मुक्तपीठ टीम
भगवान हनुमानाच्या जन्मभूमीवरून आता एक नवा वाद पेटू लागला आहे. कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांचा दावा आहे की हनुमानाचं जन्मस्थान त्यांचेच राज्य आहे. कर्नाटकातल्या शिवमोगाचे मठ प्रमुख दावा करु लागलेत की हनुमानाचा जन्म उत्तर कन्नड जिल्ह्यातील गोकर्ण येथे झाला होता. यापूर्वी कर्नाटकातूनच असाही दावा केला जात होता की हनुमानाचा जन्म किशकिंदाच्या अंजनाद्री टेकडीवर झाला होता. आंध्र प्रदेशात तर पूर्वापार मानले जाते की भगवान हनुमानाची जन्मभूमी तिरुपतीच्या सात टेकड्यांपैकी एका टेकडीवर आहे. त्याला अंजनाद्री देखील म्हणतात.
शिवमोगा मधील रामचंद्रपुरा मठाचे प्रमुख राघवेश्वर भारती रामायणचे उदाहरण देत म्हणाले की,भगवान हनुमानाने सीतेला सांगितले होते की, त्यांचा जन्म समुद्रकिनारी गोकर्ण येथे झाला होता. ते म्हणाले, “रामायणातील पुराव्यांच्या आधारे आपण असे म्हणू शकतो की गोकर्ण हनुमानाची जन्मभूमी आहे आणि किशकिंदामधील अंजनाद्री ही त्यांची कर्मभूमी होती.
तिरुमाला तिरुपती देवस्थानम्स (टीटीडी) ने बनविलेल्या तज्ज्ञ समितीने २१ एप्रिल रोजी या विषयावर आपला अहवाल सादर करणे अपेक्षित आहे. या पॅनेलमध्ये वैदिक विद्वान, पुरातत्वशास्त्रज्ञ आणि इस्रो वैज्ञानिक आहेत. टीटीडी ट्रस्ट बोर्डाचे कार्यकारी अधिकारी के. एस. जवाहर रेड्डी म्हणाले की, “तिरुपती येथे अंजनाद्री सिद्ध करण्यासाठी आमच्याकडे पौराणिक व पुरातत्व पुरावे आहेत.”
कर्नाटकाने किशकिंदाच्या अंजनाद्रीला हनुमानाचे जन्मस्थान म्हणून घोषित करण्याची प्रक्रिया सुरू केला आहे. हंपीला लागून असलेल्या किशकिंदाच्या डोंगरांचा उल्लेख रामायणात आहे ज्या ठिकाणी राम आणि लक्ष्मण हनुमानास भेटले होते, असे सांगितले जाते.