मुक्तपीठ टीम
मुंबईलाच नाही तर देशाला हादरवणाऱ्या १९९३ बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी याकूब मेमनची कबर सजवल्याचा वाद चिघळत चालला आहे. भाजपा आणि शिवसेनेत या प्रकरणी आरोप प्रत्यारोपांचं युद्ध रंगलं आहे. या प्रकरणात नुकतीच नवी माहिती समोर आली आहे. बॉम्बस्फोट प्रकरणातील फरार आरोपी दहशतवादी टायगर मेमन याच्या नावाने याकुब मेमनच्या कबरीला सजवण्यासाठी धमकी देण्यात आल्याचं कळत आहे.
याकुब मेमनच्या कबरीचा वाद का सुरू आहे?
- दहशतवादी मेमनला २०१५ मध्ये नागपूर कारागृहात फाशी देण्यात आली आणि दक्षिण मुंबईतील बडा कब्रस्तानात त्याला दफन करण्यात आले.
- मेमनच्या कबरीभोवती तीन वर्षांपूर्वी म्हणजे २०१८मध्ये संगमरवरी लाद्या लावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
- नुकतेच मुंबई पोलिसांनी दहशतवाद्याच्या कबरीभोवती लावलेले ‘एलईडी लाईट’ हटवले.
- एका अधिकाऱ्याने सांगितले की, पोलीस उपायुक्त (डीसीपी) दर्जाचे पोलीस अधिकारी एका दहशतवाद्याच्या कबरीला ‘एलईडी दिवे’ कोणी लावले आणि संगमरवरी लाद्यांनी कबर कशी सजवली याचा तपास करतील.
कब्रिस्तानच्या पूर्व ट्रस्टींचा टायगर मेमनकडून धमकी मिळाल्याचा दावा
- तक्रारदार कब्रिस्तानचे माजी ट्रस्टींने धमकी देणाऱ्या व्यक्तीला स्पष्टपणे सांगितले की, हे कृत्य त्यांच्या अधिकारक्षेत्रात येत नाही आणि त्याबाबत कोणताही निर्णय घेतला जाऊ शकत नाही.
- मात्र त्यानंतरही तक्रारदाराला फोन आणि एसएमएस करून मागणी पूर्ण करण्यास सांगण्यात आले. त्यानंतरही तक्रारदाराने ऐकले नाही तर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.
- मोहम्मद मेमन म्हणाला की, याकूब भाई शहीद झाला आहे. मात्र, टायगर भाई अजूनही जिवंत आहे. त्यामुळे बडा कब्रस्तानमध्ये जागा द्या नाहीतर टायगर तुम्हाला गायब करेल.
- या धमकीनंतरही आपण कोणतेही गैरकृत्य केले नसल्याचे तक्रारदार पूर्व ट्रस्टींने म्हटले आहे. आपल्या जीवाला धोका असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.