मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रात नांदेड डिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील साप्ती गावातील अभिजीत कदम. वडील शेतकरी. त्यामुळे प्रतिकुलतेवर प्रामाणिक परिश्रमानं मात करण्याची जन्मजात सवय असावीच. त्यामुळेच अभिजीतनं साप्ती गावच्या मातीतील प्रतिभेचा डंका थेट ऑस्ट्रेलियापर्यंत वाजवलाय. अभिजीत कदम सध्या नागपुरात असतो. नागपूर विद्यापीठात त्याला अप्लाइड फिजिक्समध्ये जगातील दोन सर्वोत्कृष्ठ शास्त्रज्ञांपैकी एक असणाऱ्या प्रा. डॉ. संजय ढोबळेंचं मार्गदर्शन मिळालं. भौतिक शास्त्राचा अवघड पण खूप काही करून दाखवण्याची संधी असलेला ज्ञानमाग्रही सापडला. त्याने परिश्रमाने अभ्यास केला. खूप केला.
सध्याही तो ढोबळेसरांच्या मार्गदर्शनाखाली पी.एच.डी.साठी अभ्यास, संशोधन करतोच आहे. पण ते करतानाच त्याने लावलेला एक शोध त्याच्या गावासारख्या अनेक ठिकाणी प्रकाश पडावा असाच आहे. त्याने फॉस्फर एलईडी मटेरिअलचा शोध लावला आहे. त्याचा वापर करुन बनवलेला व्हाइट एलइडी बल्ब हा ५० ते ७५ हजार तास चालू शकतो. अर्थात वीज पुरवठा स्थिर आणि चांगला असावा. सध्याच्या महागड्या एलइडीचे जीवनमान ५० हजार तास असल्याचा दावा केला जातो. हे लक्षात घेतलं तर अभिजीतच्या संशोधनाचे महत्व कळेल.
अभिजीतच्या एलईडी मटेरिअलचा वापर करुन बनवलेला एलईडी बल्ब वीज वापर कमी करेल. जास्त चालेल. त्यामुळे वाचलेली वीज, बल्ब आणखी काही गावांमधील अंधार दूर कऱण्यासाठी उपयोगी ठरतील. त्याच्या एलईडी मटेरिअल शोधाला ऑस्ट्रेलियाकडून पेटंटही मिळाले आहे.
यापूर्वी त्याला ब्लू एलईडी मटेरिअलचे पेटंटही मिळाले आहे. दोन्ही पेटंट ८ वर्षांसाठी वैध आहेत. विशेष म्हणजे, ज्या संशोधनासाठी तीन जपानी शास्त्रज्ञांना नोबेल पारितोषिक देण्यात आले होते, तेच काम करत अभिजितने नोव्हेंबर २०२० मध्ये ऑस्ट्रेलियन पेटंट आणि ब्लू एलईडी आणि आता व्हाइट एलईडीसाठी आंतरराष्ट्रीय अनुदान मिळवले आहे.
२०१४ मध्ये जपानी शास्त्रज्ञ इशामु अकासाकी, हिरोशी अमानो आणि शुजी नाकामुरा यांना ब्लू एलईडीसाठी विज्ञान क्षेत्रात नोबेल पुरस्कार देण्यात आला. यास पुढे घेऊन जात अभिजीतने व्हाइट एलईडीसाठी नवीन सामग्री शोधली आहे जी इतर एलईडीपेक्षा स्वस्त आणि टिकाऊ आहे.
एलईडी मटेरिअलमुळे अधिक शक्ती आणि प्रकाश
• अभिजीतने शोधलेल्या मटेरिअलने बनवलेला व्हाईट एलईडी बल्ब जास्त दिवस टिकणार.
• त्याचे आयुष्य ७५ हजार ते एक लाख तास असेल.
• त्याशिवाय सध्या अस्तित्त्वात असलेल्या सीएफएल बल्बपेक्षा ५ पट जास्त विजेची बचत होईल आणि अधिक प्रकाशही मिळेल.
अभिजीतची कामगिरी
• अभिजीतने गेल्या १८ महिन्यांत १७ रिसर्च पेपर प्रकाशित केले आहेत.
• त्यावेळी त्याने ७ वेगवेगळे पेटंट्सही मिळवले आहेत.
• या व्यतिरिक्त, २०२० मध्ये झालेल्या सेकंड इंटरनेशनल कॉन्फ्रेन्स ऑन रिसेंट ट्रेंड्स इन रिन्यूएबल अॅन्ड सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये त्याला गौरवण्यातही आले आहे.
पर्यावरणपूरक संशोधन
• जीवनमान सीएफएल बल्बापेक्षा अंदाजे पाचपट जास्त
• कमी वीजेचा वापरस सीएफएलपेक्षा पाच पट कमी
• अभिजीतने शोधलेल्या मेटेरिअलने बनवलेला बल्ब ५० हजार तासांपेक्षा जास्त, किमान ७५ हजार तासांपेक्षा जास्त चालेल. फक्त वीज पुरवठा सातत्य पूर्ण असावा.
गुरुमुळे करिअरला दिशा
• डॉ. संजय ढोबळे हे नागपूर विद्यापीठात भौतिक शास्त्र विभागात प्राध्यापक आहेत.
• ढोबळे सरांच्या कर्तृत्वाची महती म्हणजे अमेरिकेतील स्टँडफोर्ड विश्वविद्यालयाने अप्लाइड फिजिक्समध्ये त्यांचा जगातील सर्वोच्च दोन दोन शास्त्रज्ञांच्या यादीत समावेश केला होता.
• अभिजीत कदम त्याच्याविषयी सांगताना वारंवार त्याचे गुरु, मार्गदर्शक डॉ. संजय ढोबळे यांचा कृतज्ञतेने उल्लेख करत असतो.
पाहा व्हिडीओ: