मुक्तपीठ टीम
मुंबईसह देशभरातील नौदलाच्या सर्व तळांवर नौदल दिन साजरा होत असताना, नौदलाच्या पश्चिम मुख्यालयाद्वारे मुंबईतील नौदल गोदी येथे जगातील सर्वात मोठा भारतीय राष्ट्रध्वज तिरंगा झळकवण्यात आला आहे. प्रथमच असा प्रचंड मोठा ध्वज फडकवण्यात आला आहे. तो पाहून ‘झंडा उँचा रहे हमारा’ ही मुंबईकरांची, पर्यटकांची भावना व्यक्त होत आहे.
जगातील सर्वात मोठा तिरंगा
२२५ फूट लांब आणि १५० फूट रुंदीच्या या ध्वजाचे वजन सुमारे १४०० किलो आहे आणि तो खादीपासून बनवलेला आहे. शनिवारी येथे आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा या महाकाय तिरंग्याकडे आणि ‘गेट वे आॅफ इंडिया’कडे पाहताना, ऊर अभिमानाने भरून आला होता.
या भव्यदिव्य ध्वजातून भारतातील प्रतिष्ठित गेटवे दिसत आहे. ‘आझादी का अमृत महोत्सव’याचा भाग म्हणून खादी आणि ग्रामोद्योग आणि आयोगाने त्याची संकल्पना आणि निर्मिती केली आहे.
नौदलाचा राष्ट्रसेवेला समर्पित संकल्पाचा पुनरुच्चार!
- भारतीय नौदलाने नौदल दिनानिमित्त राष्ट्राच्या सेवेसाठी स्वत:ला समर्पित करण्याच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला.
- या स्मारकाच्या प्रदर्शनाच्या छोट्या पण महत्त्वाच्या संदेशाद्वारे नौदलाने एकप्रकारे राष्ट्रीय हितसंबंधांचे संरक्षण आणि संवर्धन शिवाय भारतीयांची सेवा करण्याच्या आपल्या प्रतिज्ञा आणि वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
डोळे दिपवून टाकणारा हा राष्ट्रीय झेंडा पाहिल्यानंतर गेट वे आॅफ इंडियाच्या परिसरात आलेले मुंबईकर आणि स्थानिक , परदेशी पर्यटक आश्चर्याने थक्क झाले. - अगणित पर्यटक आणि स्थानिकांनीही या झेंड्याचे छायाचित्र, छबी मोबाईल, कॅमेरांच्या सहाय्याने टिपण्याची संधी सोडली नाही.
- ‘गेट वे’च्या विशाल प्रांगणात नौदलाच्या पश्चिम मुख्यालयाने सायंकाळी अत्यंत महत्वाचा ‘ बिटिंग रिट्रीट’ सोहळा आयोजिला होता. त्यावेळीही या भव्य ध्वजाचे ‘मोठेपण’ ठळकपणे उठून दिसत होते.