मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातलं आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. ऑक्सिजन टंचाईमुळे लोकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. मात्र, काही डॉक्टरांनी त्यावर उपाय शोधला आहे तो ऑक्सिजन वाचवत आहे त्याच ऑक्सिजनमध्ये जास्त रुग्णांचे प्राण वाचवण्याचा. पंढरपूरमध्ये उपजिल्हा रूग्णालयात सध्या रिझरव्हायर बॅगचा नॉन रीब्रीथर मास्कसोबत वापर करून रूग्णांना क्षमतेएवढाच कृत्रिम ऑक्सिजन पुरवठा मिळतो. त्यामुळे ४० टक्के ऑक्सिजनची बचत होते. एकीकडे देशभरात ऑक्सिजनची कमतरता असताना दुसरीकडे बचतीचा ‘पंढरपूर पॅटर्न’ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. वैद्यकीय अधिक्षक डॉ. अरंविद गिराम व त्यांच्या टिमकडून हा पॅटर्न उपयोगात आणला गेला आहे. कमी ऑक्सिजनमध्ये रुग्णांचे जीव वाचवण्याच्या पंढरपूर पॅटर्न लवकरच राज्यभरात उपयोगात आणला जाईल.
असा मिळाला मार्ग ऑक्सिजन बचतीचा
• कोरोना संसर्गाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे बहुतांश रूग्णांना ऑक्सिजन पुरवठा लागत आहे.
• पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात ११५ कोरोनाचे रुग्ण आहेत, मात्र,
• ४६ ऑक्सिजन चालू आहेत.
• २००९-१० मध्ये डॉ. अरंविद गिराम हे एका ठिकाणी प्रशिक्षणासाठी गेले होते.
• या दरम्यान त्यांना ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असलेल्या रुग्णांना योग्य प्रकारे व आवश्यक तेवढा ऑक्सिजन पुरवठा कशा पध्दतीने पुरवायचा याचे मार्गदर्शन मिळाले होते.
• त्यावेळी त्यांना नॉन रीब्रीथर मास्कचा वापर करण्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले होते.
• त्यातून कमी ऑक्सिजनचा वापर करुन रुग्णांना पुरेसा श्वासोच्छवास घेता येतो.
असा उपयोगात आणला जातो नॉन रीब्रीथर मास्क
• उपजिल्हा रुग्णालयातील ३९ जणांना नॉन रीब्रीथर मास्क लावून ऑक्सिजन देण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
• यातून रूग्णांना ८० टक्यांहून अधिक ऑक्सिजन मिळण्यास मदत होईल.
• यामध्ये रूग्णांने श्वास घेतल्यानंतर उश्वासावाटे बाहेर पडणारा कार्बन डायऑक्साईड व्हॉल्वच्या माध्यमातून बाहेर पडेल.
• त्यामुळे निश्चितच शुध्द आणि क्षमतेएवढाच ऑक्सिजन नॉन रीब्रीथर मास्कमधून रूग्णास मिळेल.
• संबधित नॉन रीब्रीथर मास्कमुळे ऑक्सिजनची साठवणूक होईल.
• त्यातून ऑक्सिजनची बचतही होण्यास सुरूवात होईल.
• नॉन रीब्रीथर मास्कमुळे रूग्णांना जास्तीचा कृत्रिम ऑक्सिजन मिळतो.
• यामुळे रूग्णांची श्वसनप्रक्रिया लवकर सुधारते.
• या नॉन रीब्रीथर मास्कमुळे रूग्णांना लवकर बरे होण्यास मदत होते.
पंढरपूर पॅटर्नने ४० सिलिंडरची बचत
• आता फक्त ५० ऑक्सिजन सिलिंडर वापरात
• उपजिल्हा रुग्णालयात पन्नासच्या आसपास कोरोना रुग्णांना रोज कृत्रिम ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे.
• त्यासाठी किमान रोज ९० ऑक्सिजन सिलिंडरची आवश्यकता असते.
• परंतु नॉन रीब्रीथर मास्कचा वापर सुरु केल्यापासून तेवढ्याच रुग्णांना सध्या ५० ऑक्सिजन सिलिंडर लागतात, असे डॉ. अरंविद गिराम यांनी सांगितले.
डॉ गिराम यांच्या ऑक्सिजन बचतीच्या नॉन रीब्रीथर मास्कची दखल सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घेतली असून लवकरच या प्रयोगांची इतर जिल्हयातील रूग्णांलयामध्ये उपयोगात आणले जाईल,अशी अपेक्षा आहे. पंढरपुरातील कोरोना रुग्णांच्या आरोग्य रक्षणासाठी डॉ. अरंविंद गिराम, डॉ. प्रसन्न भातलवंडे, डॉ. सचिन वाळुजकर, डॉ. शिव कमल, परिचारिका जयश्री बोबले, रेखा ओंबासे, नाडगौडा यांची टीम अहोरात्र परिश्रम घेत आहे.
पाहा व्हिडीओ: