मुक्तपीठ टीम
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी राज्यातील घडामोडींमुळे खूप वैतागलेले दिसत आहेत.
उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथे एका कार्यक्रमासाठी गेले असताना त्यांना पत्रकारांनी राज्यातील घटनाक्रमाबद्दल विचारल्यावर ते चिडले. त्यांनी माइक ढकलत सांगितले, राज्यपाल पद सोडेन तेव्हा खूप काही बोलेन! उत्तर भारतातील माध्यमांमध्ये याबद्दल बातम्या आल्या आहेत.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे दिल्लीहून हेलिकॉप्टरने मुझफ्फरनगरमधील खतौली येथे पोहोचले होते. जिथे ते कुंदकुंद जैन डिग्री कॉलेजमध्ये आयोजित कार्यक्रमासाठी गेले होते. येथे कोरोना योद्ध्यांसमवेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तेथेच त्यांनी पदवी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटनही केले.
पत्रकारांवर चिडले!
सध्या राजकीय घडामोडी घडत असलेल्या महाराष्ट्राचे राज्यपाल येणार असल्याने पत्रकारांनी गर्दी केली होती. पत्रकारांनी त्यांना गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधातील मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोपांबद्दल प्रश्न विचारला तर ते पत्रकारांवरच चिडले. पत्रकारांचा बूम आयडी माईक हाताने ढकलून त्यांनी सांगितले की, “राज्यपाल हे पद सोडेन तेव्हा तुमच्यामध्ये येऊन मी बरेच काही बोलेन”. यानंतर, ते गप्प बसले. राज्यपाल कोश्यारी यांचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.