मुक्तपीठ टीम
राष्ट्रवादी काँग्रेसच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना संदेश दिला आहे. त्यात त्यांनी कोरोना संकट काळ लक्षात घेऊन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बलाढ्य ढाल बनावे, लहानग्यांना कोरोनापासून सुरक्षित राखाव आणि कोरोनाचा संपूर्ण नायनाट करण्यात महत्वाची भूमिका पार पाडावी, असे आवाहन केले आहे.
वर्धापन दिनानिमित पक्षाचा कार्यक्रम पोहचवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक पत्र पाठवले आहे. त्या पत्रातील महत्वाचे मुद्दे पुढील प्रमाणे आहेत:
वर्धापन दिन सप्ताहा मध्ये खालील प्रमाणे कार्यक्रमाचे नियोजन आपणास करावयाचे आहे. या सप्ताहामध्ये जास्तीत जास्त वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन व पर्यावरण रक्षण याबाबतचे कार्यक्रम घ्यावेत.
कोरोनाविरोधातील बलाढ्य ढाल बना!
• कोरोनाशी लढताना १ वर्षाहूनही अधिक काळ झाला असून आपण आज एका महत्त्वाच्या टप्प्यावर सर्वजण येऊन पोहोचलो आहोत.
• हा प्रवास आपल्या सर्वांच्या आयुष्यातला फार खडतर व कठीण असा काळ होता.
• अनेकांना या कोरोनामुळे अत्यंत वाईट प्रसंगांना सामोरे जावे लागले.
• अनेकांनी जीव गमावले तर अनेकांनी यातना भोगून जीव वाचवला आणि अजूनही आपण कोरोना च्या दुसऱ्या लाटेतुन पुर्णतः बाहेर पडलेलो नाही हे सत्य आपल्या सर्वांना मान्य करावेच लागेल.
• असे सावरत असताना पुढील काळात आपल्या समोर येणाऱ्या तिसऱ्या लाटेचे मोठं आव्हान देखील उभे राहिले आहे.
• सर्व संकटांना आपल्या सामर्थ्याने तोंड देणारा माझा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता बलाढ्य ढाल बनून कोरोनाला आपल्या लहानग्यांपर्यंत पोहचू न देता मुळापासून त्याचे उच्चाटन करण्यात पुढे होऊन आपली महत्वाची भूमिका बजावेल असा मला ठाम विश्वास आहे.
म्हणूनच आपण यावर्षी १० जून २०२१ रोजी आपल्या पक्षाचा हा वर्धापन दिन “आरोग्य दिंडी” राबवून पूर्णत्वास न्यावयाचा आहे. याकरीता आपण जिल्ह्यात ध्वजवंदनांनंतर तालुका, वार्ड स्तरावर आरोग्य दिंडीचे कार्यक्रम घेऊन जनतेला, कोरोना मृत्यूच्या महातांडवातून वाचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करायचे आहेत, असेही जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना बजावले आहे.
लहानग्यांपासून कोरोना दूर राखा!
• कोरोना व म्यूकरमायक्रोसीस आजार माहिती व योजना तसेच त्यात वेळोवेळी सर्वसामान्य माणसाच्या हिताच्या दृष्टिकोनातून केलेले महत्वाचे बदल यासंदर्भात सविस्तर माहिती देणे. मास्क, सॅनिटायझर चा योग्य वापर यावर प्रात्यक्षिक द्वारे जनजागृती करणे.
• बदलणारी कोरोना रोगाची लक्षणे नविन आलेले स्ट्रेन लहान मुलांची काळजी इ. महत्वाच्या माहिती करिता तज्ज्ञ डॉक्टर यांचे मोबाईल नंबर ( डॉक्टर सेल) व त्यांच्याशी थेट संवाद सत्र जनतेकरिता आयोजित करणे.
लसीकरणासाठी जनजागृती
• २१ जून नंतर सर्वांचे लसीकरण करण्याची जबाबदारी केंद्राने उशिरा का होईना स्वीकारली आहे. तरी जनतेचा अधिक वेळ वाया जाऊ नये म्हणून ज्यांनी लस घेतली नसेल त्यांना त्यांच्या मनातील गैरसमज दूर करून लस घेण्यासाठी प्रवृत्त करणे, ज्यांना ऑनलाईन नोंदणी करणे जमत नसेल त्यांची नोंदणी करणे. कोणाचा एक डोस घेऊन झाला असेल, तर त्यास त्याने घेतलेल्या लसीनुसार त्याला दुसऱ्या डोसची नेमकी तारीख सांगणे. तसेच नवीन उपलब्ध होणारी लसीकरण केंद्र यांचा व सध्या अस्तित्वात असलेल्या लसीकरण केंद्रांची माहिती पत्रक काढणे.
• जेष्ठ नागरीक, विकलांग अपंग या व्यक्तींचे लसीकरण करून घेण्यासाठी विशेष मोहिम राबविणे
कोरोनापश्चातच्या काळजीविषयी जनजागृती
• कोरोना होऊन गेल्यावरही रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढत चालले आहे याकरिता पोस्ट कोव्हिड ( Recovery पिरियड) मध्ये काय विशेष काळजी घेणे आवश्यक आहे या संदर्भात जनजागृती करणे देखील अत्यन्त आवश्यक आहे.
• कोरोनामुळे निराधार झालेल्या बालकांची माहिती घेऊन त्यांना राज्य व केंद्र शासनाने जाहीर केलेल्या योजनेमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे.
आरोग्य सुविधांची माहिती पोहचवा!
• आपल्या जिल्हयात, तालुक्यात उपलब्ध असलेल्या रक्तपेढी संदर्भातील माहिती सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून देण्याबरोबरच अवयदान मोहीम राबविणे व यासंदर्भात जनजागृती करणे.
• आपल्या जिल्हा, तालुक्यातील आदिवासी क्षेत्रातील जनतेमध्ये लसीकरण मोहीम संदर्भात समज गैरसमज दूर करून त्यांची मानसिकता बदलण्याकरिता विशेष प्रयत्न करणे व आदिवासी भागात देखील जास्तीत जास्त लसीकरण होण्याकरिता शासनास सहकार्य करणे.
• पावसाळ्यात उद्भवणारे आजार, साथीचे रोग यांपासून घ्यावयाची काळजी व उपाययोजना याबाबत माहिती देणे.
• शासनाच्या विविध आरोग्य योजना या संदर्भात जनजागृती करणे.
तरी आपण सर्वांनी पक्षाचा हा वर्धापन दिन लोकांना कोरोना मृत्यूतांडवातून वाचविण्यासाठी समर्पित भावनेने साजरा करावा, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले आहे.
आता या महत्वाच्या क्षणी बुद्धिमत्तेचा सुयोग्य वापर करून जनजागृती, लक्षणे, डॉक्टर, आरोग्य योजना याची माहिती, लसीकरण सुनियोजन या सर्व मुद्दयावर एकाच वेळी लक्ष केंद्रित करून दि. १० जून २०२१ ते २० जून २०२१ या कालावधीत आपण माणुसकीच्या नात्याने ही ” आरोग्य दिंडी ” यशस्वी कराल असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.