मुक्तपीठ टीम
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लसीकरण आणि टेस्टिंगवर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. तसेच कोणत्याही व्यक्तीमध्ये सौम्य लक्षण आढळून आली तरी त्याला सर्वप्रथम कोरोनाची टेस्ट करण्याचा सल्ला दिला जातो. कोरोना झालाय की नाही याची तपासणी करण्यासाठी रॅपिड अँटीजन टेस्ट, आरटी-पीसीआर सारखे टेस्ट आहेत. यातील आरटी-पीसीआर टेस्टचा निकाल इतर टेस्टपेक्षा अधिक अचूक येत असल्याचे समोर येत आहे. तसेच आरटी-पीसीआर टेस्टमधील सीटी व्हॅल्यू महत्त्वाची आहे. त्यामुळेच आरटी-पीसीआर टेस्ट आणि सीटी व्हॅल्यू म्हणजे काय ते समजून घेण्याचा प्रयत्न करुया.
आरटी-पीसीआर टेस्ट आहे तरी काय?
• आरटी-पीसीआर टेस्ट म्हणजेच रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमरेज चेन रिअॅक्शन टेस्ट होय.
• या टेस्टमध्ये कोणत्याही विषाणूच्या जेनेटिक मटेरियलला टेस्ट केले जाते.
• कोरोना विषाणू आरएनए विषाणू आहे म्हणजेच हा विषाणू फक्त आरएनए प्रोटीनने बनलेला आहे.
• त्यामुळे कोरोना विषाणूच्या आरएनएला सर्वप्रथम डीएनएमध्ये बदलला जातो.
• या प्रक्रियेला रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन म्हटले जाते.
• त्यानंतर या डीएनएमध्ये चेन रिअॅक्शन केली जाते.
• साध्या भाषेत याला फोटोकॉफी प्रमाणे म्हटले जाऊ शकते.
• या चेन रिअॅक्शनद्वारे नमुन्यामध्ये कोरोना विषाणू आहे की नाही त्याचा शोध लावला जातो.
आरटी-पीसीआर टेस्टमधील सीटी व्हॅल्यू म्हणजे काय?
• सीटी व्हॅल्यूला सायकल थ्रेशोल्ड असे म्हणतात.
• सीटी व्हॅल्यूच्या संख्येवर रुग्ण कोरोना बाधित आहे की नाही हे समजते.
• जर एखाद्या रुग्णाची सीटी व्हॅल्यू ३५ दाखवत असेल तर तो कोरोना पॉझिटिव्ह आहे असे समजले जाते.
• तसेच ज्यावेळी सीटी व्हॅल्यू कमी दाखवली जाते त्यावेळी रुग्णाची स्थिती अधिक गंभीर असल्याचे समजले जाते.
• सीटी व्हॅल्यू २३ ते २५ दरम्यान असेल तर रुग्णाची स्थिती धोक्याच्या बाहेर असे समजले जाते.
• सीटी व्हॅल्यू २२ पेक्षा कमी असेल तर रुग्णाला काळजी घ्यावी लागते.
• व्हॅल्यू जर १५ पेक्षा कमी असेल तर त्या रुग्णाला ऑक्सिजन बेडची तर १० पेक्षा कमी असेल तर आयसीयू बेडची गरज भासते.
सीटी व्हॅल्यू आणि सीटी स्कोअर मध्ये फरक काय?
• सीटी व्हॅल्यू आरटी-पीसीआर टेस्टमधून येते. ज्यातून संसर्गाची पातळी कळते.
• सीटी स्कोअर म्हणजेच सीटीस्कॅन यात फुफ्फुसांचे किती नुकसान झाले आहेत हे समजते.
• या दोघांचाही अर्थ वेगळा आहे, सीटी व्हॅल्यू जितकी कमी असेल तितके विषाणूचा प्रभाव जास्त असतो.
• तसेच जर सीटी स्कोअर जितका जास्त असेल तितके फुफ्फुसाचे नुकसान झाले असे समजले जाते.
पाहा व्हिडीओ: