मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रातील कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने गेले काही दिवस कडक निर्बंधांचे पाऊल उचलले आहेत. रुग्णसंख्या नियंत्रणातून आता फायदे मिळू लागलेले असताना सध्या संसर्ग उफाळलेल्या परराज्यातून नवा संसर्ग पसरू नये, यासाठी राज्य सरकारने उत्तरप्रदेश, बंगाल सारख्या संसर्ग उफाळलेल्या राज्यांमधून येणाऱ्यांसाठीही आरटी-पीसीआर चाचणीचे निगेटिव्ह रिपोर्ट सक्तीचे केले आहेत.
मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या आदेशानुसार कोरोना ही महामारी आपत्ती असल्याची अधिसूचना लागू असेपर्यंत या दोन्ही राज्यांना संवेदनशील उत्पत्तीचे स्थान मानले जाईल.या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे.
इतर राज्यांतून महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये उत्तरप्रदेश आणि पश्चिम बंगाल ही दोन राज्येही कोरोना संवेदनशील आपत्तीची ठिकाणं असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. महाराष्ट्रात येणाऱ्या या नागरिकांसाठी निश्चित करण्यात आलेली एसओपी लागू असणार आहेत. त्यांना प्रवेशापूर्वी ४८ तास आधीचा निगेटिव्ह आरटीपीसीआर रिपोर्ट असल्यास राज्यांत प्रवेश मिळणार आहे.
यापूर्वी घोषित झालेली संसर्ग संवेदनशील राज्ये
- राजस्थान
- गुजरात
- दिल्ली
- गोवा
- केरळ
- उत्तराखंड