मुक्तपीठ टीम
भारतीय महिला क्रिकेटची दिग्गज खेळाडू आणि कर्णधार मिताली राजने आता तिच्या क्रिकेटच्या कारकीर्दीतील मोठे यश संपादन केले आहे. मिताली राज जवळपास २० वर्षांपासून भारतीय क्रिकेटचा एक भाग आहे आणि सध्या ती वन डे संघाची कर्णधार आहे. दक्षिण आफ्रिकेसमवेत सुरू असलेल्या वन डे मालिकेत मिताली राजने तिच्या १० हजार धावांचा टप्पा पार केला आहे. तसेच महिला क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण करणारी मिताली राज ही भारतातील पहिली महिला क्रिकेटपटू बनली आहे.
याआधी महिला क्रिकेटमध्ये इंग्लंडची माजी कर्णधार शार्लोट एडवर्ड्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण केल्या होत्या. शार्लोटने १३ शतके आणि ६७ अर्धशतकांच्या मदतीने १० हजार २७३ धावा केल्या होत्या.
लखनौमध्ये खेळल्या जाणार्या वन डे मालिकेच्या तिसर्या सामन्यात भारतीय कर्णधार मिताली राजने ही मोठी कामगिरी केली आहे. तिसर्या एकदिवसीय सामन्यात मिताली राजने ५० चेंडूत ३६ धावा केल्या आणि पॅव्हेलियनमध्ये परतली. मात्र, या खेळीतून तिने आपल्या १० हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे.
मितालीच्या क्रिकेट कारकीर्दीबद्दल
मिताली राजने तिच्या कारकीर्दीत १० कसोटी सामने खेळले असून यात तिने ५१.०० च्या सरासरीने ६६३ धावा केल्या असून एक शतकी व चार अर्धशतके झळकावल्या आहेत. टी -२० क्रिकेटमध्ये मिताली राजने ८९ सामने खेळले असून त्यामध्ये तिने ३७.५२ सरसरीने २३६४ धावा केल्या, त्यात १६ अर्धशतकेही ठोकले आहेत. मितालीने वनडे क्रिकेटमध्ये २१२ सामन्यात ६९७४ धावा केल्या आहेत.
तिने २००२ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते, तिने वनडेमध्ये पहिला सामना १९९९ साली खेळला होता. तसेच २००६ मध्ये तिने टी-२० मध्ये पदार्पण केले होते.