मुक्तपीठ टीम
कोवॅक्सिन लस घेतलेल्यांपैकी ज्यांना आंतरराष्ट्रीय प्रवास करावा लागतो, त्यांच्यासाठीची अडचण उघड करणारी आहे. या बातमीनुसार कोवॅक्सिन या भारतीय लसीला भारतात मान्यता असली तरी डब्ल्यूएचओने मान्यता दिलेली नसल्यामुळे ती लस घेतलेल्यांच्या परदेश प्रवासाला मान्यता मिळेल का, याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे.
भारत बायोटेकची कोवॅक्सिन ही प्रभावी लस म्हणून भारतात प्रसिद्ध आहे. मेड इन इंडियाबरोबरच भारतातच शोधली गेली असल्याने खास कौतुकही होत असते.
मात्र, कोवॅक्सिन घेतलेल्यांच्या परदेश प्रवासात अडचणी येण्याची शक्यता माध्यमांमधील बातम्यांमधून व्यक्त केली जात आहे. विशेषत: या बाबतीत कडक नियम पाळणाऱ्या पाश्चिमात्य देशांमध्ये लसीकरण नसल्याने प्रवेश नाकारला जाण्याची शक्यता मांडली गेली आहे.
भारत बायोटेकच्या लसीच्या जागतिक मान्यतचे पुढील मुद्दे माध्यमांमधून चर्चेत आले आहेत:
कोवॅक्सिन घेणाऱ्यांच्या परदेश प्रवासात अडचणी?
• जगभरात त्याच लोकांचे लसीकरण झाले आहे, असे मानले जाते, ज्यांनी त्या त्या देशांनी मान्यता दिलेल्या अथवा जागतिक आरोग्य संघटनेच्या मान्यता यादीत असलेल्या लसींचे आवश्यक डोस घेतले आहेत.
• जागतिक आरोग्य संघटनेच्या यादीत सध्या कोविशिल्ड किंवा अॅस्ट्राझेनेका, माॉर्डना, फायझर,जेनसेन, सिनोफार्म या लसींचा समावेश आहे.
• कोवॅक्सिनने मान्यतेसाठी प्रयत्न सुरु केल्याचा उल्लेख आहे, मे-जून महिन्यांच्या बैठकीत त्या लसीच्या मान्यतेवर विचार होणार आहे.
त्यामुळे मान्यता नसलेल्या लसीच्या वापरातून केलेल्या लसीकरणाला इतर देशांकडून लसीकरण न झालेलंच मानलं जाईल. त्यामुळे संबंधित व्यक्तीच्या परदेश प्रवासात अडचणी येण्याची शक्यता माध्यमांमधील बातम्यांमधून व्यक्त करण्यात आली आहे.