अपेक्षा सकपाळ
(माहिती संकलन, संशोधन, लेखन)
‘अमूल’ हे एक असे नाव…जे आपल्या जीवनाचा एक भाग बनलंय. सकाळचा चहा-नाश्टा असो किंवा जेवण ‘अमूल’ उत्पादनं असतातच असतात. आता आपल्या ‘अमूल’ला ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्तानं मुक्तपीठवर ‘अमूल’ची यशोगाथा.
‘अमूल’ची खट्याळ मुलगी…आपलीच वाटणारी आणि ‘अमूल’सारखीच आपल्या मनातही घर करणारी. तिच्यासह येणारी ‘अमूल’ची टॅगलाईन…’’’अमूल’’’ दूध पितो इंडिया…आणखीच भावणारी. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरु होत असतानाच ‘अमूल’नेही तोच विक्रम केलाय. एक सहकार म्हणजे को-ऑपरेटिव्ह क्षेत्रातील ब्रँड कॉर्पोरेट ब्रँडना मागे टाकत महाब्रँड बनलाय.
देशातील प्रसिद्ध ब्रँड आणि देशातील सर्वात मोठी दुग्ध उत्पादने सहकारी डेअरी कंपनी ‘‘अमूल’’ची यशोगाथा ऐकावी अशीच. देशातील जवळजवळ प्रत्येकाला ‘‘अमूल’’ माहित असेल. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या बाबतीत ‘‘अमूल’’ जवळजवळ संपूर्ण देशावर वर्चस्व गाजवते. ‘अमूल’चे दूध, दही, ताक, लोणी, तूप, आइस्क्रिम आणि इतर गोष्टी आज बाजारात झपाट्यानं खपतात.
तब्बल ४० हजार कोटींची उलाढाल असणारी ‘अमूल’चा पसारा वाढतोच आहे. सध्या २ कोटी ३० लाख लीटर दूध विकत घेणारी ‘अमूल’ची सुरुवात झाली ती मात्र अवघ्या २४७ लीटर दुधापासून! शून्यातून शिखरापर्यंतचा प्रवास करणाऱ्या ‘अमूल’ची यशोगाथा प्रेरणादायी आहे…
‘अमूल’ची यशोगाथा
- १९४७मध्ये स्वातंत्र्य मिळाले आणि स्वतंत्र भारताची वाटचाल सुरु झाली.
- त्याआधी एक वर्ष ‘अमूल’ची वाटचाल सुरु झाली.
- त्या काळात भारतात एकीकडे अन्नधान्य आणि दुधाचा खूप तुटवडा होता.
- दुसरीकडे दूध उत्पादक शेतकऱ्यांना मात्र आपल्या दुधाची योग्य ती किंमत मिळत नव्हती.
- या परिस्थितीमुळे गुजरातमध्ये काम करणारे डॉ. वर्गीज कुरियन अस्वस्थ होते.
ब्रिटिशांच्या पुरवठादार डेअरीकडून शेतकऱ्यांचं शोषण
- गुजरातच्या आणंद भागात पोल्सन नावाची एक डेअरी होती.
- त्याच्या एकाधिकारशाहीमुले शेतकऱ्यांना अगदी कवडीमोल भावात आपलं दूध त्यांना विकावं लागत होतं.
- आणि त्याचवेळी पोल्सन कंपनी मुंबईला दूध पुरवठा करत बक्कळ नफा कमावत होती.
- ही कंपनी ब्रिटीश सैन्यालाही दूध पुरवठा करायची.
‘अमूल’च्या मूळ सहकारी संस्थेची स्थापना
- शेतकऱ्यांचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या त्रिभुवन दास पटेल यांनी शेतकऱ्यांच्या समस्या सरदार वल्लभभाई पटेलांना सांगितल्या.
- त्यावेळी पटेलांनी त्यांना एक सहकारी संस्था निर्माण करण्याची सूचना केली.
- ४ डिसेंबर १९४६ रोजी खेडा जिल्हा दूध उत्पादक संघटनेची स्थापना झाली.
- या संघटनेमुळे दलालांची मध्यस्थी संपल्याने शेतकऱ्यांना थेट नफा मिळू लागला.
- संस्थेच्या आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली.
‘अमूल’ ब्रँडनेमची जन्मकथा
- १९५० मध्ये त्रिभुवन दास पटेल यांनी या संघटनेची जबाबदारी डॉ. वर्गीज कुरियन यांच्या खांद्यावर सोपवली.
- सरदार पटेलांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या संस्थेशी अधिक मजबूत करण्यासाठी कुरियन सुरुवातीपासूनच प्रयत्नशील होते.
- त्यांना ही संस्था चालवण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या सक्षम व्यक्तीची गरज एच.एम. दलाया यांच्यामुळे पूर्ण झाली.
- तिघेही ‘अमूल’चे आधारस्तंभ बनले. डॉ. कुरियन यांनी १९५५ मध्ये या संघटनेचं नाव ‘अमूल’ असं ठेवलं.
- संस्कृतमधला अमूल्य म्हणजेच ज्याची किंमत लावली जाऊ शकत नाही या शब्दावरुन ‘अमूल’ हे नाव ठेवण्यात आलं.
‘‘अमूल’ गर्ल’ आली तरी कुठून?
- ‘अमूल’ म्हटलं की आठवते ती ‘अमूल’ गर्ल!
- एका ब्रँडची अँबेसिडर झालेली ही चिमुकली सर्वांनाच भावते.
- ‘अमूल’च्या सर्वच जाहिरातींमधून दिसणाऱ्या ‘अमूल’ गर्लची जन्मकथा ‘अमूल’सारखीच आहे.
- गुजरातमध्ये त्याकाळी एकाधिकारशाही असलेल्या पोल्सन डेअरीच्या जाहिरातींमध्ये पोल्सन गर्ल असायची.
- सहकार क्षेत्रातील ‘अमूल’चा मुकाबला खासगी पोल्सनशीच होता.
- पोल्सनला टक्कर देण्यासाठी डॉ.कुरियन यांनी ‘अमूल’ गर्लची कल्पना वापरली. त्यांनी मोठ्या अॅडव्हरटायझिंग एजेन्सीची नेमणूक केली.
- आर्ट डायरेक्ट यूस्टस फर्नांडिस आणि सिल्वेस्टर दाकुन्हा यांनी ‘अमूल’ गर्लची अस्तित्वात आणली.
- ‘अमूल’ची पहिली टॅगलाईन ही ‘प्युयरली द बेस्ट’ ही होती.
- यानंतर यात बदल झाला आणि ‘अटर्ली बटर्ली ‘अमूल’’ ही टॅगलाईन केली गेली. ‘अमूल’ची पहिली जाहिरात १९६६ मध्ये आली आणि तिने इतिहासच रचला.
‘अमूल’च्या जाहिरातीही विक्रमी
- एक सहकारी संस्था म्हणजे को-ऑपरेटिव्ह असूनही ‘अमूल’मध्ये कॉर्पोरेटचा व्यावसायिक दर्जा पाळला गेला.
- जाहिराती आणि वितरणातही कॉर्पोरेटसारखाच व्यावसायिक दर्जा आक्रमकतेनं आग्रहपूर्वक पाळला गेला.
- ही जाहिरात जगातली सर्वात जास्त कालावधीसाठी चाललेली ऍड कॅम्पेन ठरली.
‘अमूल’च्या जाहिरातीच झाल्या बातम्यांचा विषय!
- १९९० च्या दशकापर्यंत ‘अमूल’चं ब्रँड आणि जाहिराती लोकप्रियतेची वाटचाल करु लागलं.
- चालू घडामोडी आणि बॉलिवूड सिनेमांवर आधारीत ‘अमूल’ गर्लच्या जाहिराती या चर्चेच्या विषय बनू लागल्या.
- जाहिरातीची ही पद्धत आजतागायत सुरु आहे.
‘अमूल’चं मॉडेल संपूर्ण देशासाठी बनले आदर्श
- ‘अमूल’ची वाटचाल त्यांची काम करण्याची पद्धत इतकी प्रभावी होती की सरकारला त्यांचं हे मॉडेल संपूर्ण देशभरात लागू करण्याची इच्छा होती.
- यासाठी १९६४ मध्ये राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाची स्थापना झाली.
- डॉ. कुरियन यांनीच नेतृत्व केलं.
- त्यांनी तयार केलेल्या कार्यक्रमाला ऑपरेशन फ्लड किंवा श्वेत क्रांतीच्या नावाने ओळखलं जातं.
‘अमूल’नं देशाला दिलं पिरॅमिड मॉडेल
- १९६९-७०च्या कालावधीतल्या श्वेत क्रांतीमध्ये ‘अमूल’ला एक मॉडेल बनवलं गेलं. हे मॉडेल एका पिरॅमिडप्रमाणे आहे.
- जे ३ स्तरांवर काम करतं.
- याचा पाया म्हणजे गावातला शेतकरी जे डेअरी कोऑपरेटिव्ह सोसायटीचे सदस्य आहेत.
- हे सदस्य एकत्रितपणे त्यांच्या प्रतिनिधीची निवड करतात.
- या प्रतिनिधींच्या माध्यमातून जिल्हास्तरावर दूध उत्पादक संघटना काम करते. ज्यांच्याकडे दुधावर प्रक्रिया करुन त्यांच्या पॅकेजिंगची जबाबदारी असते.
- या युनियनच्या माध्यमातून दूध आणि दुधापासून बनवलेल्या पदार्थांची राज्यस्तरावरच्या मिल्क फेडरेशनला विक्री केली जाते.
- मुख्यत्वे यात शेतकरी आणि बाजारपेठ यादरम्यान कोणत्याही दलालाला स्थान दिलं जात नाही.
कुरियननंतर आर.एस सोढी ठरले ‘अमूल’चे नवे दिशादर्शक
- २०००नंतर कुरियन वादाच्या भोवऱ्यात सापडले, त्यांनी २००६मध्ये पद सोडले.
- काही काळ राजकीय क्षेत्रातील पार्थी भटोल यांनी कारभार पाहिला.
- पण पुन्हा ‘अमूल’ योग्य हाती गेले.
- ३० वर्षांपासून ‘अमूल’सोबत जोडलेल्या आर.एस.सोढींनी २०१० मध्ये ‘अमूल’चा कारभार हाती घेतला.
- त्यांनी ‘अमूल’च्या वितरण साखळीत चांगले बदल केले.
- त्यानंतर काळानुरुप नवे प्रोडक्ट्स लाँच केले.
- वाढलेलं वितरण आणि नव्या प्रोडक्टचा ‘अमूल’ला फायदा झाला.
- २०१० ते २०१५ च्या दरम्यान ‘अमूल’चा विकासदर २१ टक्क्यांवर पोहोचला. त्यामुळे ‘अमूल’ची उलाढाल ८ हजार कोटींवरुन वाढून २० हजार ७३३ कोटींवर पोहोचलं.
कॉर्पोरेटना उघड पाडणारं जाहिरात युद्ध
‘अमूल’नं आईस्क्रिम लाँच केलं. कमी किंमत पण चांगला दर्जा याबळावर ते लोकप्रिय ठरत गेलं. कॉर्पोरेट ब्रँडकडे नसलेल्या चवी, विविधतेमुळे ते वाढतच आहे. त्यातच ‘अमूल’चं एक आत्मविश्वासपूर्ण आक्रमकतेच धोरणही दिसतं. कॉर्पोरेट ब्रँड जे विकतात ते आईस्क्रिम नसतंच. ते तेलाचा वापर करून बनवलेलं फ्रोझन डेझर्ट असतं. हे ग्राहक जागरण घडवतानाच ‘अमूल’नं रिअल आईस्क्रिम म्हणजे दुधापासून बनवलेलं आपलंच अस्सल आईस्क्रिम असतं हे मनामनात ठसवलं. त्यामुळे ‘अमूल’ विश्वासास पात्र ठरलं.
कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळातही ‘अमूल’ची प्रगती
- ‘अमूल’ने लोकांच्या गरजा लक्षात घेऊन २०२१ वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ३३ नवे प्रोडक्ट्स लाँच केले.
- पुरवठा साखळीत कोणतीही बाधा येऊ नये यासाठी कामगारांना १००-१२५ रुपये अधिक दिले.
- ‘अमूल’च्या वितरकांनाही अव्याहत सेवेसाठी ३५ पैसे प्रतिलीटरचा बोनस दिला. डेअरी प्लांटमध्ये कामगारांच्या खाण्याची आणि राहण्याची व्यवस्था केली. परिणामी ‘अमूल’ने कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळातही २० ट्क्यांनी विकासदर गाठला.
कोरोना संकटातही ‘अमूल’ची वाढती उलाढाल, एका वर्षात ७०० कोटींची वाढ!
- गेल्या वर्षी ‘अमूल’ची उलाढाल ३८ हजार ५४२ कोटी रुपये होती.
- या आर्थिक वर्षात ३९ हजार २४८ कोटींची उलाढाल झाली आहे.
- २०२५ पर्यंत दुप्पट करून १ लाख कोटी करण्याचे उद्दिष्ट आहे.
- सध्या ‘अमूल’ जगातली आठव्या क्रमांकाची सर्वात मोठी दूध उत्पादक आहे.
- २०१२ मध्ये ‘अमूल’ १८ व्या क्रमांकावर होता.
- सन २०२१ मध्ये दूध उत्पादनात सदस्यांनी १४% वाढ केली आहे.
- ‘अमूल’तर्फे ४० लाख लिटर दुधाचे व्यवस्थापन केले जाते.
२०२१ मध्ये ‘अमूल’ने नव्या दशकात पाऊल ठेवलं आहे. स्थापनेच्या १९४६ या वर्षी २४७ लीटर दुधापासून सुरु झालेली ‘अमूल’ची विकासयात्रा आता अमृतमहोत्सवी वर्षात दिवसाला २ कोटी ३० लाख लिटरपर्यंत पोहोचली आहे. ती वाढतेच आहे. विस्तारतेच आहे. ब्रँड ‘अमूल’ मोठा होतोय. कॉर्पोरेटशी टक्कर घेतोय. आणि कॉ-ऑपरेटिव्ह चळवळ कालबाह्य झालेली नाही, गरज फक्त कॉर्पोरेटमधील व्यावसायिक दर्जाचा गुण घेण्याची आहे, हे ती दाखवून देत आहे. आपल्या महाराष्ट्रातील को-ऑपरेटिव्ह संस्था अमूलकडून हा गुण घेऊन कधी जिल्हा, राज्याच्या बाहेरही देशव्यापी मोठा ब्रँड बनतील?