अर्चना सानप
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी लिहायला, बोलायला आणि त्यासाठी विचार करायला लागले की लक्षात येतं, जगातील अनेक विद्वान एकत्र आले तरी त्यांच्या विद्वत्तेची बरोबरी होऊ शकत नाही. इतिहासात मागे वळून पाहिल्यास आपल्याला लक्षात येईल की हे सर्व महापुरुष, समाजसुधारक, क्रांतिकारक काही आकाशातून वीज चमकावी तसे अचानक येऊन क्षणार्धात निघून गेलेले नाहीत, तर त्यांच्या जगण्याला आणि जीवनाला एक परंपरा आहे. ती परंपरा म्हणजे विचारांचा वारसा चालवणारी परंपरा, समाज सुधारण्याची परंपरा, महिलांवरील अन्याय, अत्याचार , वाईट चालीरीती, अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी झगडण्याची परंपरा, स्वतःसाठी नाही तर वंचित अस्पृश्य उपेक्षितांच्या कल्याणासाठी धडपडण्याची परंपरा आणि अशीच परंपरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जगण्याला जीवनाला आहे.
ते होते म्हणून गावकुसाबाहेरील वस्त्या गावात आल्या. ते होते म्हणून माणसांना माणूसपण मिळाले. ते होते म्हणून उपेक्षितांना न्याय हक्क अधिकार मिळाले. ते होते म्हणूनच माझ्यासारखी एक महिला आज याठिकाणी स्वतःचे मत व्यक्त करू शकते. कारण स्त्रीला समान दर्जा हक्क आणि अधिकार देण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले आहे.
स्वातंत्र्य पूर्व भारतीय समाज व्यवस्था ही चातुर्वर्णात विभागली गेली होती. उच्चनीचता बोकाळली होती. जातीवरून कामाने, कामावरून उच्चनीचतेने कळस गाठलेला होता. सर्वत्र अज्ञान अंधश्रद्धा भेदभाव नांदत होता. अस्पृश्यांना तर कोणीच वाली नव्हता. त्यांचे जीवन मातीमोल केले गेले होते. त्यांच्याकडून गुराप्रमाणे काम करून घेतले जाई व त्या बदल्यात त्यांना पोटभर अन्न पाणीही मिळत नव्हते. एवढंच काय तर त्यांच्या सावलीचाही विटाळ मानला जात होता. या दलित, वंचित, गरीब अस्पृश्य समाजाला माणूस म्हणून बघितलं जावं यासाठी काही समाजसुधारक प्रयत्न करत होते परंतु या गरिबांचा खरा उद्धारकर्ता ठरले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी कशा प्रकारे त्या वेळी सनातन्यांना, राज्यकर्त्यांना, उच्चवर्णीयांना तोंड देत विरोध, त्रास, सहन करत आपले कार्य चालू ठेवले हे जाणून घेण्यासाठी आपल्याला त्यांच्या जीवन व कार्य यावर विचारविनिमय करावा लागेल.
आकाशातील ग्रहतारे जर आपले भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटाचा काय उपयोग असा विज्ञानवादी आणि वास्तववादी संदेश अवघ्या देशाला बाबासाहेबांनी दिला. शिक्षण, संघटन, विचारप्रबोधन आणि संघर्ष यांच्या सहाय्याने स्वकर्तृत्वाने बोधिसत्व, प्रज्ञासूर्य, विश्वरत्न, महामानव उपाधी ज्यांना जगानं अर्पण केल्या ते भारतरत्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर! त्यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेशातील लष्करी छावणी असलेल्या महू या गावी वडील रामजी आणि आई भिमाबाई यांच्या पोटी झाला. त्यांचे वडील ब्रिटीश लष्करात सुभेदार या पदावर नोकरीला होते. त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. त्यांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील आंबावडे हे होय. ते रामजींचे चौदावे व शेवटचे अपत्य होते. त्यापैकी त्यांच्या मोठया दोन बहिणी व दोन भाऊ हयात होते. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी त्यांची आई भिमाबाईचा मृत्यू झाला. बाळ भिमा पोरके झाले. त्यांच्यासोबत त्यांच्या भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी वडीलांवर पडली. रामजी आणि आत्या मीराबाईंनी मुलांचा सांभाळ केला. आत्या मीराबाईचा भिवावर विशेष जीव होता. त्या बाबासाहेबांचे कोडकौतुक मोठ्या आनंदाने करत असत.
“विद्येनेच आले श्रेष्ठत्व जगामाजी” या वचनांवर रामजीचा नितांत विश्वास होता. भीमराव अतिशय बुद्धिमान आहे ते रामजीबाबांच्या लक्षात आले होते त्यामुळे रामजींनी बाबासाहेबांच्या शिक्षणाकडे खूप लक्ष दिले. त्याकाळी अस्पृश्यांना, उपेक्षितांना शिक्षण घेणे अवघड होते परंतु ब्रिटिश सरकारमध्ये नोकरीला असल्यामुळे रामजी आपल्या मुलांना शिकवू शकले. पण अस्पृश्यांना शाळेत वेगळे बसवले जाई. बाबासाहेबांना शिकत असताना अस्पृश्यतेला तोंड द्यावे लागले, परंतु त्यांनी शिक्षण घेणे सोडले नाही. त्यांचे प्राथमिक शिक्षण सातारा येथे झाले. इ. स. 1907 मध्ये भीमराव मॅट्रिकची परीक्षा पास झाले त्याचबरोबर त्यांना अवांतर वाचनाची आवड निर्माण झाली. ते आपल्याला मिळत असलेले पैसे वाचवून ग्रंथ आणून वाचन करू लागले. पुढे त्यांनी पुस्तकांविषयी लिहून ठेवले आहे की “तुमच्याकडे दोन आणे असतील तर एका आण्याची भाकरी घ्या व एका आण्याचे पुस्तक घ्या, भाकरी तुम्हाला जगवेल व पुस्तक तुम्हाला कसं जगायचं ते शिकवेल.”
त्याकाळी महाराच्या मुलाने दहावीची परीक्षा पास होणे ही अघटित घटना होती म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्काराच्या अध्यक्षस्थानी सीताराम केशव बोले, तर प्रमुख अतिथी म्हणून कृष्णाजी अर्जुन केळुस्कर हे होते. मॅट्रिकनंतर त्यांचा विवाह झाला त्यावेळी त्यांचे वय 17 वर्षे होते. त्यांच्या पत्नीचे नाव रमाबाई होते. रमाइनी आयुष्यभर हालअपेष्टा सोसल्या. कधीही काहीही अपेक्षा न ठेवता बाबासाहेबांना त्यांच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन देत राहिल्या, गोवऱ्या थापून दुसऱ्यांची कामे करून मिळणारा पैसा त्यांनी बाबासाहेबांना शिक्षणासाठी दिला. म्हणतात ना यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो तसेच बाबासाहेबांच्या कारकिर्दीत रमाईचा त्याग आणि कष्टाचे, समर्पणाचे स्थान सर्वोच्च आहे. विवाहानंतर पुढील शिक्षणासाठी बाबासाहेबांनी मुंबईतल्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात १९०८ साली प्रवेश घेतला. परंतु पैशाअभावी शिक्षण परवडेना तेव्हा गुरुवर्य कृष्णाजी यांच्या मदतीने बडोदा नरेशामार्फत देण्यात येणारी शिष्यवृत्ती बाबासाहेबांना मंजूर झाली. तूर्तास शैक्षणिक खर्चाची चिंता मिटली. दरम्यान त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि कुटुंबाची जबाबदारी बाबासाहेबांवर येऊन पडली. या काळात बाबासाहेबांना रमाईनी साथ दिली आणि त्यांना शिक्षणात अडचण येऊ नये म्हणून संसाराचा गाडा स्वतःच्या खांद्यावर घेतला. प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे याप्रमाणे बाबासाहेब संकटांना कधीही घाबरले नाहीत आणि सतत प्रयत्न करत राहिले. नशीबही त्याच व्यक्तीची साथ देते जी व्यक्ती स्वतःचे नशीब स्वतः घडवण्यासाठी तत्पर असते, कारण परिस्थिती नशीब घडवत ही नाही आणि बिघडवत ही नाही तर माणूस स्वतःच स्वतःचे नशीब घडवतो किंवा बिघडवतो. आणि बाबासाहेबांनी स्वतःचे नशीब स्वतः घडवले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षण घेण्याचा प्रामाणिक प्रयत्नांनामुळे त्यांचे पुढील देशातील व परदेशातील शिक्षण हे बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड महाराजांच्या मदतीने सुरू राहिले.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रचंड बुद्धिमान होते आणि आपल्या बुद्धीच्या जोरावर त्यांनी जगातील अवघडातील उवघड शिक्षण पूर्ण केले त्यात प्रावीण्य मिळविले. बाबासाहेबांनी एखादे पुस्तक वाचले तर त्यांना नंतर कधीही त्या पुस्तकातील कोणताही उतारा कोणत्या पानावर आहे हे जशास तसे आठवत असे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी जगातील सर्व शैक्षणिक डिग्री घेतलेल्या आहेत अशी नोंद आहे आणि हे रेकॉर्ड आजपर्यंत शाबूत आहे. जेव्हा शिक्षण घेणे हेच कठीण होते त्यावेळी बाबासाहेबांनी दहावी, बारावी, बीए डबल एम ए, फिलोसोफी, अर्थशास्त्र, वकील प्राध्यापक, लिटरेचर अशा अनेक क्षेत्रांशी संबंधित शिक्षण पूर्ण केले होते. त्यांनी देश व विदेशातील निरनिराळ्या विद्यापीठांमधून ३२ पदव्या घेतल्या होत्या.
आज आपल्याला शिक्षण घेण्यासाठी सर्व सरकारी सुविधा उपलब्ध असूनसुद्धा भारत देश हा शंभर टक्के साक्षर होऊ शकला नाही नव्हे तर आजही कित्येक वाड्या-वस्त्या पाड्यावर शिक्षणाची सोय नाही. मुळात देशाच्या जीडीपीत शिक्षणासाठी होणारी तरतूद अत्यल्प आहे आणि हे डॉक्टर बाबासाहेबांच्या भारत देशाला शोभनीय नाही. किमान आज प्रत्येकाला पोटापाण्याला लावेल एवढे शिक्षण प्रत्येकाने घेतले पाहिजे आणि त्यासाठी पाठ्यपुस्तकीय शिक्षणासह आपल्याकडे व्यवसाय शिक्षणामध्ये अधिक वाढ झाली पाहिजे. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाने एक सर्वेक्षण केले होते आणि त्या सर्वेक्षणात कोलंबिया विद्यापीठाच्या स्थापनेपासून आजपर्यंत या विद्यापीठाचा सर्वात हुशार विद्यार्थी कोण आहे याचा तपास केला, तर त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या विद्यापीठाचे सर्वात बुद्धिमान विद्यार्थी होते हे लक्षात आले. तेव्हा त्यांनी बाबासाहेबाचा “The symbol of knowledge “असा बहुमान केला. कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टर आंबेडकरांचा केलेला बहुमान सर्व भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.
आज आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सामाजिक समता व न्याय दिन म्हणून साजरी करतो कारण बाबासाहेबांनी अस्पृश्यता सामाजिक विषमता मिटविण्यासाठी आयुष्यभर लढा दिला. महिलांना उपेक्षितांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न केले ते करत असताना त्यांना व्यवस्थेविरोधात अनेक बंड करावे लागले. आपण जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाचे नागरिक आहोत आपण सर्वप्रथम भारतीय आहोत आणि त्यानंतर आपण आपला धर्म, प्रांत, जात, भाषा या मध्ये विभागले गेलो आहोत. भारताची भौगोलिक रचनाच वैविध्यपूर्ण आहे. त्यामुळे प्रांतानुसार प्रत्येकाचे खाणपान, वेषभुषा, बोलीभाषा सणउत्सव वेगवेगळे आहेत. या विविधतेने नटलेल्या भारताला एकसंघ बांधण्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वधर्मसमभाव सार्वभौमत्व जपणारे, भारतीय हाच धर्म निभावला गेला पाहिजे हे सांगणारे संविधान लिहिले . त्यासाठी त्यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागली अभ्यास करावा लागला. बाबासाहेब म्हणतात मी प्रथमतः व अंततः भारतीय आहे. त्यामुळे आज आपण म्हणतो की भारत देश कोणत्याही धर्म ग्रंथावर चालत नसून संविधानाप्रमाणे चालतो. संविधान लिहिताना बाबासाहेबाना आपल्या देशातील सामाजिक स्थितीची जाणीव लहानपणापासून झालेली होती, अनुभवाने त्यांना खूप मोठी व्यक्ती बनवलेले होतं, वाचनाने त्यांच्या बुद्धीच्या, विचाराच्या कक्षा रुंदावलेल्या होत्या त्यामुळे त्यांनी संविधानात सर्व घटकांना समान न्याय कसा दिला जाईल याचा विचार केला आणि त्यानुसार संविधान बनवलं.
भगवान गौतम बुद्धांचा मानवता धर्म, शिवरायांचं स्वराज्य, महात्मा फुलेंची समता न्याय बंधुता ही तत्वे आणि शाहू महाराजांची परोपकारी वृत्ती डॉक्टर आंबेडकर यांच्या कार्यात आणि जीवनात पदोपदी आढळून येतात. मग आज आपण कुठल्या आधारावर महापुरुष शिवफुलेशाहूआंबेडकर यांना जातीपातीत विभागत आहेत हा प्रश्न निर्माण होतो. आज खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राला शिव, फुले, शाहू आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचा असेल तर आधी या महापुरुषांना जातमुक्त करावे लागेल, राजकारणमुक्त करावे लागेल. या महापुरुषांच्या नावाने आपापल्या राजकीय पोळी भाजून घेण्याचा जो काही प्रयत्न आज राजकीय मंडळी करताना दिसत आहेत ते अतिशय चुकीचं आहे.. वरील सर्व महापुरुषासाठी पुढील ओळी:
मोडलेल्या माणसांची दुःख ओली झेलताना
त्या वंचितांच्या उशाला दीप लावू झोपताना
कोणती ना जात ज्यांची कोणता ना धर्म त्यांचा
दुःख भिजले दोन अश्रू माणसाची माणसाने.
महाराज सयाजीराव गायकवाड यांनी बाबासाहेबाना परदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती बहाल केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर १९१३ मध्ये उच्च शिक्षणाकरिता न्यूयार्क ला रवाना झाले. त्यापूर्वी १९१२ मध्ये त्यांनी मुंबई विश्वविद्यालयातून अर्थशास्त्र आणि राजनीती, विज्ञान या विषयातील पदवी प्राप्त केली होती. अमेरिकेत आल्यानंतर १९१५साली बाबासाहेबांनी कोलंबिया विश्वविद्यालयातून समाजशास्त्र, इतिहास, दर्शन शास्त्र, मानव विज्ञान यासोबत अर्थशास्त्रात एम ए ची मास्टर डिग्री प्राप्त केली. त्यानंतर १९१६ मध्ये प्राचीन भारताचे वाणिज्य यावर संशोधन केले या विषयात पीएचडी प्राप्त केली. फेलोशिप संपल्यानंतर भारतात परतताना स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिकल सायन्स एम एस सीआणि डी एस सी व विधी संस्थानात लॉ करीता रजिस्ट्रेशन केले.
उच्चविद्याविभूषित होऊन भारतात परतल्यानंतर बाबासाहेबांनी बडोद्याला बडोदा सरकारमध्ये नोकरी करायला सुरुवात केली. ही नोकरी करत असताना त्यांना अस्पृश्यतेचा खूप त्रास झाला. त्यामुळे ही नोकरी बाबासाहेब करू शकले नाही नोकरी सोडून ते मुंबईला परतले आणि मुंबईतील सिडेनहम कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून नोकरी करू लागले. आपले म्हणणे समाजा पर्यंत पोहोचवायचे असेल तर त्या वेळी वृत्तपत्र मोठी भूमिका निभावत म्हणून डॉक्टर बाबासाहेबांनी ३१ जानेवारी १९२० रोजी मूकनायक हे पाक्षिक सुरू केले, यामध्ये मुख्य उद्देश दलित गरीब शोषित लोकांच्या समस्या सरकारपर्यंत, समाजापर्यंत पोहचवणे हा होता. मूकनायक अडचणीत असताना स्वतः राजश्री छत्रपती शाहू महाराजानी बाबासाहेबांना आर्थिक मदत केली. तसेच माणगाव येथे भरवण्यात आलेल्या अस्पृश्य परिषदेच्या अध्यक्षपदी बाबासाहेबांना बोलावलं आणि त्यावेळी राजश्री शाहू महाराजांनी आपल्या भाषणात घोषीतच केले की, “अस्पृश्यांना त्यांचा नेता गवसला आहे आणि आता अस्पृश्यांच्या उद्धाराची चळवळ सर्व भारतात प्रखर झाल्याशिवाय राहणार नाही. ”
मूकनायक चालू असताना त्याची जबाबदारी आपल्या सहकाऱ्यांवर सोपवून बाबासाहेब ५ जुलै १९३० रोजी आपल्या पुढील शिक्षणासाठी लंडनला रवाना झाले. पुढे मूकनायक नंतर बाबासाहेबांनी बहिष्कृत भारत, जनता वृत्तपत्र काढले चालवले. लंडन मध्ये १९२१ ला बाबासाहेबांनी स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स मधून मास्टर डिग्री प्राप्त केली. दोन वर्षात डी एस सी पदवीदेखील मिळवली. १९२२मध्ये बॅरिस्टरची परीक्षा उत्तीर्ण केली आणि १९२३ ला त्यांना डॉक्टर ऑफ सायन्स अशी डॉक्टरेट बहाल झाली.
सामाजिक दृष्ट्या अस्पृश्यांना चेतना देण्यासह आपलं शिक्षण पूर्ण करत बाबासाहेबांनी पुढे स्वतःला अस्पृश्योद्धार आणि राजकारणात झोकून दिले त्यांनी प्रत्येक क्षेत्राविषयी अभ्यासपूर्ण आणि मुळापासून बदल घडवण्याच्या दृष्टीने पावले उचलली आज आपल्याला बाबासाहेब केवळ अस्पृश्यांची कैवारी कोणी म्हणत असेल तर साफ चूक आहे बाबासाहेबांनी समाजाच्या प्रत्येक मूलभूत गरजा विषयी जागरुक होऊन धोरणात्मक बदल घडवण्यात समाजसेवा आणि देशसेवा जपली आहे. हे सगळं करत असताना त्यांना कौटुंबिक जीवनात दुःखाचे डोंगर पचवावे लागले, आपल्या अपत्यांचे निधन, चळवळ अतिशय धार धरत असताना रमाईंचे निधन अशा दुःखद घटनांना त्यांना सामोरे जावे लागले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक चळवळीला कलाटणी देणाऱ्या घटना म्हणजे १९२७ ते १९३० दरम्यान महाड चवदार तळे सत्याग्रह, मनुस्मृती दहन, काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह इत्यादी. १९२६ मध्ये सार्वजनिक ठिकाणी स्पृश्य-अस्पृश्य भेदभाव केला जाऊ नये, जसं न्यायालय, शाळा, पाणवठे, बाजार इत्यादी ठिकाणी असा ठराव श्री सी के बोले यांनी कायदेमंडळात मांडला व तो मंजूरही झाला. हा ठराव मंजूर केला होता परंतु प्रत्यक्ष अंमलबजावणी केली गेली नव्हती आणि अस्पृश्य स्वतः जाऊन पाणी भरतील एवढी हिंमत त्यांच्यामध्ये नव्हती. कारण सवर्णांची दहशत मोठी होती, परंतु आंबेडकरांनी लोकांना एकत्र केले आणि सामाजिक समतेच्या पहिल्या लढ्यातील सामुदायिक कृतीला सुरुवात झाली. आपल्या हजारो अस्पृश्य बंधू-भगिनी सह चवदार तळ्याच्या पायऱ्या उतरुन २० मार्च १९२७ रोजी डॉक्टर बाबासाहेबांनी चवदार तळ्याचे पाणी प्राशन केले, अशा प्रकारे सगळ्यात आधी पाण्याची जात पूसून काढावी लागली, अस्पृश्यांचा मुक्ति मार्गाला वाट मिळाली, हा लढा पुढे कोर्टात लढला गेला आणी चवदार तळे अस्पृश्यांसाठी खुले झाले. यावरून आजच्या परिस्थितीविषयी डोळसपणे आपण विचार केला तर जसं पूर्वी सवर्ण, ब्राह्मण उच्चवर्णीय आपल्याच मातीत आपल्या लोकांना वाईट वागणूक देत होते छळत होते त्यामुळे सामाजिक विषमता प्रचंड वाढली होती, आज समाजजीवनात जातिभेदभाव कमी झाला आहे, सामाजिक परिस्थिती बदलली आहे. परंतु राजकारण मात्र आज सर्वसमावेशक उरले नाही. आपण लोकशाही मार्गाने लोकप्रतिनिधींना आपल्या समस्या सोडवण्यासाठी राज्य, केंद्र सरकार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून निवडून देतो. पण तरीही आपल्या जनतेच्या, शेतकऱ्यांच्या, बेरोजगारांच्या, महिलांच्या समस्या संपत नाहीत त्यासाठी आपल्याला आप आपल्या मागण्या नुसार संघटना ऊभा करून रस्त्यावर यावे लागते. आंदोलन, मोर्चे, उपोषण, पायी दिंडी काढावी लागते पण निगरगट्ट राज्यकर्ते आपल्या न्याय मागण्या मान्य करताना दिसत नाहीत तेव्हा आजच्या राज्यकर्त्यांत आणि इंग्रज, व उच्चवार्नियात काय फरक आहे हा प्रश्न माझ्या सद्सद्विवेकबुद्धीला पडतो. अर्थात संविधानाने दिलेल्या अधिकारांमुळे आपण आपला आवाज आक्रमकतेने उठवू शकतो. पण हल्ली आवाज दाबण्याचे कामं रीतसर पणे पार पाडले जातात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाच्या प्रत्येक समस्येवर चिंतन मनन केलेलं आहे, आणि त्या प्रत्येक समस्येवर उपाय देखील सुचवलेले आहेत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे वास्तववादी, दृष्टे, धोरणात्मक सुधारणावादी समाजसुधारक आहेत. त्यांनी आपल्या जीवनात निर्णयात्मक कृतीला वाव दिला.
अस्पृश्यांचे हाल, मजूर शेतकरी वर्गाची पिळवणूक पाहून बाबासाहेब अस्वस्थ होत यातूनच त्यांच्या सामाजिक आणि राजकीय पर्वाला सुरुवात झाली:
१: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी १९१८ झाली शेतकऱ्यांच्या व्यथा मांडत “शेतीचे छोटे तुकडे समस्या आणि त्याचे उपाय “हा शोध निबंध लिहिला. यातून अल्पभूधारक शेतकऱ्यांविषयी चिंता दिसून येते. शेतीसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी आणि वीज याशिवाय शेती करणे अशक्य, कृषी विकासासाठी पाणी पुरवठा व्हावा म्हणून नद्या जोडून पाणी साठा प्रकल्प उभा करण्याचा संकल्प केला तसंच पहिल्यांदा पॉवर ग्रीड ही संकल्पना त्यांनी मांडली. १७ सप्टेंबर १९३७ रोजी खोती अंताचे विधेयक मुंबई कायदेमंडळात मांडले. भूधारणा पद्धत संपुष्टात आणण्यासाठी याचा फायदा झाला.
२: १९२४ ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारणी सभा, या संस्थेची स्थापना केली आणि त्यातून अस्पृश्यांमध्ये चेतना व जागृती निर्माण करण्याचे काम हाती घेतले.
३: १९३० साली लंडन ला गोलमेज परिषदेसाठी बाबासाहेब आंबेडकर यांना अस्पृश्याचे प्रतिनिधी म्हणून आमंत्रित केले अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदार संघ, त्यांच्या सामाजिक व राजकीय हक्कांवर बाबासाहेबांनी आवाज उठवला. ब्रिटिश सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या होत्या, महात्मा गांधीजीना त्यांची स्वतंत्र मतदार संघाची मागणी मान्य नव्हती पुनर्विचार विषयी आंबेडकर ऐकत नाहीत हे पाहून गांधीजींनी येरवडा जेलमध्ये उपोषण सुरू केले हा सर्व घटनाक्रम गोलमेज परिषद एक दोन तीन दरम्यान चालू होता. गांधीजींच्या हट्टापुढे बाबासाहेबांना मूळ मागणीची तडजोड करावी लागली त्यातूनच पुणे करार घडला. अस्पृश्यांना राखीव जागा या संयुक्त मतदारसंघातूनच देण्यात येतील, कायदेमंडळातील जागांमध्ये वाढ करण्यात आली. हा करार ब्रिटिश सरकारने मंजूर केला या करारावर महात्मा गांधीजी आणि आंबेडकर यांची सही आहे.
४: स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना… ऑगस्ट १९३६ मध्ये आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्ष हा राजकीय दृष्ट्या नवा पक्ष स्थापन केला. या पक्षाच्या जाहीरनाम्यात त्यांनी भूमिहीन, गरीब, शेतकरी, कामगार, यांच्या गरजा आणि समस्या मांडल्या. शेतकऱ्यांना तांत्रिक शिक्षण देण्यासाठी तरतूद केली जाईल त्यासाठी कार्यक्रम हाती घेतला जाईल,कामगारांना नोकऱ्या देणे, बडतर्फ करणे, बढती देणे,कामाच्या तासाची मर्यादा, वेतन श्रेणी, भर पगारी रजा, कामगारांचे आरोग्य अशा अनेक सुधारणा या जाहीरनाम्यात होत्या तत्कालीन राजकीय पक्षात असा विस्तृत आणि समाजाभिमुख जाहीरनामा क्वचितच होता. या जाहीरनाम्यावर मत देताना एका इंग्रजी दैनिकाने म्हटले, जरी आमचे मत राजकीय पक्षांच्या संख्येत वाढ होऊ नये असे असले तरी आंबेडकरांनी स्थापन केलेला नवा पक्ष या प्रांतातील जीवन समृद्ध करण्याच्या दृष्टीने आणि देशाच्या भवितव्याला वळण लावण्याच्या कामी अत्यंत उपयोगी पडेल. अशा पक्षाला वाव आहे आणि आवश्यकताही आहे यावरून आंबेडकरांची नैतिकता ध्येयवाद आणि सामाजिक सुधारणेची तळमळ ही वैशिष्ट्ये लक्षात येतात. ब्रिटिश संसदेने १९३५ साली भारतासाठी पारित केलेल्या कायद्याने भारतीयांना विधीमंडळावर मोठ्या प्रमाणात प्रतिनिधित्व देण्याचे मान्य केले ही जमेची बाजू होती यामुळे या पक्षाला संधी निर्माण झाली परिणामी पक्षाने निवडणुकीत सहभाग घेतला व घवघवीत यश मिळवले. १९४२ मध्ये व्हॉईसराय मंत्रिमंडळात मजूर मंत्री म्हणून बाबासाहेबानी काम केले त्यामुळे कामगारांच्या हिताचे कायदे, विचार मांडले, कायदे केले जाहीरनाम्याला कृतीत आणले, खाणकामगार महिलांसाठी अनेक सोयी सुविधा दिल्या गेल्या गर्भवती महिलेला खाणीत काम न देता दुसरे काम द्यावे, प्रसूती काळात सुट्टी व आर्थिक मदत केली जावी, त्यांचे कष्ट कमी व्हावेत यादृष्टीने निर्णय घेतले.
५:शैक्षणिक कार्य…. आपल्याला मिळालेल्या प्रत्येक संधीचा फायदा घेऊन बाबासाहेबांनी शिक्षण घेतले. अस्पृश्यांना शिक्षणाचे खरी गरज आहे, शिक्षणाने माणूस विचार करू लागतो आणि विचार केल्यामुळे त्याला चांगले वाईट कळेल असे त्यांना वाटते. बाबासाहेब म्हणतात, ” शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि तो पिणारा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही” म्हणजेच शिक्षणामुळे माणूस अन्यायाविरुद्ध नक्कीच आवाज उठवू शकतो. अस्पृश्यांनी, वंचितांनी, गरिबांनी शिकावं, नीटनेटकं राहावं यासाठी बाबासाहेब स्वतः लोकांना समज देत. बाबासाहेबांनी प्रथम दलित शिक्षण संस्था व नंतर पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली व त्या अंतर्गत अनेक वस्तीगृह, कॉलेज काढून अस्पृश्यांना शैक्षणिक दृष्ट्या प्रवाहात आणले. त्यांनी आपले शैक्षणिक धोरण जाहीर करताना स्पष्ट केले की, या संस्थेचे कार्य केवळ शिक्षण प्रसार नसून प्रत्येकाचा बौद्धिक मानसिक आणि सामाजिक विकास होईल याचे भान देणारे, मनोधैर्य वाढवणारे कार्य असेल. कारण असे म्हटले आहे की. स्वदेशी पूज्येते राजा, विद्वान सर्वत्र पुज्य ते! १४जून १९२८ रोजी दलित शिक्षण संस्थेअंतर्गत दलित विद्यार्थ्यासाठी मुंबई सरकार तसेच काही दात्यांच्या मदतीने पाच वसतिगृह चालू केले. पुढे ८ जुलै १९४६ मध्ये मुंबईला सिद्धार्थ कला व विज्ञान महाविद्यालय, १९५०मध्ये औरंगाबादला मिलिंद महाविद्यालय, १९५३साली मुंबईत सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय तर सन १९५६मध्ये विधी महाविद्यालय पीपल्स एजुकेशन सोसायटी अंतर्गत सर्वासाठी चालू केले.
बाबासाहेब सतत तळपणारा सूर्य होते. त्यांनी कित्येक रात्रीसुद्धा विश्रांती घेतली नाही. ते म्हणत माझा समाज वर्षानुवर्षे झोपलेला आहे आणि त्याला उठवण्यासाठी मला जागाव लागेल काम करावे लागेल. अविरत कष्ट आणि नैतिक सामाजिक जिम्मेदारी निभावणारे भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सदैव वंदनीय पूजनीय आहे.
भारत देश स्वतंत्रते कडे वाटचाल करत होता , देशाच्या घटना निर्मितीच्या कामाने वेग धरला होता, खरंतर १९३५ सालीच देशाचं कच्चा संविधान रचण्यास सुरुवात झाली होती, अनेक स्तरावर अनेक समित्या काम करत होत्या, १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देश स्वतंत्र झाला आणि २८ ऑगस्ट १९४७ रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली घटना समिती तयार करण्यात आली या समितीने १४ नोव्हेंबर १९४७ रोजी घटनेचा पहिला मसुदा सादर केला. समितीने दोन वर्षे ११ महिने १८ दिवस अनेक सत्रांमध्ये चर्चा करून सुधार करून बदल करून घटना तयार केली. हे सत्र जनतेसाठी खुले होते आणि २६ नोव्हेंबर १९४९ ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधान देशाला सुपूर्द केलं. २६ जानेवारी १९५० रोजी भारतात संविधानाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली, लोकशाही मार्गाने आपल्या देशाचे कामकाज सुरू झाले भारताचा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कारभार स्वतंत्रपणे चालू लागला या साठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद इत्यादी मंडळीनी मेहनत घेतली.
संविधाननिर्मिती म्हणजे डॉ. बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारताचे चित्रंच जणू कारण स्वातंत्र्य, न्याय, समता, बंधुता या पायावर अखंड धर्मनिरपेक्ष, सार्वभौम राष्ट्र संविधान दर्शविते. संविधानाने व्यक्ती स्वातंत्र्य, मूलभूत हक्क, शिक्षण घेण्याची सक्ती, मतदान अधिकार, शेवटच्या माणसाला जगण्याचा अधिकार, न्याय मागण्याचा आवाज दिला. देशाला सविधान अर्पण केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात यापुढे राजा राणीच्या पोटी जन्म घेणार नाहीतर मतदाराच्या पेटीतून जन्म घेणार आहे. त्यामुळे आज खरच या वचनावर पुनश्च एकदा विचार होण्याची गरज आहे आणि आपला मतदानाचा अधिकार आपण स्वतंत्र विचाराने वापरणं गरजेचं आहे.
स्वतंत्र भारताचे कायदेमंत्री असताना स्त्रियांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य, स्वाभिमान, सन्मान देणारे हिंदू कोड बिल डॉ. बाबासाहेबानी संसदेत मांडले होते. परंतु या बिलाला सर्वांनी विरोध केला व नामंजूर केले होते. त्यावेळी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देणारे डॉ. बाबासाहेब खरोखरीच भारतरत्न शोभतात. पुढे अनेक वर्षांनी हिंदू कोड बिल लागू झाले. संविधानातील काही महत्वाची कलमं जी आज सर्वांनाच माहित असणे आवश्यक आहे, तसंच हिंदू कोड बिलाविषयी विस्तृत लिखाणाचा संकल्प करून आज इथेच थांबते.
सर्वांना माझा क्रांतिकारी जयभीम!
(अर्चना सानप या शिक्षण क्षेत्रात आहेत. सामाजिक विषयांवर त्या सजगतेनं समाजमाध्यमांमध्ये अभिव्यक्त होत असतात.) ट्विटर: @Archanagsanap2