहिल्या. आता त्या पूर्ण झाले आहे. थ्रोटल एरोस्पेस सिस्टम्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी नागेंद्रन कंडासमी यांनी सांगितले की, “इतर दोन कॉन्सोर्टियमलाही बीव्हीएलओएस परवानगी आहे. परंतु कायदेशीरदृष्ट्या हा आमचा पहिला अधिकृत वैद्यकीय ड्रोन वितरण प्रयोग आहे.”
सुप्रसिद्ध कार्डियक सर्जन आणि नारायणा हेल्थचे डायरेक्टर डॉ. देवीशेट्टी ही या प्रकल्पात भागीदार आहेत. टीएएस आणि नारायणा हेल्थ सेंटर औषध वितरणासाठी भागीदारी करतील. चाचणी दरम्यान, औषधे वितरीत करण्यासाठी ड्रोनचा वापर केला जाईल. कांडसामी म्हणाले की, “नारायणा हेल्थ सेंटरकडे मागणी आल्याचे आमच्या सॉफ्टवेअरला कळेल. प्राप्तकर्ता कोण आहे हे कोणालाही माहिती नसते आणि प्रीलोड केलेल्या पत्त्यावर औषध दिले जाईल.”