तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट
सध्या सगळीकडेच कोरोना….कोरोना….कोरोना सुरु आहे. स्वाभाविकच राजकीय नेतेही मधल्या काही चुका टाळून किमान सार्वजनिक वावरताना काळजी घेत असल्याचे दाखवत तरी आहेत. खरंतर अनेक राजकारणी, सेलिब्रिटी यांनाही कोरोनाने गाठल्यानंतर प्रत्येकानेच किमान नाही तर कमाल काळजी प्रत्यक्षात घेणे आवश्यक आहे. फक्त दाखवण्यासाठी नसावे.
तुम्ही नेते असाल अभिनेते असाल, अगदी पत्रकारही असाल. तुम्ही लोकांसाठी रोड मॉडल असता. लोक तुम्हाला तुमच्या चुकांसह फॉलो करू शकतात.
आज एका राजकीय व्यक्तीचे लाइव्ह पाहिले.
त्यांना कल्पना नसावी. लाइव्ह फ्रेममध्ये आहेत.
१-मास्क खाली होता
२-हातात रुमाल, त्यासह एका चॅनलचा बूम उचलला
३-बोलण्यास सुरुवात करण्यापूर्वी मास्क वर गेला!
४. बोलतानाच बूमला स्पर्श केलेल्या रुमालानेच नाक पुसले!
जर त्या बुमला एखाद्या बाधिताचा स्पर्श झाला असेल तर ते त्या रुमालाने, हाताने मास्कखालील नाकापर्यंत पोहचणे खरेच अशक्य असेल? का धोका पत्करायचा? लस घेतली असेल. अगदी दोन्ही डोस तरी धोका १००% टळला असे नाही.
बोलताना मास्क त्रासदायक वाटतो. एक करता येईल. पत्रकार तुम्ही, तुमच्यासोबतची लोक यांच्यात आवश्यक ते सुरक्षा अंतर ठेवा आणि मग बोला. अनेक नेते, वक्ते, पत्रकार तेवढे अंतर राखून मास्क काढून बोलतात. ते एकवेळ चालेल. तसे करावे लागत असेल. मात्र, गर्दीत असताना मास्क काढूच नये. ठराविक व्यक्तींसोबत, सुरक्षित अंतर राखत चालून जाईल. पण गर्दीत नाहीच नाही.
पत्रकार परिषदांची गरज आहे?
खरंतर पत्रकार परिषदांची गर्दी जमवण्याची सध्याच्या डिजिटल काळात गरज आहे का? त्यापेक्षा कोरोना पहिल्या लाटेच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत होते तसे सर्व राजकीय नेत्यांना, प्रशासकीय नेत्यांना करता येणार नाही का? यूट्युब, फेसबूक, ट्विटर या माध्यमातून लाइव्ह द्या. कोणालाही, कुठूनही, कधीही उपयोगात आणता येईल. डाऊनलोडही करता येईल.
तसे सहज शक्य आहे. प्रश्न पडेल प्रश्नांचं काय करायचं. लाइव्हसाठी कोणतेही अॅप वापरले तरी सगळीकडे मॅसेजिंगची सोय आहे. त्यामुळे प्रश्नही घेता येतील. किंवा आधीही मागवता येतील.
पत्रकार, त्यांचे कॅमेरे, त्यांचे बूम गावभर भटकून येतात. राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारीही. हे सर्व एकत्र येणे. एकमेकांनी वापरलेल्या वस्तूंना अजाणेतपणीही स्पर्श होणे हे धोका वाढवणारेच आहे. सर्वांसाठीच. त्यामुळे पत्रकार परिषदा टाळता येणे आवश्यक आहे. काहीच नुकसान होणार नाही.
प्रश्न विझुअल्सचा. त्यासाठी राजकीय नेत्यांनी त्यांच्या भेटीच्या वेळी सोबतच्या स्वीय सहाय्यक म्हणजेच पीएना मोबाइल आडवा धरून व्हिडीओ रेकॉर्ड करण्यास सांगावे. ते यूट्युबवर अपलोड करा किंवा व्हॉट्सअॅप, टेलीग्रामने पाठवा.
माध्यमांनीही कव्हरेजचा वेळीच निर्णय घ्यावा
राजकीय नेते, प्रशासकीय नेते यांच्याकडून अपेक्षा बाळगताना माध्यमांकडूनही अपेक्षा आहेत. सध्याच्या तंत्रज्ञानाला योग्य प्रकारे उपयोगात आणले तर किमान मनुष्यबळात काम करणे अवघड नाही. पहिल्या लाटेत त्याची चाचपणी झाली आहे. त्यातही किमान रिपोर्टर्सना धोक्यात घालणे थांबवले पाहिजे. रिपोर्टरचा एकट्याचा वॉकथ्रू, लाइव्ह हरकत नाही. पण गर्दीतील चौपालचा हट्ट कशासाठी? किमान पुढचे काही दिवस त्याचा अट्टाहास थांबवता येणार नाही का? सध्या मोबाइलवर सर्व शक्य आहे. सर्व मिळू शकते. चालू शकते. त्यासाठी रिपोर्टरला धोक्यात ढकलणे आवश्यक नाही. प्रत्येक संस्थेत काही अतिउत्साही रिपोर्टर असतात. ते फिल्डवर गर्दीत दिसले की इतरांनाही पळावे लागते. त्यामुळे त्या-त्या संस्थेच्या वरिष्ठांनी अशा अतिउत्साहींना आवरावे.
जाता जाता –
कोरोना सुरक्षा नियम कायद्यासाठी नाही तर आपल्या सर्वांच्या फायद्यासाठी पाळा. कॅमेरा सुरु आहे. तुम्ही लाइव्ह फ्रेममध्ये आहात नाही आहात. ते पाहून तुम्ही दाखवण्यासाठी सुरक्षा नियम पाळण्याचे ठरवत असाल, तर कदाचित लोकांना कळणार नाही. पण कोरोनाचा विषाणू ग्रासताना तुम्ही लाइव्ह आहात, नाही आहात ते पाहून ग्रासणार नाही. मास्क खाली, विषाणू वर, एवढं सोपं. त्यामुळे दाखवण्यासाठी नाही, तर खरोखरच कोरोना टाळण्यासाठी सुरक्षा नियम पाळाच पाळा.
तुळशीदास भोईटे – संपर्क 9833794961 ट्विटर @TulsidasBhoite