मुक्तपीठ टीम
कोरोना महामारीनंतर आता अनेक देशांमध्ये आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यात भारतही आहे. अनेक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. ज्याप्रमाणे फेसबुक मेटा आणि ट्विटरने आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये कपात केली आहे त्याचप्रमाणे, जगभरातील आयटी कंपन्यांसह, इतर क्षेत्रातील कंपन्यांही या विचारात असल्याचे समोर येत आहे. आता ऑनलाइन फूड ऑर्डर आणि डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटो बाबतही अशी माहिती मिळत आहे. झोमॅटोचे सह-संस्थापक मोहित गुप्ता यांच्या राजीनाम्यानंतर कंपनी ३ ते ४ टक्के कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकणार असल्याची बातमी आहे.
संस्थापक गुप्ता यांच्या राजीनाम्यानंतर, कर्मचारी कपातीचा धोका!
- झोमॅटोचे सह-संस्थापक मोहित गुप्ता यांनी १८ नोव्हेंबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती आहे.
- गुप्ता साडेचार वर्षांपूर्वी झोमॅटोमध्ये सामील झाले.
- त्यांना २०२०मध्ये कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून सह-संस्थापक म्हणून पदोन्नती देण्यात आली.
- राजीनामा दिल्यानंतर गुप्ता यांनी म्हटलं आहे की, जीवनातील इतर क्षेत्रांचा शोध घेण्यासाठी झोमॅटोमधून पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे.
- झोमॅटोने सांगितले की गुप्ता यांना कंपनी कायदा, २०१३ आणि सूची नियमांनुसार मुख्य व्यवस्थापकीय कर्मचारी म्हणून नियुक्त केले गेले नाही.
झोमॅटोमधील मॅनेजमेंटमध्ये काम करणारे बडे अधिकारी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने राजीनामे देत आहेत. ही संख्या वाढत आहे. सहसंस्थापक मोहित गुप्ता यांच्या राजीनाम्यापूर्वीच अनेक अधिकाऱ्यांनीही राजीनामे दिले. गुप्ता यांचा राजीनामा हा कंपनीचा तिसरा मोठा राजीनामा असल्याचे बोलले जात आहे.
झोमॅटो कर्मचारी कपात करण्याची शक्यता
- झोमॅटोमध्ये ३ ते ४ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाऊ शकते.
- सध्या झोमॅटोमध्ये ३ हजार ८०० कर्मचारी काम करत आहेत.
- २०२०मध्ये झोमॅटोमध्येही टाळेबंदी करण्यात आली होती. कोरोना महामारीच्या काळात कंपनीने ५२० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते.
- त्यावेळी व्यवसायातील मंदीमुळे कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आल्याचे सांगण्यात आले.