एचपी गॅसची एजन्सी मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणुक करणाऱ्या एका टोळीचा सायबर सेल पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यात पोलिसांनी एका महिलेसह सहाजणांना अटक केली आहे. अटकेनंतर या सर्वांना स्थानिक महानगर दंडाधिकारी न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीने एचपी कंपनीची एक बोगस वेबसाईट बनविली होती, या वेबसाईटची जाहिरात वाचून सुमारे दहा हजाराहून अधिक लोकांनी एजन्सी मिळविण्यासाठी अर्ज केला होता, रजिस्ट्रसह इतर खर्च म्हणून आरोपींच्या खात्यात दहा कोटी रुपये दिल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.
या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष शोधमोहीम सुरु केली आहे. यातील तक्रारदार गोरेगाव परिसरात राहत असून ते मूळचे बिहारचे रहिवाशी आहेत. गेल्या महिन्यांत ते मोबाईलवर सर्चिंग करीत होते. यावेळी त्यांना सोशल मिडीयावर गॅस एजन्सीची एक जाहिरात दिसली होती. त्या पेजवर आलेली लिंक उघडल्यानंतर त्यात एक क्रमांक दिला होता. त्यानंतर त्यांनी संबंधित व्यक्तीला फोन केला असूनस त्या व्यक्तीने या लिंकवरील माहिती भरण्यास सांगून गॅस एजन्सीसाठी अर्ज करा असा सल्ला दिला होता. त्या व्यक्तीच्या सल्ल्याने त्यांनी सविस्तर माहितीसह तो अर्ज भरुन पाठविला होता. यावेळी या व्यक्तीने गॅस एजन्सी केंद्र सरकारकडून त्यांना तीस लाख रुपयांचे अनुदान मिळेल असे सांगितले होते. रजिस्ट्ररसह इतर कामासाठी त्यांच्याकडून ३ लाख ६६ हजार ६०० रुपये घेण्यात आले. ही रक्कम जमा होताच त्यांना कंपनीचे एक लेटर प्राप्त झाले होते. लेटर आल्यानंतर त्यांनी ती एजन्सी खरी आहे का याची शहानिशा सुरु केली होती.
वांद्रे येथे गेल्यानंतर त्यांना तिथे कुठलेही कार्यालय नसल्याचे तसेच त्यांच्याकडे असलेले लेटर बोगस असल्याचे दिसून आले होते. आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध ४१९, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ३४ भादवी सहकलम ६६ क, ६६ ड माहिती तंत्रज्ञान कायदा कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच सायबर सेल पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती.
प्राथमिक तपासात या वेबसाईटवरुन देशभरातील सर्वसामान्य लोकांना गॅस एजन्सी देण्याचे आमिष दाखवून त्यांची मोठ्या प्रमाणात फसवणुक झाल्याचे उघडकीस आले होते. बिहार आणि कोलकाता येथून ही फसवणुक होत होती, त्यामुळे सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, अतिरिक्त पोलीस आयुक्त विरेश प्रभू, पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर, सहाय्यक पोलीस आयुक्क्त नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक एस. एस सहस्त्रबुद्धे, पोलीस निरीक्षक प्रमोद खोपीकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी नाळे, अमीत उत्तेकर, पोलीस उपनिरीक्षक गणेश शिर्के, राहुल खेत्रे, महिला उपनिरीक्षक मधुबाला लावंड, पोलीस हवालदार अरविंद म्हामुनकर, पोलीस नाईक अनंत मोरे, पोलीस शिपाई अभिजीत देसाई, मयुर थोरात, अतुल पांडे, अनिल वारे, विकास डिघे, विकास केंजळे, महिला पोलीस नाईक मनिषा कोकीतकर यांचे चार विशेष पथक तयार करण्यात आले, त्यातील दोन पथकाला बिहारला तर प्रत्येकी एक पथकाला कोलकाता आणि रत्नागिरी येथे पाठविण्यात आले होते. या चारही पथकाने रविशंकर भगवान रविदास आणि डॉली देवानंद शर्मा या दोघांना बिहार तर इतर चौघांना वेगवेळ्या परिसरातून अटक केली. तपासात त्यांनी बोगस वेबसाईट बनविण्यासाठी दोन अभियंतांची मदत घेतली होती, ते दोघेही कोलकाताच्या दुर्गापूरचे रहिवाशी आहेत. या वेबसाईटवर नोंदणी केल्यानंतर त्यांना मेलद्वारे बोगस एजन्सी मिळाल्याचे लेटर पाठविले जात होते. त्यांच्याशी व्हॉटअप चॅट करुन विविध आमिष दाखवून पैसे जमा करण्यास प्रवृत्त केले जात होते. अशा प्रकारे या आरोपींनी दोन वेबसाईटद्वारे देशभरातील १० हजार ५३१ नागरिकांची दहा कोटी तेरा लाख रुपयांची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. उर्वरित १२३ वेबसाईटमधील फसवणुकीचा तपास सुरु आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून अनेकांना बजाज फिनात्सव, बजाज इंस्टंट लोन, पेट्रोलपंप डिलरशीप, स्पॅनडिल, नापतोल, रिलायन्स टॉवर अशी आमिष दाखवून गंडा घालण्यात आला होता. त्यामुळे ही वेबसाईट पाहून फसवणुक झालेल्या लोकांनी सायबर सेल पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.