मुक्तपीठ टीम
योगी आदित्यनाथ २५ मार्च रोजी इकाना स्टेडियमवर सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. या समारंभात योगींसोबत अनेक मंत्रीही शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक केंद्रीय मंत्री, इतर राज्यांचे मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षांचे नेतेही या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदींपासून ते गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जय प्रकाश नड्डाही या भव्य कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. याशिवाय योगी सरकारच्या दुसऱ्या टर्मच्या शपथविधी सोहळ्याला केंद्रीय मंत्रिमंडळापासून ते भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित राहणार आहेत.
बसपा सुप्रीमो मायावती, सपा संरक्षक मुलायम सिंह यादव, सपा अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यासह विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही या कार्यक्रमाला आमंत्रित केले जाणार आहे. यूपीमध्ये सरकार स्थापनेसाठी गृहमंत्री अमित शहा आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुवर दास यांना अनुक्रमे निरीक्षक आणि सहनिरीक्षक बनवण्यात आले आहेत.
इकाना स्टेडियमवर शपथविधी सोहळ्याचे आयोजन
- भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी इकाना स्टेडियमवर हा भव्य-दिव्य शपथविधी सोहळा आयोजित करण्याची तयारी सुरू आहे.
- इकाना स्टेडियमवर शपथ घेण्याचे नियोजन केले जात आहे.
- विविध राज्यांच्या प्रचारकांसह उत्तर प्रदेशचे सर्व खासदार आणि आमदारही या कार्यक्रमात सामील होण्याची तयारी करत आहेत. त्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्थाही ठेवण्यात येणार आहे.
- याशिवाय विरोधी पक्षांच्या बड्या नेत्यांनाही शपथविधीसाठी बोलावण्यात येणार आहे.
भाजपने ३७ वर्षांचा विक्रम मोडला
- २०२२ च्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत एकूण ४०३ जागांपैकी भाजपने २५५ जागा जिंकल्या आहेत.
- तर भाजपचा मित्रपक्ष अपना दलने १२ जागा जिंकल्या आहेत. निषाद पक्षाने ६ जागा जिंकल्या आहेत.
- दुसरीकडे, सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्या पक्षाला १११ जागा मिळाल्या आहेत.
- सपाचा मित्रपक्ष राष्ट्रीय लोकदलाने ८ तर सुहेलदेव भारतीय समाज पक्षाने ६ जागा जिंकल्या आहेत.
- याशिवाय काँग्रेसला दोन जागांवर, जनसत्ता दल लोकतांत्रिकला २ आणि बहुजन समाज पक्षाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.